स्मार्टफोनवर इंटरनेटचा सर्वाधिक वापर अ‍ॅप्स, सोशल मेसेजिंग किंवा यूटय़ूबवरून व्हिडीओ पाहण्यासाठीच होत असतो. क्वचितच एखादी वेबसाइट पाहण्यासाठी आपण स्मार्टफोनवरील वेब ब्राउजरचा वापर करत असतो. परंतु, केवळ मनोरंजन किंवा संवादापलीकडे कामासाठी स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांसाठी मोबाइलमधील वेब ब्राउजर ही एक आवश्यक गोष्ट आहे. अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या स्मार्टफोनमध्ये असलेला ‘गुगल क्रोम’ हा डिफॉल्ट वेब ब्राउजर उपयुक्त आहेच; पण त्याशिवाय गुगलच्या प्ले स्टोअरमधून अनेक मोफत वेब ब्राउजर डाउनलोड करता येतात. प्रत्येक ब्राउजरची वैशिष्टय़े वेगवेगळी असतात. प्रत्येकाच्या कार्यपद्धतीचा वेगही वेगळा असतो. त्यामुळे तुम्ही ‘क्रोम’ला कंटाळला असाल किंवा नवनवीन ‘अ‍ॅड ऑन’ पुरवणाऱ्या वेगवान ब्राउजरच्या शोधात असाल तर खालील वेब ब्राउजरमधून तुम्हाला निवड करता येईल.गुगल क्रोम
अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर गुगल क्रोम हा वेब ब्राउजर ‘डिफॉल्ट’पणे इन्स्टॉल केलेला असतो. क्रोमचा एकूण लुक आणि कार्यपद्धती स्मार्टफोनच्या मेमरीचा किमान वापर करते. तसेच तुमच्या स्मार्टफोनवरील डाटा तुम्ही वेब ब्राउजिंग करताना ‘सिंक’ (एकीकरण) करू शकता. याशिवाय क्रोमवरील सर्च इंजिनला ‘व्हॉइस सर्च’ची सुविधाही पुरवण्यात आली आहे. त्यामुळे क्रोम हा उपयुक्त ब्राउजर आहे. मात्र, ‘क्रोम’मध्ये आपल्या आवडीने किंवा सोयीनुसार बदल करण्यावर काही मर्यादा आहेत.

फायरफॉक्स
अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरील ‘फायरफॉक्स’चा ब्राउजर अतिशय आकर्षक लुक असलेला आणि चपळ आहे, असे म्हणायला हरकत नाही. शिवाय यामध्ये आपल्या उपयुक्ततेनुसार वेगवेगळय़ा ‘अ‍ॅड ऑन’ सुविधाही आपल्याला वापरता येतात. अशा अ‍ॅड ऑनमुळे आपल्याला अनावश्यक अ‍ॅड्स ब्लॉक करता येतात, आपले पासवर्ड सुरक्षितपणे ठेवता येतात आणि वेब ब्राउजिंगचा वेगही वाढवता येतो. ‘फायरफॉक्स’मध्ये एखाद्या वेबसाइटवरील मजकूर ‘सेव्ह’ करून तो ‘ऑफलाइन’ वाचता येण्याचीही सुविधा मिळते.

होव्हर ब्राउजर
तुम्ही मूव्ही पाहत असाल किंवा चॅटिंग करत असाल आणि अचानक तुम्हाला काहीतरी पाहण्यासाठी ‘वेब ब्राउजिंग’ करायचे असेल तर ते करण्यासाठी आधीचे अ‍ॅप्स बंद किंवा ‘मिनिमाइज’ करून ब्राउजरवर जावे लागते. मात्र, ‘होव्हर ब्राउजर’ तुम्हाला कोणत्याही अ‍ॅपसोबत ‘ब्राउजिंग’ करण्याची सुविधा देते.

ऑपेरा मिनी
सध्याच्या घडीला ‘आउट डेटेड’ वाटत असले तरी ‘ऑपेरा मिनी’ ब्राउजर कमी प्रोसेसर आणि रॅम असलेल्या स्मार्टफोनसाठी अतिशय उपयुक्त आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा ब्राउजर आपल्या फोनवरील केवळ चार एमबी जागा व्यापतो. शिवाय यामध्ये ‘डाटा कम्प्रेशन’ची सुविधा आहे. त्यामुळे आपल्या इंटरनेटच्या स्पीडनुसार तो छायाचित्रे किंवा एखाद्या वेबसाइटवरील मजकूर कमीतकमी आकारात पाहता येईल, अशी व्यवस्था पुरवतो. यामुळे आपला इंटरनेट डाटाचा वापर कमी होतो.

सीएम ब्राउजर
कमी स्टोअरेज क्षमता असलेल्या स्मार्टफोनसाठी ‘चीताह मोबाइल’ या कंपनीचा हा ब्राउजर उपयोगी आहे. अवघ्या १.९२ एमबी आकाराचा हा ब्राउजर अतिशय सहजपणे आणि जलदपणे ‘वेब ब्राउजिंग’ करतो. शिवाय यावरील इंटरनेट सिक्युरिटीही खात्रीलायक असते.

यूसी ब्राउजर
अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक लोकप्रिय असलेला यूसी ब्राउजर हा अतिशय आकर्षक आणि कमी डाटा वापरणारा ब्राउजर आहे. या ब्राउजरमध्ये वेबपेजेस आधीच लोड करण्याची सुविधा आहे. त्यामुळे तुम्ही वेबसाइट ओपन करताच तो पटकन कार्य करतो. शिवाय वेबसाइटवरून डाउनलोड करताना डाटा कनेक्शन बंद पडल्यास जेवढी फाइल डाउनलोड झाली आहे, त्याच्यापुढेच हा ब्राउजर डाउनलोड सुरू करतो. त्यामुळे नव्याने डाउनलोड करण्याची गरज पडत नाही. या ब्राउजरमध्ये ‘फेसबुक’चा अंतर्भाव करण्यात आल्याने तुम्हाला वेब ब्राउजिंग करत असतानाच फेसबुकचे नोटिफिकेशन्स दिसत राहतात.