थ्रीजी, फोरजी, वायफाय यांच्या उपलब्धतेमुळे इंटरनेट अतिशय वेगवान आणि कमी खर्चीक बनले आहे. यामुळे इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. याचा फायदा ‘म्युझिक स्ट्रिमिंग’ अर्थात इंटरनेटच्या माध्यमातून संगीत सेवा पुरवणाऱ्या अ‍ॅप्स आणि वेबसाइटस्नादेखील होत आहे. भारतात ‘अविरत संगीत सेवा’ पुरवणाऱ्या अशाच काही अ‍ॅप्स आणि संकेतस्थळांबद्दल..
प्राचीन काळापासून संगीत हे मानवाच्या मनोरंजनाचे सर्वात मोठे माध्यम राहिले आहे. गेल्या शेकडो वर्षांत संगीताचे नाना प्रकार उदयाला आले. संगीताचा आनंद देणारी वेगवेगळी साधने, उपकरणे उपलब्ध झाली. सातासमुद्रापलिकडील देशांतील संगीतही सहज कानी पडू लागले. या सर्वामुळे संगीताबद्दलची मानवी ओढ कायम राहिली आहे. त्यामुळेच मोबाइल खरेदी करताना त्यातील संगीताच्या ध्वनीचा दर्जा (साऊंड क्वालिटी), गाणी साठवण्यासाठी उपलब्ध जागा (स्टोअरेज) आणि म्युझिक प्लेअर यांचा विचार अग्रक्रमाने होतो. मात्र अनेकदा इच्छा असतानाही स्टोअरेजच्या मर्यादेमुळे आपल्याला हवी तितकी गाणी मोबाइलमध्ये साठवून ठेवता येत नाहीत. मात्र, वेगवान इंटरनेटने आता यावरही पर्याय शोधला आहे. वापरकर्त्यांना हजारो गाण्यांचे विश्व खुले करून देणारी ‘म्युझिक स्ट्रिमिंग’ सेवा भारतातही आता चांगलीच लोकप्रिय ठरू लागली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात भारतात दहाहून अधिक वेगवेगळ्या ‘म्युझिक स्ट्रिमिंग’ सेवा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतांश सेवा विनामूल्य असल्याने अगदी जुन्या गाण्यापासून कालपरवा आलेल्या गाण्यापर्यंत आणि शास्त्रीय संगीतापासून पॉपपर्यंतची शेकडो गाणी वापरकर्त्यांना ऐकणे सहज शक्य झाले आहे.
अ‍ॅपल म्युझिक : ‘म्युझिक स्ट्रिमिंग’ क्षेत्रात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या अ‍ॅपलने पदार्पणातच असंख्य श्रोत्यांची मने जिंकली आहेत. इंडियन क्लासिक, रॉक अशा विविध शैलींखेरीज (जान्र) व्यायाम करताना किंवा धावण्याचा सराव करताना ऐकण्यासाठीच्या गाण्यांची वर्गवारीही ‘अ‍ॅपल म्युझिक’वर उपलब्ध आहे. ‘अ‍ॅपल म्युझिक’चा ‘बीट वन’ रेडिओही अमर्याद संगीताचा ‘एफएम’सारखा आनंद देतो. विशेषत: यावरील आंतरराष्ट्रीय संगीत संग्रह अप्रतिम आहे. याउलट भारतीय संगिताचा संग्रह मात्र ‘अ‍ॅपल म्युझिक’वर पुरेसा नाही.
अ‍ॅपल म्युझिक पहिले तीन महिने मोफत आहे. मात्र, त्यानंतर त्यावर दरमहा १२० रुपये शुल्क आकारले जाते. याशिवाय ‘अ‍ॅपल म्युझिक’ वापरण्यासाठी ‘आयटय़ून्स’ असणे आवश्यक आहे. त्यामुळे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवरील संगणकांवर ‘अ‍ॅपल म्युझिक’ सुरू होण्यात वेळ जातो.
वींक : ‘एअरटेल’ने सुरू केलेली ‘वींक’ ही संगीत सेवा भारतीय संगीतप्रेमींसाठी अतिशय उपयुक्त आहे. ‘वींक’वर जवळपास सर्व भारतीय संगीतप्रकारांचा संग्रह उपलब्ध आहे. ‘वींक’च्या संकेतस्थळाच्या होमपेजवर गाण्यांच्या विविध प्रकारांची रचना अतिशय सुसंगतपणे पाहता येते. त्यामुळे ‘होम पेज’वरूनच आपल्याला हवी ती गाणी निवडून ऐकता येतात. शिवाय समोर न दिसणारी गाणी ‘सर्च’ करून मिळवता येतात.
‘वींक’ची सेवा एअरटेलच्या ग्राहकांसाठी अतिशय स्वस्त आहे. तर अन्य कंपन्यांच्या ग्राहकांना दरमहा १०० गाणीच विनाशुल्क ऐकता येतात. त्यानंतर त्यांना दरमहा ९९ रुपये मोजावे लागतात. याउलट एअरटेलच्या ग्राहकांना अमर्याद संगीतश्रवणाचा आनंद घेता येतो. शिवाय दरमहा केवळ २९ रुपये मोजून ते गाणी डाऊनलोडही करू शकतात.
गाना : आजघडीला भारतात सर्वाधिक लोकप्रिय ‘म्युझिक स्ट्रिमिंग सेवा’ म्हणून ‘गाना’चा उल्लेख करता येईल. वेबपासून अ‍ॅपपर्यंत सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या ‘गाना’वर तुम्ही तुमचे मित्र काय गाणी ऐकत आहेत, हेही जाणू शकतात. ‘गाना’वरील भारतीय गाण्यांचा संग्रह चांगला आहे. मात्र, अलीकडच्या काळात आलेल्या गाण्यांचा ‘टॉप २०’ संग्रह येथे ऐकायला मिळत नाही.
दरमहा १२० रुपये मोजून तुम्ही ‘गाना’वरील गाणी अमर्याद ऐकू वा डाऊनलोड करू शकता. ही गाणी ३२० केबीपीएसची असल्याने त्यांचा दर्जा चांगला आहे.
सावन : ‘सावन’ ही भारतात अगदी सुरुवातीपासून लोकप्रिय असलेली ‘म्युझिक स्ट्रििमग’ सेवा आहे.  ‘सावन’वरदेखील भारतीय गाण्यांचे चांगले कलेक्शन आहे. शिवाय वेगवेगळ्या वर्गवारीनुसार तुम्हाला गाणी निवडून ऐकता किंवा डाऊनलोड करता येतात. ‘सावन’वर प्रादेशिक भाषांतील गाण्यांचाही चांगला संग्रह आहे. गाणी ‘लोड’ होण्यासही जास्त वेळ लागत नाही.
‘सावन’वर १२० रुपयांत ३ जीबीपर्यंतची भारतीय संगीत किंवा गाणी डाऊनलोड करता येतात. त्यामुळे ३२० केबीपीएसची गाणी डाऊनलोड करायला गेल्यास १२० रुपयांत फारच मर्यादित गाणी डाऊनलोड करता येतात.
हंगामा : वेबसाइटवरून म्युझिक स्ट्रिमिंग पुरवणाऱ्यांत ‘हंगामा’ सर्वात जुना भिडू आहे. ‘हंगामा’चे मोबाइल अ‍ॅपही नवीन स्वरूपात आले आहे. शिवाय आयओएसवरही ते लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. इंग्लिश आणि हिंदीशिवाय हंगामावर पाच भाषांतील गाणी उपलब्ध आहेत. हंगामावरील भारतीय गाण्यांचा संग्रह अतिशय उत्तम आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय गाणी फारशी नाहीत. हंगामावर दरमहा १२० रुपये भरून अमर्याद गाणी डाऊनलोड करता येतात.
प्रतिनिधी