टूजीवरून फोरजीपर्यंत पोहोचलेल्या भारतीय मोबाइल तंत्रज्ञानाला पूरक उपकरणांची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढू लागली आहे. मोबाइल कंपन्या फोरजीचे फोन बाजारात आणू लागली आहेत. सन २०१५च्या पहिल्या तिमाहीचा विचार करता या मागणीत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या आणि लवकरच बाजारात येणाऱ्या फोरजी उपयुक्त फोन्सविषयी जाणून घेऊ या.
शिओमी मी ४
शिओमी या कंपनीने भारतीय बाजारपेठेत चांगलाच जम बसविला आहे. फ्लिपकार्ट या ई-शॉपिंग संकेतस्थळावर हा फोन उपलब्ध असून या कंपनीचे एकूण मागणीत ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे नुकतेच एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. या कंपनीने गेल्या वर्षांपासून फोरजी तंत्रज्ञानास पूरक फोन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मी ४ हा फोन व खास भारतीयांसाठी २ जुलै रोजी बाजारात येणारा ४ आय या फोनला चांगली मागणी असल्याचे चित्र आहे. मी ४ या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८०१ क्वलाकॉम क्वाड कोर २.५ गिगाहार्टझ प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये ३ जीबी रॅम देण्यात आली आहे. यामुळे फोन एकदम वेगवान होतो. यात उच्च रंगांसाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे फोन १७ टक्के अधिक उजळ होतो. फोनमध्ये सोनीचा वेगवान १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे, तर फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. मी ४ आय हा खास भारतीयांसाठी बनविण्यात आला असून यामध्ये डय़ुएल सिम असून दोन्ही फोर जी तंत्रज्ञानास पूरक आहेत. यात मी ४ सारख्याच सुविधा असल्या तरी रॅम २ जीबी आहे.
किंमत – मी ४-१४९९९ आणि मी ४ आय-१२९९९ रुपये

एचटीसी डिझायर ८२०
या फोनला ५.५ इंचाची स्क्रीन आहे. यामध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसर आहे. याचबरोबर एड्रेन ४०५ जीपीयू आहे. यामध्ये अँड्रॉइडची किटकॅट ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टम असून फोन अँड्रॉइडच्या नव्या लॉलीपॉप या ऑपरेटिंग सिस्टमवरही काम करू शकतो. या फोनची खासियत म्हणजे या फोनमध्ये तब्बल १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, तर फोनचा फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा आहे. यामुळे सेल्फीजसाठी हा फोन अधिक चांगला ठरतो. हा फोन एक सिम कार्ड आणि दोन सिम कार्ड सुविधेमध्ये उपलब्ध आहे.
किंमत : याची किंमत विविध ई-रिटेल संकेतस्थळांवर वेगवेगळी आहे. ती २१ हजारापासून ते २५ हजार रुपयांपर्यंत आहे.
लिनोवा वाइब एक्स २
लिनोवा या कंपनीने वाइब एक्स २ हा ‘फोर जी’ फोन बाजारात आणला आहे. या फोनमध्ये पाच इंचाची स्क्रीन असून त्याला तीन पातळय़ांची आकर्षक डिझाइन आहे. या फोनमध्ये दोन गिगाहार्टझचा ऑक्टा कोर मीडिया टेक एमटी ६५९५ प्रोसेसर आहे. हा फोन अँड्रॉइड किटकॅट या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनला १३ मेगापिक्सेलचा ऑटो फोकस रेअर कॅमेरा असून त्याला एलईडी फ्लॅशही आहे. याला फ्रंट कॅमेरा पाच इंचाचा आहे. हा फोन डय़ुएल सिमचा आहे. यात दोन जीबी रॅम आणि ३२ जीबीची अंतर्गत मेमरी स्टोअरेज स्पेस आहे. यामध्ये बॅटरी २३०० एमएएचची देण्यात आली आहे.
किंमत : हा फोन फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर उपलब्ध असून याची किंमत १९९९९ रुपये इतकी आहे.

नोकिया ल्युमिया ६३८
मायक्रोसॉफ्ट या कंपनीने ग्राहकांची गरज ओळखून नोकिया ल्युमिया ६३८ हा मोबाइल नुकताच भारतीय बाजारपेठेत दाखल केला आहे. हा मोबाइल ‘फोर जी’साठी उपयुक्त हार्डवेअर असलेला असून तो खूप स्वस्तही आहे. या मोबाइलच्या विक्रीसाठी कंपनीने अ‍ॅमेझॉन या ई-व्यापार संकेतस्थळाशी सहकार्य केले आहे. या ठिकाणी ग्राहकांना हा मोबाइल अधिक चांगल्या किमतीमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. विंडोज ८.१ या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारा हा मोबाइल असून याचा डिस्प्ले ४.५ इंचाचा आहे. यात क्वाड कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असल्यामुळे तो अधिक जलद काम करू शकतो. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामसारखे अ‍ॅप्स जलद गतीने काम करू शकतात असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये बॅटरी क्षमता १८३० एमएएचची देण्यात आली आहे. यामुळे दिवसभर मोबाइल वापरूनही बॅटरी कमी संपते. यामध्ये पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून त्यामध्ये ल्युमिया कॅमेरा आणि सिनेमाग्राफ हे दोन खास फोटो अ‍ॅप्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये एक जीबी रॅम देण्यात आली असून यात आठ जीबीअंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी आपण एसडी कार्डच्या साहय़ाने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो.
किंमत : ५५०० रुपये. (अ‍ॅमेझॉनवर)

फोर-जी म्हणजे काय व ते कसे काम करते
ेफोरजीच्या फोनचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. थ्रीजीच्या ऐवजी फोरजीच्या फोन्सची विक्री चांगलीच वाढत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. मोबाइलमधील इंटरनेटवरूनच कार्यालयाची असोत किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महाविद्यालयातील किंवा शालेय कामे असोत, सर्व कामे करण्याची पद्धत भारतात चांगलीच रूढ झाली आहे. यामुळेच टूजी, थ्रीजीपाठोपाठ आता आणखी वेगवान फोरजी नेटवर्कची सुविधा देशातील विविध शहरांमध्ये सुरू झाली आहे. या सेवेत एअरटेलने आघाडी घेतली असली तरी रिलायन्स जीओ आणि इतर प्रस्थापित मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या या सेवेत उडी घेऊ इच्छित आहेत.
फोर्थ जनरेशनचे संक्षिप्त नाव म्हणजे फोरजी. मोबाइल टेलिकम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीची चौथी जनरेशन असा त्याचा अर्थ होतो. थ्रीजीनंतरचा आणि फाइव्हजी पूर्वीचा हा टप्पा आहे. थ्रीजीपेक्षा पाचपटीने जास्त वेग असणारे फोरजी इंटरनेट ब्राऊजिंगचा सर्वोत्तम अनुभव देते. याचा एवढा वेग असतो की, ३० मिनिटांपेक्षाही कमी काळात १० चित्रपट डाऊनलोड करता येणे शक्य होते. २०१२च्या एप्रिल महिन्यामध्ये कोलकात्यामध्ये फोरजी सेवा लाँच करणारी एअरटेल ही देशातली पहिली कंपनी होती. या लाँचमुळे, फोरजीच्या जागतिक लाँचला समांतर लाँच करून ती सेवा व्यावसायिकदृष्टय़ा राबवणाऱ्या देशांमधला एक देश अशी भारताची ओळख बनली. फेब्रुवारी २०१४ मध्ये बंगळुरूमध्ये एअरटेलने मोबाइलसाठी फोरजी सेवा सादर केली. एअरटेल वायफाय, सीपीईज, डाँगल्स आणि मोबाइल फोन्स अशा सर्व माध्यमांमध्ये फोरजीसाठी परवडण्याजोगे आणि पशाचे पुरेपूर मूल्य देणारे अनेक मनी पॅक्स आणि प्लान्स देतो. एअरटेल फोजी सेवा सध्या भारतातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. यात मुंबई ठाणे परिसरातील शहरांचाही समावेश आहे. सध्या एअरटेलला फोरजीमध्ये फारशी स्पर्धा नसली तरी कंपनीतर्फे थ्रीजीच्या दरात फोरजीची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. फोरजी सेवा घेतली आणि ती सेवा ज्या भागात नसेल त्या भागात इंटरनेट सुविधा मिळणार की नाही या प्रश्नाला उत्तर देताना एअरटेल फोरजीचे विपणन प्रमुख नितीन बुरमान म्हणाले की, ज्या ठिकाणी फोरजी नसेल त्या ठिकाणी ग्राहकांना प्लॅटिनम थ्रीजीची सुविधा मिळेल. तेही नसेल तर थ्रीजी आणि तेही नसेल तर टूजी नेटवर्क मिळत राहणार म्हणजे ग्राहक कोणत्याही परिस्थितीत इंटरनेटपासून वेगळा होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. याचबरोबर ज्या ग्राहकांकडे फोरजी मोबाइल नाही अशा ग्राहकांसाठी एअरटेलने मायफाय उपकरण बाजारात आणले आहे. अवघ्या २२९९ रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या उपकरणात आपण एअरटेलचे सिमकार्ड घातले आणि फोरजी सुरू केली, की एकाच वेळी आपण १० उपकरणांवर फोरजीचा अनुभव घेऊ शकतो, अशी माहितीही बुरमान यांनी दिली.

– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com