रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे आरक्षण करण्यासाठी आजकाल तासन् तास लांबलचक रांगेत उभे राहण्याची गरज राहिलेली नाही. ते इंटरनेटवर करता येते हे आपल्याला सर्वानाच माहिती असेलच. परंतु आपल्या प्रवासाशी संबंधित इतर आवश्यक माहिती आपल्याला कुठे मिळेल?  अशी इत्थंभूत माहिती देणाऱ्या अनेक साइट्स उपलब्ध आहेत. त्यापकी <http://enquiry.indianrail.gov.in/ntes/&gt; आणि <http://indiarailinfo.com/>  या दोन साइट्स. यापकी पहिली साइट भारत सरकारची अधिकृत साइट आहे.
समजा तुमचे नातेवाईक किंवा मित्र एका लांब पल्ल्याच्या गाडीने तुमच्या गावी येणार असून त्यांना स्टेशनवर उतरवून घेण्यास जायचे आहे. अशा वेळी तुम्हाला काय प्रश्न पडतात? ही गाडी वेळेवर येणार की उशीरा? ती किती क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर येते? त्यांनी सांगितलेला रिझव्‍‌र्हेशनचा डबा इंजिनपासून कितवा आहे? इत्यादी इत्यादी.
वर दिलेल्या साइट्सवर गाडीचे नाव/क्रमांक टाकल्यास ती गाडी कोणत्या स्टेशनवरून किती वाजता सुटते, कोणकोणत्या स्टेशन्सवर किती वाजता थांबते, शेवटच्या स्टेशनवर किती वाजता पोहोचते इत्यादी सर्व माहिती दिसते. तसेच आज सुटलेली गाडी कोणत्या स्टेशनवर पोहोचली आहे, ती वेळेवर आहे की किती मिनिटे उशिरा आहे याचीही माहिती मिळू शकते.
<http://indiarailinfo.com/>  या साइटमध्ये गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार, गाडीतील आपला आरक्षित डबा इंजिनपासून कितवा आहे हेही सांगितलेले असते. सदर गाडी एखाद्या मधल्या स्टेशनवर किती मिनिटे थांबणार आहे आणि ती गेले काही दिवस सरासरीने किती उशिराने आलेली आहे याचीही माहिती दिलेली असते. तसेच येथे आरक्षित जागांची उपलब्धता (Seats availability) आणि श्रेणीनुसार तिकिटाची रक्कम तुम्हाला बघता येऊ शकते. गाडीच्या प्रवासाचा मार्ग आणि या क्षणी गाडी कोणत्या स्टेशनवरून पुढे गेली आहे हे तुम्हाला भारताच्या नकाशावरही दिसू शकते.
या दोन्ही साइट्सवर तुमच्या नियोजित प्रवासाच्या पहिल्या स्टेशनवरून शेवटच्या स्टेशनपर्यंत जाणाऱ्या सर्व गाडय़ांची सूची येथे मिळू शकते. त्या गाडय़ा आठवडय़ात कोणत्या दिवशी असतात हेदेखील येथे समजते. रद्द केलेल्या, वेळ बदललेल्या, मार्ग बदललेल्या गाडय़ा, इत्यादींची माहिती येथे कळते. ही माहिती इंग्रजीबरोबरच िहदी भाषेत मिळण्याची सुविधा आहे. या साइटचे Android App  देखील उपलब्ध आहे.
– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com