सुमारे १६ महिन्यांपूर्वी अमेरिकेत लाँच झाल्यापासून चर्चेचा विषय ठरलेले ‘गूगल क्रोमकास्ट’ आता भारतातही उपलब्ध झाले आहे. प्रसारमाध्यमांमधील गूगल क्रोमकास्टच्या जाहिराती पाहून अनेकांना ‘हे काय नवीन उपकरण?’ असा प्रश्न पडला आहे. तुमच्या स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा इंटरनेटवरील व्हिडीओ, ऑडिओ किंवा अ‍ॅप्लिकेशन थेट टीव्हीवर दाखवण्याची किमया करणारे ‘क्रोमकास्ट’ पेनड्राइव्हच्या आकाराचे आहे. मात्र, त्याची उपयुक्तता प्रचंड आहे. क्रोमकास्ट म्हणजे काय, ते कसे काम करते, त्याचे फायदे काय, अशा विविध प्रश्नांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न..

तुमच्या कॉम्प्युटरमधील किंवा स्मार्टफोनमधील व्हिडीओ किंवा फोटो थेट टीव्हीवर झळकवता आले तर.. किंवा तुम्ही आवडीने मोबाइलवर खेळत असलेला एखादा गेम टीव्हीच्या मोठय़ा स्क्रीनवर आणून खेळण्याची मजा वाढवता आली तर.. किंवा यू टय़ूबवरील एखादा व्हिडीओ थेट टीव्हीवरून स्ट्रिमिंग करता आला तर..
तुम्ही सच्चे गॅझेटप्रेमी आणि नवतंत्रज्ञानाचे भोक्ते असाल तर वरील तिन्ही tech6गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत, असं तुम्हाला नक्कीच वाटेल. तर मग गूगलचे ‘क्रोमकास्ट’ तुमच्या सेवेत हजर आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी अमेरिकेसह जगातील काही प्रमुख बाजारांत लाँच झालेले ‘गूगल क्रोमकास्ट’ हे उपकरण आता भारतातही आले आहे. ‘स्नॅपडील’ या ईकॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून गूगलने क्रोमकास्टची विक्री सुरू केली आहे. २९९९ रुपयांत मिळणाऱ्या या उपकरणासोबत एअरटेलच्या ब्रॉडबॅण्ड कनेक्शनवर तीन महिन्यांसाठी ६० जीबीचा डाटा मोफत देण्यात आला आहे, तर ‘इरॉस नॉऊ’च्या सर्व चित्रपटांचा tech8मोफत अ‍ॅक्सेस दोन महिन्यांसाठी देण्यात येणार आहे. अमेरिकेसह अनेक देशांत साधरणत: ३५ डॉलर इतक्या किमतीत मिळणाऱ्या क्रोमकास्टवर या ऑफर्स कुणालाही आकर्षित करणाऱ्या आहेत. पण भारतीयांसाठी नवीन उपकरण असलेले हे क्रोमकास्ट कसे काम करते आणि त्याचा फायदा काय, असा प्रश्न प्रत्येकालाच पडत आहे.

काय आहे क्रोमकास्ट?
अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, क्रोमकास्ट हे गूगलने विकसित केलेले एक ‘डिजिटल मीडिया प्लेअर’ आहे. सुमारे २.८३ इंच म्हणजेच जवळपास ७ सें.मी. आकाराचे हे एचडीएमआय डोंगल कोणत्याही एचडी टीव्हीला कनेक्ट करून त्यावर इंटरनेट किंवा लोकल नेटवर्कवरील (स्मार्टफोन, कॉम्प्युटर, टॅब्लेट, लॅपटॉप) ऑडिओ किंवा व्हिडीओ पाहता येते. गूगल कास्ट तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेल्या मोबाइल किंवा वेब अ‍ॅप्लिकेशन्सवरून हे व्हिडीओ किंवा ऑडिओ थेट टीव्हीवर प्ले करता येतात. भारतात यूटय़ूब आणि गूगल प्ले मूव्हीजवरील व्हिडीओ क्रोमकास्टच्या माध्यमातून थेट व्हिडीओवर पाहता येतील. याशिवाय ‘गूगल क्रोम’ या वेब ब्राऊजरवरील कोणताही ‘कंटेन्ट’ क्रोमकास्टवर मिरर करून टीव्हीवर पाहता येईल. याखेरीज तुमच्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरील फोटो टीव्हीच्या मोठय़ा स्क्रीनवर पाहणेही शक्य होते. या खेरीज क्रोमकास्टशी सुसंगत असलेले अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन्स किंवा गेम्सही तुम्हाला थेट टीव्हीच्या स्क्रीनवर आणून वापरता येतील. याशिवाय ऑनलाइन टीव्ही, रेडिओ, हवामान अंदाज अशा अनेक गोष्टी क्रोमकास्टमुळे टीव्हीवरून पाहता येते.

क्रोमकास्ट काम कसे करते?
tech9क्रोमकास्टवरून पाहता येणाऱ्या सर्व व्हिडीओचा दर्जा १०८० पिक्सेल क्षमतेचा असतो. यामध्ये ५१२ एमबी रॅम असून त्यात दोन जीबी स्टोअरेजची सुविधाही पुरवण्यात आली आहे. क्रोमकास्ट बसवण्यापूर्वी तुमच्याकडे एचडी टीव्ही, वायफाय कनेक्शन, अ‍ॅण्ड्रॉइड २.३ किंवा आयओएस ६.०पेक्षा वरच्या श्रेणीतील स्मार्टफोन, विण्डोज ७ किंवा मॅक ओएस १०पेक्षा अधिक क्षमतेचा कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे. क्रोमकास्ट एचडीएमआय पोर्टला कनेक्ट होते, तर टीव्हीतील दुसऱ्या यूएसबी पोर्टच्या मदतीने किंवा यूएसबी चार्जरच्या मदतीने त्याला पॉवरसप्लाय केला जातो.

क्रोमकास्टचे फायदे काय?
क्रोमकास्टची वैशिष्टय़े पाहिली तर त्याचे फायदे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. अगदी थोडक्यात सांगायचे तर तुमचा एचडी टीव्ही तुम्हाला ‘स्मार्ट टीव्ही’ करता येईल, अशी याची उपयुक्तता आहे. क्रोमकास्टच्या मदतीने तुम्हाला यूटय़ूबवरील किंवा गूगल प्ले मूव्हिजवरील कोणताही चित्रपट टीव्हीच्या मोठय़ा स्क्रीनवर एचडीमध्ये पाहायला मिळतो. याशिवाय गेमिंगसाठीही हा उपयुक्त आहे.
tech19सध्या भारतात यूटय़ूब, गूगल प्ले मूव्हिज, इरॉस नाऊ, यप्पी टीव्ही असे काही अ‍ॅप्स क्रोमकास्टशी सुसंगत आहेत. मात्र येत्या काळात अ‍ॅप्स बनवणाऱ्या अन्य कंपन्यांकडूनही क्रोमकास्टच्या साह्य़ाने अ‍ॅप वापरण्यासाठी सुधारणा केल्या जाऊ शकतील. मात्र, सध्या गूगल क्रोम या वेब ब्राऊजरच्या मदतीने तुम्ही कोणतेही अ‍ॅप्लिकेशन क्रोमकास्टच्या माध्यमातून टीव्हीवर प्ले करू शकता. अर्थात त्याचा दृश्यात्मक दर्जा फारसा उत्तम नसेल. दुसरे म्हणजे, क्रोमकास्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरील अ‍ॅप्लिकेशन्स टीव्हीवर चालवत असलात तरी तुमच्या फोनच्या अन्य कार्यात अजिबात अडथळा येत नाही. म्हणजे, क्रोमकास्ट सुरू असतानाही तुम्ही फोन घेणे/करणे, मेसेज पाठवणे अशी कामे करू शकता.

क्रोमकास्टसाठी आवश्यक यंत्रणा
* किमान ४ एमबी प्रतिसेकंद वेगाचे इंटरनेट ब्रॉडबॅण्ड कनेक्शन
* वायफाय सुविधा
* एचडी टीव्ही
* विण्डोज ७ कॉम्प्युटर
* अ‍ॅण्ड्रॉइड २.३ पेक्षा अधिक क्षमतेचा स्मार्टफोन