प्रश्न – मी ६० वर्षांचा असून आम्ही दरवर्षी फिरायला जातो. अनेकांनी मला गुगल मॅपचा उपयोग करा असे सुचवले. पण याचा उपयोग काय सांगाल का?                 – देवदत्त मुळे
उत्तर –    हे अ‍ॅप आपल्याला प्रवासात दिशादर्शक म्हणून उपयुक्त आहे.  जगभरात तुम्ही कुठेही फिरायला गेलात तर हे अ‍ॅप तुमची साथ देऊ शकते. आपण कोणत्या रस्त्याने जात आहोत, आता आपण कोठे आहोत याची माहिती हे अ‍ॅप देतेच; याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे जाण्यासाठी किती वेळ लागेल, जाण्यासाठी कोणते रस्ते उपलब्ध आहेत आदी माहिती यामध्ये मिळते. तसेच यातील नव्या व्हर्जनमध्ये आपण ज्या ठिकाणी आहोत तेथील आसपासची माहितीही आपल्याला या अ‍ॅपमध्ये मिळते. यात खाण्याची ठिकाणे, दुकाने, हॉटेल्स आदींची माहितीही येथे मिळते. यामध्ये थ्रीडी नकाशे उपलब्ध आहेत. यामुळे रस्ता समजणे अधिक सोपे जाते. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. यासाठी प्रत्येक उपकरणानुसार वेगळी जागा लागते.

प्रश्न – मला यूएसबी किंवा वायफाय डोंगल घ्यायचे आहे. कोणत्या कंपनीचे डोंगल घेणे फायदेशीर होईल. या डोंगलमध्ये मला जास्तीतजास्त स्टोअरेजही हवे आहे.  -अवधूत  तांबे
उत्तर –    डोंगल घेताना नेहमी एक काळजी घ्यायची ती म्हणजे आपण जास्त वेळ हे डोंगल कुठे वापरणार आहोत त्या ठिकाणी रेंज येते की नाही. तुम्ही आता वायफाय डोंगल घेतलेले चांगले. म्हणजे एकादा तुम्ही ते जोडले की चार ते पाच उपकरणे त्या आधारे इंटरनेटला जोडता येऊ शकतात. सध्या वायफाय डोंगल एअरटेल, डोकोमो अशा मोबाइल कंपन्या पुरवीत आहेत. तुमच्या गरजेनुसार कंपन्यांचे विविध प्लॅन्स उपलब्ध आहेत.
– तंत्रस्वामी