स्वस्त आणि मस्त फोन्सबरोबरच महागडे फोनही बाजारात पुन्हा जम बसवू लागले आहेत. आपला फोन म्हणजे संगणकाला पर्याय ठरला पाहिजे, अशी अनेक वापरकर्त्यांची इच्छा असते. यामुळे महागडय़ा फोनलाही चांगली मागणी आहे. सॅमसंगने नुकताच गॅलक्सी एस६ एज नावाचा फोन बाजारात आणला आहेत. पाहूयात कसा आहे हा फोन.
रचना
या फोनची रचना अगदी वेगळी आहे. या फोनची स्क्रीन ही डाव्या आणि उजव्या बाजूला वळविण्यात आली आहे. यामुळे स्क्रीनवर वाचन करताना किंवा व्हिडीओ पाहताना त्या मूळ फाइलचा आकार अधिक मोठा होतो. यामुळे वाचन करण्यासाठी तसेच व्हिडीओ पाहण्यासाठी ही स्क्रीन खूप उपयुक्त ठरते; पण या स्क्रीनमुळे फोन धरण्यासाठी पकड मिळत नाही. विशेषत: आपण फोटो काढत असताना किंवा व्हिडीओ शूटिंग करत असताना अधिक काळजी घ्यावी लागते, तर कव्हर वापरण्यासाठीही अडचण निर्माण होते. असे असले तरी फोनची रचना आयफोन ६ला टक्कर देणारी आहे. फोनची स्क्रीन ५.१ इंचाची आहे. या फोनमुळे कमी जागेत जास्त इंचाची स्क्रीन कशी उपलब्ध करून दिली जाऊ शकते याचे संशोधन समोर आले आहे. या फोनचा कॅमेरा इतर फोनच्या तुलनेत काही प्रमाणात वेगळय़ा जागी देण्यात आला आहे. यात अ‍ॅडव्हान्स सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कमी जागेत जास्त झूमचा कॅमेरा बसविणे शक्य झाले आहे. एकूणच या फोनची रचना ही अगदी आकर्षक अशी करण्यात आली आहे. तसेच फोनला धातूचे कव्हर देण्यात आले आहे. पॉवरचे आणि आवाजाचे बटण सॅमसंगच्या इतर फोनच्या जागीच देण्यात आले आहे, पण या फोनमध्ये तुम्हाला नॅनो सिमकार्ड वापरावे लागते. तसेच या फोनमध्ये मेमरी कार्ड वापरण्यासाठी स्लॉट देण्यात आलेला नसून तशी गरजही पडत नाही. कारण फोन ३२ जीबीपासून १२८ जीबीपर्यंत उपलब्ध आहे. यामुळे हा फोन आयफोन ६च्या तोडीस तोड होतो. याचबरोबर अँड्रॉइड बाजारात आलेल्या इतर अनेक महागडय़ा पर्यायांनाही उत्तर ठरू शकतो.

स्क्रीन
या फोनमध्ये देण्यात आलेली वर्तुळाकार स्क्रीन सुपर एएमओएलईडीची आहे. यामध्ये सोळा एम रंग वापरण्यात आले असून ५.१ इंचांच्या या स्क्रीनमध्ये १४४० गुणिले २५६० पिक्सेल्स देण्यात आले आहेत. यामुळे स्क्रीनचा अनुभव एकदम उत्तम आहे. यामध्ये गोरिला ग्लास वापरण्यात आल्यामुळे स्क्रॅच गार्ड किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या स्क्रीन संरक्षणाची गरज भासत नाही. फोनची स्क्रीन अर्धवर्तुळाकार म्हणजे दोन्ही बाजूंनी वाढविण्यात आली असल्यामुळे व्हिडीओ पाहताना थिएटरमधील स्क्रीनप्रमाणे अनुभव येतो. स्क्रीन दोन्ही बाजूला वर्तुळाकार स्वरूपात देण्यात आल्यामुळे फोन आपण बसलो आहोत त्यापेक्षा वरच्या बाजूला ठेवला असेल आणि कुणाचा फोन आला तर नाव समजणे सोपे जाते.

काय आहे फोनमध्ये
या फोनमध्ये आकर्षक स्क्रीनसोबतच इतर अनेक चांगल्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे फोनमध्ये कोरटेक्स ए५३ प्रोसेसर कोअर वापरण्यात आला आहे. याचबरोबर फोनमध्ये तीन जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनची साठवणूक क्षमता आणि वापर क्षमता पाहता रॅम किमान चार जीबी असणे गरजेचे आहे. यामुळे जर तुमच्या फोनची साठवणूक क्षमता संपली, की त्याचा काम करण्याचा वेग मंदावू शकतो. याचबरोबर फोनमध्ये बॅटरी २६०० एमएएचची देण्यात आली आहे. प्रत्यक्षात बॅटरी ३५०० एमएएची असणे अपेक्षित होते म्हणजे फोन अधिक स्पध्रेत उतरला असता. जर सॅमसंगने बॅटरी क्षमता वाढविली असती तर आयफोन ६ला चांगली टक्कर झाली असती.

फोन कसा काम करतो
फोनमध्ये देण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करता फोन चांगल्या प्रकारेच काम करणार ही साधी अपेक्षा आहे. ही अपेक्षा हा फोन पूर्ण करतो. यामध्ये जास्त ग्राफिक असलेले गेम खेळणे अधिक सोपे जाते. याचबरोबर ब्राऊझिंगचा आणि टचचा वेगही जास्त आहे. फोनमध्ये असलेला व्हिडीओ लोडिंग होऊन तो प्ले होण्यासाठी लागणारा वेळही कमी लागतो. यामध्ये देण्यात आलेल्या स्पीकरचा दर्जा खूप चांगला असल्याने गाणी ऐकण्यासाठीही हा फोन उपयुक्त ठरतो. फोनमध्ये सोळा मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून त्याचा दर्जाही उत्तम आहे. विशेषत: क्लोजअप काढण्यासाठी फोन अधिक उपयुक्त ठरतो.

थोडक्यात
सॅमसंगने त्यांचे महत्त्वाचे मानले जाणारे गॅलेक्सी एस ६ या व्हर्जनपेक्षा वेगळे काही तरी आणण्याचा निर्णय घेतला आणि एजची निर्मिती झाली. हा फोन सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर अनेक पर्यायांमध्ये हा फोन तंत्रज्ञानामध्ये बाजी मारतो. मात्र फोन किमतीमध्ये काही प्रमाणात मार खाऊ शकतो. याची किंमत सुमारे ५९००० रुपये आहे. ही विविध ई-रिटेल संकेतस्थळांवर कमी होते.

मूल्यांकन
रचना : १० पैकी ८
डिस्प्ले : १० पैकी ७
सॉफ्टवेअर : १० पैकी ९
काम करण्याची क्षमता : १० पैकी ९
बॅटरी लाइफ १० पैकी ८
कॅमेरा : १० पैकी ९
– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com