पूर्णपणे पारदर्शक, दहा मिनिटांत पूर्ण चार्ज होणारा, फोर-डी दृश्ये दाखवणारा, आताच्या कोणत्याही फोनपेक्षा हलका, कोणत्याही पृष्ठभागाला स्पीकर बनवणारा स्मार्टफोन पाहायचाय?.. स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानाला एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवणारा अशी वैशिष्टय़े असलेला एक स्मार्टफोन अलीकडेच अवतरला आहे. पण फक्त कल्पनेतच.. वास्तवात येण्यासाठी त्याला अजून बरेच दिवस मोजावे लागणार आहेत..
आरियाची वैशिष्टय़े
* पाच इंची अल्ट्रा एचडी स्क्रीन.
* ३८४० बाय २१६० पिक्सेल रिझोल्यूशन.
* ३.० गिगाहर्ट्झचा ऑक्टा कोअर प्रोसेसर
* ४ जीबी रॅम (अपग्रेड करता येणारी)
* १२८ जीबीपर्यंतची स्टोअरेज क्षमता (अपग्रेड करता येणारी)
* १३ मेगापिक्सेल लायट्रो कॅमेरा
* ४के व्हिडीओ रेकॉर्डिग.
* ४जी
* वायफाय, ब्लूटुथ ४.१
* सुपर कॅपॅसिटर
स्मार्टफोनच्या जगात दररोज दहाच्या पटीत नव्या मोबाइलची भर पडते. प्रत्येक फोनपाठोपाठ स्मार्टफोनच्या भात्यात नवनवीन वैशिष्टय़े दाखल होत असतात. गेल्या पाच वर्षांतील स्मार्टफोनच्या प्रगतीचा आणि त्यातील नावीन्यपूर्ण बदलांचा झपाटा पाहिला तर येत्या पाच वर्षांत हे तंत्रज्ञान कुठे असेल, याचा अंदाज घेणं खरंच कठीण आहे. ज्या वेगाने मोबाइलचा स्मार्टफोन बनला किंवा ज्या वेगाने लॅपटॉप, टॅब्लेटच्या आकारात विसावला, त्या वेगाशी तुलना केली तर पुढच्या पाच वर्षांत स्मार्टफोनपेक्षाही अचाट असं तंत्रज्ञान आपल्या हाती येईल, अशी खात्री बाळगायला हरकत नाही. पण तूर्तास स्मार्टफोनच्या भविष्याची कल्पना केली तरी त्यात अद्भुत असे अनेक बदल जाणवू शकतात. किंबहुना हातात स्मार्टफोन बाळगणाऱ्या प्रत्येकालाच बाजारात नव्याने येणाऱ्या स्मार्टफोनबद्दल उत्सुकता आणि अपेक्षा असतात. ग्राहकांच्या या अपेक्षा आणि तंत्रज्ञानातील प्रगती यांचा संगम साधून एका अद्वितीय स्मार्टफोनची कल्पना उतरली आहे. ‘आरिया’ नावाचा हा ‘कन्सेप्ट फोन’ आज कुठेही तयार होत नाहीये किंवा तो बनवण्याची खटपटही कुणी करत नाहीये. अगदी नजीकच्या काळात असा फोन येईल का, हेही सांगता येणार नाही. पण भविष्यातला स्मार्टफोन कसा असेल, या प्रश्नाचं उत्तर ‘आरिया’ नक्कीच देऊ शकेल.
भारतातील मोबाइल क्षेत्रातील अर्थकारण, तंत्रज्ञान आणि मागणी यांवर संशोधन करणाऱ्या ‘९१मोबाइल्स डॉट कॉम’ने अलीकडेच स्मार्टफोनच्या जगाला भुलवेल अशी ‘आरिया’ फोनची संकल्पना मांडली आहे. असा फोन पुढच्या दोन वर्षांत वास्तवात उतरेल, असा या वेबसाइटचा दावा आहे. अर्थात त्यासाठी कंपन्यांना खूपच मोठी मजल मारावी लागेल.

काय आहे ‘प्रोजेक्ट आरिया’?
ग्राहकांच्या अपेक्षा, वापरकर्त्यांची गरज, तंत्रज्ञानातील मर्यादा आणि निर्मिती खर्चाचा आवाका या सगळय़ांचा तंत्रशुद्ध अभ्यास करून सादर केलेले भविष्य आहे. स्मार्टफोनची कामगिरी, कार्यक्षमता, बॅटरी क्षमता, कॅमेरा, डिस्प्ले आणि मेमरी या वैशिष्टय़ांकडे पाहून त्याचा पसंतीक्रम किंवा प्राधान्य ठरवले जाते. याच वैशिष्टय़ांबाबत ग्राहकाला काय काय हवे आहे, याचे सर्वेक्षण करून ‘९१ मोबाइल्स’ने ‘आरिया’ संकल्पना मांडली आहे.
बॅटरी
कमी वेळ चालणारी बॅटरी ही कुठल्याही स्मार्टफोनची सर्वात मोठी समस्या आहे. तर जास्तीतजास्त क्षमतेची बॅटरी देतानाच तिचा आकार आणि वजन कमी ठेवण्याचे आव्हान कंपन्यांना पेलावे लागते. ‘आरिया’ची संकल्पना या दोन्ही आघाडय़ांवर जबरदस्त चित्र दाखवते. या संकल्पनेत बॅटरीला थाराच नाही. त्याऐवजी फोनमध्ये सुपर कॅपॅसिटर (संधारित्रे) बसवण्यात आले आहेत. ‘सुपर कॅपॅसिटर’ सध्याच्या फोन बॅटरीच्या तुलनेत आकाराने अतिशय लहान आणि वजनाने नगण्य असतात. शिवाय त्यामध्ये एका बॅटरीच्या दहापट ऊर्जा साठवण्याची क्षमता असते. शिवाय हे ‘कॅपॅसिटर’ पूर्णपणे चार्ज व्हायला दहा मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो. अशा कॅपॅसिटरमुळे स्मार्टफोन वजनाने हलका होईलच; पण बॅटरी दीर्घ काळ चालू शकेत.
बदलता येणारे हार्डवेअर
आपल्या स्मार्टफोनचे स्टोअरेज कमी पडू लागले की आपण जास्त जीबीचे मेमरी कार्ड घेतो नि ते फोनमध्ये घालतो. नेमकी हीच पद्धत तुम्हाला तुमच्या फोनच्या हार्डवेअरबाबतही करता येईल. ‘आरिया’च्या संकल्पना फोनमध्ये प्रोसेसर, रॅम, कॅमेरा असे प्रत्येक हार्डवेअर बदलण्याची सोय आहे. म्हणजे उद्या तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा कमी क्षमतेचा वाटला की ते हार्डवेअर काढायचे आणि जास्त क्षमतेचा कॅमेरा त्यात बसवायचा. थोडक्यात, हा प्रकार एखादी गाडी ‘मॉडिफाय’ करण्यासारखा आहे.
व्हिडीओ
स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर मनोरंजनासाठी होतो, हे आता सिद्ध झाले आहे. त्यापाठोपाठ रीडिंग, पर्सनल असिस्टन्स, कम्युनिकेशन यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे स्मार्टफोन घेताना प्रत्येकजण त्यातील व्हिडिओची दृश्ये पाहतो. ती चांगली वाटली तरच मग बाकीच्या वैशिष्टय़ांकडे पाहिले जाते. ‘आरिया’ याबाबतीतही वापरकर्त्यांला
नवीन अनुभव देऊ शकतो. या फोनवरून व्हिडिओ कॉलिंग केले की समोरच्या व्यक्तीचा चेहरा फोनच्या पाच इंची स्क्रीनमध्ये पाहण्याची गरज नाही. तो चेहरा ‘होलोग्राफिक’ तंत्रज्ञानातून सरळ तुमच्यासमोर दृश्यमान होतो. म्हणजे जसाच्या तसा दिसतो. (शेजारील छायाचित्र पाहा) याशिवाय या फोनमध्ये थ्रीडी नव्हे तर ४डी व्हिडीओ पाहण्याची सुविधा असेल.
स्पीकर
जेथे व्हिडीओचं तंत्रज्ञान इतके प्रगत असेल तेथे ऑडिओ किंवा ध्वनी कसा मागे राहिल? ‘आरिया’ फोनमध्ये ‘व्हायब्रेशन ट्रान्सडय़ुसर स्पीकर’ यंत्रणा बसवलेली असेल. या यंत्रणेमुळे तुमचा फोन तुम्ही ज्या सपाट पृष्ठभागावर ठेवाल, तो पृष्ठभागच तुमचा ‘लाऊडस्पीकर’ होईल. अचाट आहे ना!
कॅमेरा
स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यांची क्षमता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ‘आरिया’ने त्याही पुढे जाऊन समोरचे दृश्य सखोल टिपणारा कॅमेरा सादर केला आहे. या ‘लायट्रो कॅमेऱ्या’तून फोटो काढल्यानंतरही तो फोटो वेगवेगळय़ा कोनांत बदलून पाहता येऊ शकतो. थोडक्यात हा फोटो ‘थ्रीडी’ दृश्य दाखवेल.
डिस्प्ले
पारदर्शक किंवा आरपार दिसणारा काचेसारखा स्मार्टफोन ही संकल्पना गेल्या काही वर्षांपासून वारंवार चर्चिली जात आहे. ‘आरिया’ने ती कल्पनेत मांडली आहे. या स्मार्टफोनचा पारदर्शक डिस्प्ले पॉलीमर ओएलईडीपासून बनलेला आणि ‘फोर के’ रिसोल्यूशन क्षमतेचा असेल.
‘आरिया’ची ही संकल्पना अद्भुत स्मार्टफोनचे चित्र आपल्यासमोर उभे करते. यामध्ये वापरलेले तंत्रज्ञान नवीन नाही. ते सध्या अन्य कोणत्या तरी उपकरणात वापरले जाते. केवळ त्याचा स्मार्टफोनसाठी वापर कसा करता येईल, हे शोधण्याचे आव्हान मोबाइल बनवणाऱ्या तंत्रज्ञांपुढे असेल. त्यामुळे ‘आरिया’सारखा स्मार्टफोन भविष्यात नक्कीच पाहायला मिळेल. कदाचित ही सगळी वैशिष्टय़े एकाच फोनमध्ये दिसतील किंवा कदाचित यातील एकेक वैशिष्टय़ निवडून बनवलेले स्मार्टफोन बाजारात येतील. पण हे सगळे चित्र भविष्यातलेच आहे. तूर्तास आपण फक्त ‘व्हॉट अ‍ॅन आरिया’ इतकंच म्हणू शकतो.
– आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com