स्मार्टफोनचा सारा कारभार ज्या कार्यप्रणालीवर अर्थात ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो, ती अँड्रॉइड यंत्रणा हा कुतूहलाचा विषय आहे. अ‍ॅपलच्या आयओएस आणि मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनपेक्षा बाजारात अँड्रॉइडवर आधारित फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यातच ठरावीक कालावधीनंतर गुगलने अँड्रॉइडच्या नवनवीन आवृत्त्या आणून या यंत्रणेत बदल केले. प्रत्येक नवीन आवृत्ती आधीच्या आवृत्तीपेक्षा अधिक चांगला दृश्यात्मक आणि दर्जात्मक अनुभव देणारी असल्याने नवीन आवृत्त्यांबद्दल मोबाइल ग्राहकांना उत्सुकता असते. अशातच अँड्रॉइडची सहावी आवृत्ती अर्थातच ‘एम’ येत्या काही दिवसांत जाहीर केली जाणार आहे. विशेष म्हणजे, अँड्रॉइडची पाचवी आवृत्ती असलेली ‘लॉलिपॉप’ बाजारात अजून नवीनच असताना या पंक्तीत आता ‘एम’ आद्याक्षरावरून सुरू होणारी नवीन आवृत्ती दाखल होत आहे. अधिक चांगले ग्राफिक्स इफेक्ट्स, वेगवान कामगिरी आणि दिसायला आकर्षक असलेल्या लॉलिपॉपचे ती आल्यापासून खूप कौतुक झाले आहे. मात्र, ही कार्यप्रणाली आतापर्यंत बाजारातील दहा टक्के स्मार्टफोनवरच सुरू होऊ शकली आहे. या पाश्र्वभूमीवर अँड्रॉइड ‘एम’चे येणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, अँड्रॉइड ‘एम’ची चर्चा योग्य वेळी होईलच; पण सध्या किटकॅट किंवा त्याआधीच्या अँड्रॉइड सिस्टमवर आधारित स्मार्टफोन वापरणाऱ्यांसमोर स्वस्तातले ‘लॉलिपॉप’ मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने अँड्रॉइडच्या आतापर्यंतच्या सर्वात आधुनिक आवृत्तीवर काम करणाऱ्या १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील स्मार्टफोन्सवर टाकलेला एक दृष्टिक्षेप..

क्झिओमी एमआय ४आय
ईकॉमर्स संकेतस्थळांवरील विक्रीच्या माध्यमातून अल्पावधीतच ग्राहकांमध्ये प्रचंड औत्सुक्याचा आणि पसंतीचा विषय ठरलेल्या क्झिओमीने नुकताच ‘एमआय ४ आय’ बाजारात दाखल केला. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमातून जगभरात लाँच करण्यात आलेला ‘एमआय ४ आय’ विविध वैशिष्टय़ांनी युक्त आहे. प्लास्टिक (पॉलीकाबरेनेट) बॉडी असूनही दिसायला अत्यंत आकर्षक असलेला हा स्मार्टफोन अतिशय चांगला पर्याय आहे. मात्र, यामध्ये मायक्रो एसडी कार्डसाठी ‘स्लॉट’ देण्यात आली नसल्याने फोनमध्ये उपलब्ध असलेल्या १६ जीबी इंटर्नल स्टोअरेजवरच वापरकर्त्यांला गुजराण करावी लागते.
फोनची वैशिष्टय़े:
१.७ गिगाहार्ट्झ आणि १.१ गिगाहार्ट्झच्या क्वाड कोअर क्षमतेचा ऑक्टा कोअर प्रोसेसर
दोन जीबी रॅम, ५ इंची आयपीएस एलसीडी टचस्क्रीन, १९२० बाय १०८० पिक्सेलचे स्क्रीन रेझोल्यूशन, १३ एमपी बॅक व ५ एमपी फ्रंट कॅमेरा, ३जी-४जी डय़ुअल सिम, १६ जीबी इंटर्नल स्टोअरेज, ३१२० एमएएच क्षमतेची बॅटरी.
किंमत १२९९९ रु.

आसूस झेनफोन २
स्मार्टफोनच्या बाजारात बराच काळ चांगली उत्पादने आणूनदेखील अपयशी ठरलेल्या आसूस कंपनीने अलीकडेच लाँच केलेला झेनफोन २ मालिकेतील स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अतिशय योग्य पर्याय ठरू शकतो. वेगवान कामगिरी, कॅमेरा, बॅटरी, रचना या सर्वच बाबतीत हा फोन उजवा ठरतो. आसूसच्याच चार जीबी रॅम असलेल्या झेनफोन २ची बाजारात खूप चर्चा झाली. मात्र, त्याची किंमत २० हजारांच्या आसपास आहे. याच मालिकेत आसूसने ‘झेनफोन २ झेडई५५१एमएल’ हा स्मार्टफोन बाजारात आणला असून तो लॉलिपॉपवर आधारित आहे.
फोनची वैशिष्टय़े:
अँड्रॉइड लॉलिपॉप,
१.८ गिगाहार्ट्झ क्वाड कोअर इंटेल अ‍ॅटोम प्रोसेसर
दोन जीबी रॅम
५.५ इंची आयपीएस कॅपॅसिटी टचस्क्रीनचा डिस्प्ले
१९२० बाय १०८० पिक्सेलचे रेझोल्यूशन,
डय़ुअल सिम,
१३ एमपी बॅक व ५ एमपी फ्रंट कॅमेरा,
१६ जीबी इंटर्नल स्टोअरेज (६४ जीबीपर्यंत वाढवण्याची क्षमता),
थ्रीजी-फोरजी सुविधा
३००० एमएएच बॅटरी.
किंमत:  १४९९९ रुपये (फ्लिपकार्टवर)

इंटेक्स अ‍ॅक्वा
स्टार एल
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात चांगली वैशिष्टय़े असलेले स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या इंटेक्सने आपल्या अ‍ॅक्वा मालिकेत हा लॉलिपॉप यंत्रणेवर आधारित स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कमी किंमत असतानाही हा स्मार्टफोन बरीच वैशिष्टय़े पुरवतो.
फोनची वैशिष्टय़े – पाच इंची पूर्णपणे लॅमिनेटेड आयपीएस डिस्प्ले
१.३ गिगा हार्टझचा क्वाड कोअर प्रोसेसर, एक जीबी रॅम
आठ जीबी इंटर्नल मेमरी (कार्डसह ३२ जीबीपर्यंत वाढवण्याची क्षमता)
डय़ूअल सिम, आठ एमपी बॅक व दोन एमपी फ्रंट कॅमेरा
थ्रीजी युक्त, २००० एमएएच क्षमतेची बॅटरी, किंमत ७२९९ रुपये.

मोटोरोला मोटो ई
मोटोरोला कंपनीचा हा स्मार्टफोन अतिशय खालच्या श्रेणीत ‘लॉलिपॉप’ स्मार्टफोन वापरण्याची संधी देतो. अर्थातच कमी किमतीमुळे यातील वैशिष्टय़ेही कमी दर्जाची आहेत. मात्र, कमी किमतीत ‘लॉलिपॉप’वर आधारित स्मार्टफोन वापरू पाहणाऱ्यांसाठी हा अतिशय योग्य पर्याय आहे.
फोनची वैशिष्टय़े – ४.५ इंच क्यूएचडी डिस्प्ले
१.२ गिगाहार्ट्झ क्वाडकोअर प्रोसेसर (४जीसाठी)
४जी/३जी
एक जीबी रॅम
आठ जीबी इंटर्नल स्टोअरेज (मायक्रो एसडीने वाढवण्याची क्षमता)
पाच एमपी बॅक व व्हीजीए फ्रंट कॅमेरा.
२३९० एमएएच क्षमतेची बॅटरी
किंमत ६९९९ रुपये

मायक्रोमॅक्स कॅनव्हास फायर ४  
मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास श्रेणीतील स्मार्टफोनना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. याच श्रेणीत आता आणखी एका स्मार्टफोनची भर पडली आहे. अँड्रॉइड लॉलिपॉपवर आधारित असलेला ‘कॅनव्हास फायर ४’ हा स्मार्टफोन कमी किंमत श्रेणीतील ग्राहकांना परवडणारा आणि चांगली कामगिरी करणारा फोन आहे.
फोनची वैशिष्टय़े
४.५ इंची एफडब्ल्यूव्हीजीए टचस्क्रीन डिस्प्ले
१.३ गिगाहार्ट्झचा क्वाड कोअर प्रोसेसर
एक जीबी रॅम, डय़ुअल सिम
८ एमपी बॅक आणि दोन एमपी फ्रंट कॅमेरा
थ्रीजी युक्त
र००० एमएएच क्षमतेची बॅटरी
एमएएच क्षमतेची बॅटरी
किंमत ७३९९ रुपये

– आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com