उन्हाळय़ाच्या सुट्टीत प्रवासाला जायचे असेल तर तुम्हाला तुमच्या बॅगेत मोबाइलसोबत एक पॉवर बँक ठेवणेही गरजेचे आहे. इतकेच काय तर रोजच्या धकाधकीच्या दिनक्रमात स्मार्टफोनची बॅटरी दिवसभर पुरत नसेल तरीही पॉवर बँक तुमच्या मदतीला येऊ शकते. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा मोबाइल चार्ज ठेवू शकता. पाहूयात बाजारात कोणत्या प्रकारच्या पॉवर बँक उपलब्ध आहेत.

मी पॉवर बँक
9भारतीय बाजारात सध्या ज्या स्मार्टफोनची मोठी चर्चा आहे त्याच चिनी ब्रँडची पॉवर बँकही तितक्याच चर्चेत आहे. शिओमी या मोबाइल कंपनीने मी पॉवर बँक बाजारात दाखल केली आहे. पॉवर बँकच्या दोन आवृत्त्या बाजारात दाखल करण्यात येणार असून एक पॉवर बँक ५२०० एमएएचची आहे, तर दुसरी १०४०० एमएएचची आहे. यातील १०४०० एमएएचची पॉवर बँक सध्या फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पॉवर बँकमध्ये नऊ पातळय़ांची सर्किट चिप सुरक्षा देण्यात आली आहे. यामुळे चार्जिगच्या वेळेस आपला फोन सुरक्षित राहत़ो. ही पॉवर बँक म्हणजे एखाद्या चौकोनी ठोकळय़ासारखी दिसते, पण ती हाताळण्यास अगदी सोपी आहे. ही पॉवर बँक एकदा चार्ज केली की १५९० बॅटरी क्षमता असलेला आयफोन ५ एस चार वेळा १०० टक्के आणि एकदा ५० टक्के चार्ज होऊ शकतो.
किंमत : ९९९ रुपये.

अडाटा पीटी १०० पॉवर बँक
12मी पॉवर बँकला स्पर्धा ठरू शकणारी अडाटा या कंपनीची ही पॉवर बँक आहे. ही पॉवर बँक पण दहा हजार एमएएचची आहे. या पॉवर बँकमध्ये आयफोन ५एस चार वेळा पूर्ण चार्ज होऊ शकतो. या पॉवर बँकमध्ये दोन यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. यामुळे एकाच वेळी आपण एक अ‍ॅम्पियर क्षमतेचे चार्ज होणारे दोन उपकरणे चार्ज करू शकतो. याशिवाय या पॉवर बँकमध्ये एलईडी टॉर्चपण देण्यात आली आहे. तसेच या पॉवर बँकमध्ये सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामुळे ओव्हर डिस्चार्ज, ओव्हर करंट प्रोटेक्शन, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन, ओव्हर व्होल्टेज आणि ओव्हर चार्ज प्रोटेक्शन देण्यात आले आहे. ही पॉवर बँक अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.
किंमत : ९९९ रुपये.

एसटीकेची क्युबॉइड २
14एसटीके अ‍ॅक्सेसरीजने खास ब्रिटनमध्ये डिझाइन केलेली क्युबॉइड २ ही पॉवर बँक बाजारात आणली आहे. या पॉवर बँकची क्षमता ४००० एमएएच इतकी आहे. यामध्ये इंटलिजंट आयसीचा वापर करून दोन यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. या आयसीमुळे विजेतील चढ-उतारावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. या पॉवर बँकचा वापर करून आयफोन ५एस दोन वेळा पूर्ण चार्ज होऊ शकतो. या पॉवर बँकमध्ये एक अ‍ॅम्पिअरवर चार्ज होणारे कोणतेही उपकरण चार्ज होऊ शकते. यामध्ये देण्यात आलेल्या बॅटरीची क्षमता किमान एक हजार चार्जिग सायकल्स पूर्ण करण्याची आहे. म्हणजेच बॅटरीचे आयुर्मान खूप चांगले आहे. या पॉवर बँकचे वजन १२० ग्रॅम असून तिचा आकारही इतर क्षमतेच्या पॉवर बँकच्या तुलनेत लहान आहे. यामुळे ती प्रवासात सोबत बाळगणे सोपे जाते. ही पॉवर बँक काळय़ा, निळय़ा, गुलाबी, पांढऱ्या, हिरव्या आणि पिवळय़ा रंगांत उपलब्ध आहे.
किंमत : १२९९ रुपये.

लॅप्पीमास्टर
11संपूर्णत: भारतीय बनावटीची पॉवर बँक म्हणून लॅप्पीमास्टर या पॉवर बँकची ओळख आहे. या पॉवर बँकमध्ये दोन यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. त्यातील एकाची क्षमता ही एक अ‍ॅम्पियरची उपकरणे चार्ज करण्याची आहे, तर एकाची क्षमता दोन अ‍ॅम्पियरने चार्ज होणाऱ्या उपकरणांसाठीची आहे. याची क्षमता बारा हजार एमएएच इतकी आहे. यापेक्षा कमी क्षमतेच्या पॉवर बँकही कंपनीने उपलब्ध करून दिल्या आहेत. या पॉवर बँकच्या वरच्या बाजूला एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून त्यामध्ये बँकमध्ये किती टक्के बॅटरी उपलब्ध आहे याचा तपशील समजतो.
किंमत : विविध ई-शॉपिंग संकेतस्थळांवर ७९० रुपयांपासून पुढे उपलब्ध.

मॅक्सलाइट
13एखाद्या क्रेडिट कार्डाप्रमाणे दिसणारी ही पॉवर बँक असून ती वजनाने अत्यंत हलकी आहे. याचबरोबर आकारही खूप लहान असल्यामुळे प्रवासात नेताना सोपे होते. या पॉवर बँकची क्षमता ३००० एमएएच इतकी आहे. यामध्ये आयफोन ५एस एकवेळा १०० टक्के तर दुसऱ्यांदा ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. यामध्ये डेटा केबल वेगळी देण्यात आली नसून ती इनबिल्ट देण्यात आली आहे. यामुळे पॉवर बँक आणि डेटा केबल दोन्ही स्वतंत्रपणे घेऊन फिरण्याची गरज भासत नाही. ही पॉवर बँक अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.
किंमत : ४८९ रुपये.

पॉवरसेफ
10पॉवरसेफ या कंपनीने तीन हजार एमएएचपासून पुढील क्षमतेच्या पॉवर बँक बाजारात आणल्या आहेत. यामध्ये दोन यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. यामध्ये पॉवर बँकच्या चार्जिगची क्षमताही दर्शविली जाते. तसेच यात वापरण्यात आलेल्या बॅटरीचे आयुर्मान हे ५०० सायकलचे आहे. याचा आकारही खूप लहान असून पॉवर बँक वजनानेही हलकी आहे.
किंमत : १००० रुपये
(टिप – दिलेल्या विविध किंमतीत फरक पडू शकता, याची नोंद घ्यावी.)

पॉवर बँक घेताना घ्यावयाची काळजी
* अनेकदा पॉवर बँकमुळे मोबाइलचा चार्जिग पॉइंट खराब होण्याची शक्यता असते. यामुळे पॉवर बँक चांगल्या दर्जाचीच घ्या.
* पॉवर बँक घेण्यापूर्वी आपल्या फोनच्या बॅटरीची क्षमता तपासून घ्या. त्यानुसार पॉवर बँक घेतल्यास त्याचा योग्य वापर होऊ शकेल.
* फोन चार्ज होण्यासाठी किती अ‍ॅम्पिअरची गरज आहे हेही तपासून घ्या. याचा तपशील तुम्हाला तुमच्या फोनच्या मॅन्युअलमध्ये मिळेल. साधारणत: सर्व जुने फोन एक अ‍ॅम्पिअर क्षमतेवर चालतात. नवीन स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी दोन अ‍ॅम्पिअरची गरज पडते.
* पॉवर बँकचे वजन कमी असावे. तसेच त्याचा आकारही कमी असावा. जेणे करून प्रवासात ते हाताळणे सोपे जाईल.