तंत्रज्ञानात रोज नवीन काही ना काही येत असते. यामध्ये मोबाइलपासून ते दैनंदिन जीवनातील उपयुक्त वस्तूंपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. तंत्रज्ञानाच्या या बाजारपेठेत नव्याने काय काय आले आहे यावर एक झलक.

लॅनटर्न
केमट्रोल्स सोलर या सौर ऊर्जेत काम करणाऱ्या कंपनीने नुकतेच काही सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे 6बाजारात आणली आहेत. यामध्ये लॅनटर्न नावाचे उपकरण असून या उपकरणाचा वापर दिवा म्हणून करू शकतो, त्याचबरोबर चार्जर म्हणूनही करू शकतो. एखाद्या प्लास्टिकच्या बाटलीप्रमाणे दिसणाऱ्या या उपकरणाला बॅटरीपासून जोडणी देण्यात आली आहे. ही बॅटरी सौर ऊर्जेवर चार्ज होते. एकदा चार्ज झाले की सतत २० तास काम करण्याची या लनटर्नची क्षमता आहे. यामध्ये आपल्याला टय़ुब लाइटसारखा उजेड मिळतो. याचबरोबर या दिव्यासोबतच मोबाइल चार्जिगसाठी दोन विशेष पोर्ट देण्यात आले आहेत. याचा वापर करून आपण अगदी स्मार्टफोनही चार्ज करू शकतो. शिवाय या उपकरणामध्ये एफएम रेडिओही देण्यात आला आहे. याशिवाय कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारा होमवर्क लाइटही बाजारात आणला आहे. टेबल लॅम्पप्रमाणे काम करणारा हा दिवा विद्यार्थ्यांना अभ्यास करताना विजेची जोडणी नसलेल्या ठिकाणीही टेबलवर ठेवून वापरता येऊ शकतो. ही उत्पादने वजनाने कमी व्हावीत, यासाठी यामध्ये लिथियम लिऑन किंवा अल्कालाइन बॅटरीजचा वापर केला जातो. ही उत्पादने ७४९ रुपयांपासून ते २९४९ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

इन्स्टॅक्स वाइड
फुजिफिल्म या कॅमेरा बनविणाऱ्या कंपनीने नुकताच इन्स्टॅक्स वाइड ३०० हा इन्स्टण्ट कॅमेरा बाजारात 5आणला आहे. हा कॅमेरा फोटोग्राफी आर्ट वर्क, प्रोफेशनल वर्क, लग्न समारंभाचे छायाचित्रण आदीसाठी उपयुक्त आहे. या कॅमेरामध्ये ४० से.मी. अंतरावरचे फोटो घेण्यासाठी क्लोझअप लेन्स देण्यात आली आहे. याशिवाय कमी प्रकाशातील छायाचित्रणासाठी स्वयंचलित फ्लॅश, फोटोचा अचूक मूड टिपण्यासाठी लायटन आणि डार्कन कंट्रोल हे पर्याय देण्यात आले आहेत. तसेच बॅक लाइट्सचा वापर करून छायाचित्रण करण्यासाठी फिल-इन फ्लॅशचाही पर्याय देण्यात आला आहे. ग्रुप फोटोग्राफीसाठी ट्रायपॉड सॉकेट, फोकल झूम डायल (९०से.मी.-३मी.) आणि युझर फ्रेंडली इंटरफेसद्वारे हा कॅमेरा वापरण्यासाठी अधिक सोपा होतो. स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक फ्लॅश आणि लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेने युक्त या कॅमेऱ्याची क्षमता दहा फिल्म पॅक्सची आहे. या कॅमेऱ्याची किंमत ९५०० रुपये इतकी आहे.

विवो स्मार्ट फोन
विवो स्मार्ट फोन कंपनीने भारतात नुकतीच फोनची व्हिगर मालिका दाखल केली. यामध्ये फोरजी 7नेटवर्कसुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अ‍ॅण्ड्रॉइडची ५.० ही आवृत्ती आहे. या फोनची स्क्रीन पाच इंचांची हाय डेफिनेशनची आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४१० क्वाड कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनमध्ये दोन जीबी रॅम आणि सोळा जीबी रॉम आहे. यात १२८ जीबीपर्यंतची एक्स्पाण्डेबल मेमरीची सुविधाही आहे. फोन डय़ुएल सिम असून त्याची बॅटरी क्षमता २३०० एमएएच इतकी आहे. फोमध्ये मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा असून फ्रंट कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा आहे. या फोनची किंमत १५ ते २० हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

अ‍ॅप बाजार
क्विक – तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेला असाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारणार. पण प्रत्येक वेळी लोक तुम्हाला योग्य ती माहिती देतीलच असे नाही. अशा वेळी तुम्हाला गुगल प्लवर उपलब्ध असलेले ०८ या नावाचे अ‍ॅप मदत करू शकते. या अ‍ॅपमध्ये आपण असलेल्या ठिकाणच्या दुकानांपासून ते वेडिंग मॅनेजपर्यंतच्या सर्व गोष्टींची माहिती उपलब्ध होते. या अ‍ॅपमध्ये आपण एकदा आपली नोंदणी केली की आपल्याला पाहिजे ती माहिती अ‍ॅपमध्ये शोधली की आपण राहत असलेल्या परिसरात त्याच्याशी संबंधित किती तरी गोष्टी उपलब्ध आहेत याचा तपशील आपल्या डोळय़ांसमोर येतो. यातील विविध पर्याय आपण निवडू शकतो. हे अ‍ॅप आयआयटी मुंबई आणि आयआयटी खडकपूर येथील माजी विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे.

वेओझ – तुम्हाला पाहिजे त्याच आणि पाहिजे त्या भाषेत बातम्या वाचायच्या असतील तर या अ‍ॅपचा तुम्ही 9वापर करू शकता. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या परिसरातील बित्तंबातमी समजू शकते. इतकेच नव्हे तर देशातील आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावाही या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला मिळतो. या अ‍ॅपमधून ४० हून अधिक देश आणि २००० हून अधिक शहरांच्या बातम्या तुम्हाला समजू शकता. सध्या हे अ‍ॅप इंग्रजीबरोबरच दहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयांचे पर्याय दिले की त्याचा तपशील तुम्हाला सहज अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध होतो. हे अ‍ॅप गुगल प्लेवर veooz या नावाने शोधल्यावर उपलब्ध होईल.