tec02अँड्राइडवर आधारित स्मार्टफोन आणि टॅब्लेट्सनी बाजारात आपले वर्चस्व प्रस्थापित केले असतानाच आता अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित अन्य गॅझेट्सचीही आता चलती सुरू झाली आहे. त्यात आता भर पडलीय ती कार स्टिरिओ सिस्टिमची. स्वत:च्या गाडीतील म्युझिक सिस्टिम हादेखील आता ग्राहकासाठी आकर्षणाचा मुद्दा बनला आहे. सीडी किंवा एफएमशिवाय यूएसबी पेनड्राइव्ह, स्मार्टफोनमधील गाणी वाजवणाऱ्या सिस्टिम सध्या प्रचलित आहे. मात्र, क्लॅरिऑन या जपानी कंपनीने आणलेल्या अँड्राइड कार स्टिरीओ सिस्टिममुळे बाजारात नव्या म्युझिक सिस्टिमचे पर्व सुरू होण्याची शक्यता आहे. ‘क्लॅरिऑन एएक्स१’ असे या स्टिरिओ सिस्टिमचे नाव आहे. यामध्ये नेहमीच्या कार स्टिरिओसारखी वैशिष्टय़े आहेतच; परंतु त्याचबरोबर हा इंटरनेटच्या वापरानेही गाणी किंवा व्हीडिओ ऐकण्या/पाहण्याचा आनंद देऊ शकतो. यामध्ये वायफायद्वारे इंटरनेट कनेक्ट करण्याची व्यवस्था असल्याने आपल्या स्मार्टफोनचे इंटरनेट कनेक्शन शेअर करून तुम्ही थेट ऑनलाइन गाणी ऐकू शकता. विशेष म्हणजे, क्लॅरिऑनने ‘टी सीरिज’ या कंपनीशी हातमिळवणी करून त्यांच्या वेबसाइटवरील सर्व गाण्यांच्या अमर्याद वापराची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ही स्टिरिओ सिस्टिम पूर्णपणे टचस्क्रीनवर चालते. तसेच यामध्ये फोटो किंवा व्हीडिओ पाहण्याचीही सुविधा आहे. क्लॅरिऑनने या स्टिरिओ सिस्टिमची भारतातील विक्री किंमत ५५,८९० रुपये इतकी ठेवली आहे.

‘क्लॅरिऑन एएक्स १’ची वैशिष्टय़े
६.५ इंचाचा डब्ल्यूव्हीजीए टीएफटी एलसीडी डिस्प्ले.
८०० मेगाहार्ट्झ ऑटोमेटिव्ह प्रोसेसर. एक जीबी रॅम
नॅव्हीगेशन व्हाइस गाइडन्सची व्यवस्था.
सहा चॅनेल आरसीए आउटपूट
अंतर्गत डिजिटल अॅम्प्लिफायरची सोय.
१०८० फुल एचडी प्लेबॅक.

एलजीचा एल-बेल्लो
tec03‘जी-३’ स्मार्टफोनला मिळत असलेल्या यशानंतर एलजीने आता ‘एल’ सीरिजमधील स्मार्टफोन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत सादर करण्यात आलेला ‘एल बेल्लो’हा मध्यम किंमत श्रेणीतील स्मार्टफोन आहे. मागे बटणाची व्यवस्था असलेला हा स्मार्टफोन काहीसा कव्‍‌र्हड आहे. यामध्ये पाच इंचाचा ट्र आयपीएस डिस्प्ले असून ४८० बाय ८५४ पिक्सेल असे त्याचे रेझोल्युशन आहे. १.३ गिगाहार्ट्झ प्रोसेसरवर चालणाऱ्या या फोनला एक जीबी रॅम असून आठ जीबी इंटर्नल मेमरी आहे. फोनला ३२ जीबीपर्यंत एक्स्टर्नल स्टोअरेज बसवण्याची व्यवस्था आहे. या स्मार्टफोनचा मागील कॅमेरा आठ मेगापिक्सेल इतका असून पुढे एक मेगापक्सिेलचा कॅमेरा बसवण्यात आला आहे. या कॅमेऱ्यांमध्ये ‘टच अ‍ॅण्ड शूट’, ‘ऑटोफोकस’, ‘सेल्फीसाठी टायमर’, ‘फ्रंट कॅमेऱ्यासाठी लाइट’ अशा व्यवस्था आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या किटकॅट या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित आहे. स्मार्टफोनची बॅटरी २,५४० एमएएच इतकी असल्याने वापरकर्त्यांना त्याबाबत फार अडचणी येण्याची शक्यता नाही. या फोनची किंमत १८,५०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

सॅमसंगचा ‘गीअर एस’
tec04चालू आठवडय़ातच सॅमसंगने ‘गॅलक्सी नोट ४’ भारतीय बाजारात दाखल केला. त्याबरोबरच कंपनीने ‘गीअर एस’ नावाचे वेअरेबल गॅझेटही भारतात आणले आहे. वक्राकार ‘अमोल्ड स्क्रीन’ असलेल्या ‘गीअर एस’चा लूक मनगटावर बांधलेल्या मिनी स्मार्टफोनसारखाच आहे. यात ‘३जी’ आणि ‘वायफाय’ कनेक्टीव्हीटी पुरवण्यात आली असून याचा प्रोसेसरही एक गिगाहार्टझचा डय़ुअल कोअर आहे. ‘गीअर एस’मध्ये ५१२ एमबी रॅम असून चार जीबी इंटर्नल मेमरी आहे. या गॅझेटमध्ये अ‍ॅक्सेलोमीटर, गायरोस्कोप, कंपास, हार्ट रेट, अ‍ॅम्बियन्ट लाइट, बॅरोमीटर या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. शिवाय हे गॅझेट व्हॉइस कमांडवरही चालते. ‘गीअर एस’ची भारतातील किंमत २९,५०० रुपये इतकी आहे.

लाव्हाचे ‘किटकॅट’ टॅब्लेट
tec05‘एक्सट्रॉन’ या श्रेणीतील टॅब्लेटची निर्मिती करणाऱ्या ‘लाव्हा’ कंपनीने याच श्रेणीत आता ‘एक्सट्रॉन झेड ७०४’ नावाचा नवीन टॅब्लेट भारतात आणला आहे. अँड्राइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या या टॅब्लेटची किंमत ६,९९९ रुपये इतकी आहे. सात इंच आकाराच्या या टॅब्लेटच्या स्क्रीनचे रेझोल्युशन १०२४ बाय ६०० पिक्सेल इतके आहे. १.३ गिगाहार्ट्झचा क्वाड कोअर प्रोसेसर, एक जीबी रॅम यामुळे हा टॅब्लेट वेगाच्या बाबतीत चांगला आहे. यामध्ये १६जीबीची इंटर्नल मेमरी असून ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. त्यामुळे वेग आणि स्टोअरेज या दोन्ही बाबतीत हा टॅब्लेट उजवा ठरतो. मात्र, या टॅब्लेटला दोन मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा दिला असून पुढे व्हीजीए कॅमेरा आहे. याबाबतीत वापरकर्त्यांना थोडीशी निराशा होऊ शकते. या टॅब्लेटमध्ये वायफाय, ब्लूटुथ, एज, जीपीएस या सुविधा असल्या तरी ३जीची सुविधा नाही. टॅब्लेटला ४,००० एमएएचची बॅटरी असून ती दहा तासांचा टॉकटाइम देते, असा कंपनीचा दावा आहे.