सुट्टय़ाच्या कालावधीत फिरायला जाताना काही अ‍ॅप्स आपल्यासोबत असले म्हणजे आपला प्रवास अधिक सुखकर होऊ शकतो. यासाठी अ‍ॅपबारात उपलब्ध असलेले काही अ‍ॅप्स.

हॉलिडे आयक्यू
31विविध पर्यटन ठिकाणांची माहिती पुरविणारे विश्वासार्ह संकेतस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॉलिडे आयक्यूने आपले अ‍ॅपही सुरू केले आहे. या अ‍ॅपमध्ये आपल्याला देशातील दोन हजारांहून अधिक पर्यटनस्थळांची माहिती उपलब्ध आहे. तसेच ५० हजारांहून जास्त हॉटेल्स, रिसॉर्ट्स, घरगुती राहण्याची सोय, जंगल कॅम्प्स आदींची माहिती यामध्ये उपलब्ध आहेत. ही सर्व ठिकाणे शोधण्यासाठी चांगल्या दर्जाचे सर्च पर्यायही देण्यात आले आहेत. हे सर्चेस हॉटेलचे दर, आधी राहून आलेल्यांनी दिलेला दर्जा आदीनुसार उपलब्ध आहेत. याशिवाय यामध्ये एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाला विविध ठिकाणेही सुचवू शकतो. हे अ‍ॅप आपल्याला स्थानिक ट्रॅव्हल एजंटशी किंवा थेट हॉटेल्सशी संपर्क साधण्याचा पर्यायही उपलब्ध करून देते.
हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. यासाठी ११ एमबीची जागा लागते.


आयआरसीटीसी कनेक्ट

33आपण राहात असलेल्या ठिकाणापासून आपण जाऊ इच्छिणाऱ्या ठिकाणापर्यंत रेल्वेने कसे जाता येईल, इतकेच नव्हे तर आरक्षण किंवा आरक्षणाची उपलब्धता आदींची माहिती आपल्याला या अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. हे भारतीय रेल्वेचे अधिकृत अ‍ॅप असून यामध्ये आपल्याला एका गाडीच्या आरक्षणाची उपलब्धता तसेच एकाच वेळी अनेक गाडय़ांची उपलब्धता पाहता येऊ शकते. आपण या अ‍ॅपमधून एकदा आरक्षण केले की, आरक्षणात नमूद करण्यात आलेली नावे आणि त्यांचे वय अ‍ॅपमध्ये सेव्ह राहते. यामुळे भविष्यात आपण जेव्हा पुन्हा आरक्षण करतो त्या वेळेस आपल्याला पूर्वीची नावे ‘प्रवासी यादी’ या पर्यायातून घेता येतात. याशिवाय या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आयआरसीटीसीचे नवीन लॉगइन तयार करू शकतो. आपण एकदा तिकीट खरेदी केल्यावर आपल्या प्रवासाच्या आधी आपल्याला अलर्टसही या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळतात.
हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. यासाठी ५.६ एमबीची जागा लागते.

ट्रिपिगेटर
32पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ‘इन्क्रेडिबल इंडिया’ ही मोहीम हाती घेतली होती. यामध्ये पर्यटन मंत्रालयातर्फे विविध पर्यटन केंद्रांच्या विकासापासून ते तेथे सहलींचे आयोजन करण्यापर्यंत विविध उपक्रम हाती घेतले. या सर्वाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. काळाची गरज ओळखून केंद्र सरकारने- पर्यटन विभागाने नुकतेच एक मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपमध्ये देशातील विविध शहरांची माहिती देण्यात आली असून तेथे सहलीचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. या अ‍ॅपमधील आपण आपल्याला आवडते ठिकाण आणि तेथे जाण्याचा कालावधी निवडल्यानंतर त्या कालावधीत तेथील हवामान, आपण निवडलेला कालावधी तेथे जाण्यास योग्य आहे की नाही आदी माहिती देण्यात येते. याशिवाय तेथे आपल्याला पाहण्यासारखे काय आहे, तेथे आपण किती दिवस राहू शकतो आदी माहितीही देण्यात आली आहे; पण तेथील सहल ठरविण्याची सोय या अ‍ॅपमध्ये उपलब्ध नाहीए. हे अ‍ॅप अँड्रॉइडवर मोफत उपलब्ध असून यासाठी फोनमध्ये ९.९ एमबी जागा लागते.