यंत्रमानवाचा मेंदू मधमाशीसारखा तयार करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्नशील असून त्यांनी पर्यावरणीय प्रेरणांना प्रतिसाद देण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. बर्नस्टेन फोकल न्यूरोनल बेसिस ऑफ लर्निग व बेरनस्टिन सेंटर यांनी संयुक्तपणे साध्या चेता संस्थेचा वापर यंत्रमानवासाठी केला. त्यात मधमाशीच्या चेतासंस्थेसारखीच चेतासंस्था तयार करण्यात आली होती. त्यांनी यंत्रमानवरूपातील वाहनावर कॅमेरा बसवला व तो संगणकाला जोडला, संगणकावरील आज्ञावलीत कीटकांमध्ये (मधमाशी) असते तशी संवेदक मोटर यंत्रणा तयार करण्यात आली. यात कॅमेऱ्याकडून आलेली माहिती ही डोळ्याकडून येणाऱ्या माहितीप्रमाणेच होती व नंतर चेतासंस्थासदृश यंत्रणा वापरून यंत्रमानवाच्या चाकांच्या हालचाली करण्यात आल्या त्यामुळे तो त्या हालचाली नियंत्रित करू शकला. या छोटय़ाशा कृत्रिम मेंदूचे वैशिष्टय़ असे की, तो साध्या गोष्टी पटकन शिकतो. बाहेरील संकेतानुसार तो यंत्रमानवाचे वर्तन बदलतो, असे बर्लिन येथील विद्यापीठाचे मेंदूविज्ञान प्राध्यापक मार्टिन पॉल नॉरॉट यांनी सांगितले. मधमाशा फुलांचे रंग ओळखायला, फुलांमधील गोड रस ओळखायला शिकतात त्याप्रमाणे मधमाशांच्या मेंदूची नक्कल असलेला यंत्रमानवाचा मेंदूही रंगीत वस्तू ओळखतो. शिकण्याच्या प्रक्रियेत वैज्ञानिकांनी हा यंत्रमानव एका लहान भागाच्या मध्यभागी ठेवला व लाल व निळ्या भिंती त्याच्या आजूबाजूस होत्या. यंत्रमानवाचा कॅमेरा लाल रंगावर  केंद्रित केल्यानंतर वैज्ञानिकांना लाइट लागलेला दिसला. त्यातून यंत्रमानवाच्या मेंदूतील रिवॉर्ड सेन्सर उद्दीपित झाला. त्यातून पुढे यंत्रमानवाला चाकांवर नियंत्रण ठेवता आले. विशेष म्हणजे यंत्रमानव लाल रंग दिसताच त्या दिशेने जाऊ लागला. विशिष्ट रंगाचा पदार्थ शोधणे त्याला जमू लागले. मधमाशी जेव्हा रंग ओळखायला शिकते तेव्हा जे घडते त्याची नक्कल या यंत्रमानवात केली आहे.