प्रश्न – सार्वजनिक वाय-फाय वापरताना कोणती काळजी घेता येईल हे सुचवा. – अमोल यादव
उत्तर – अ‍ॅण्ड्रॉइड उपकरण हॅकर्सपासून वाचविण्यासाठी सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची असते ती म्हणजे नेटवर्क सुरक्षेची. सध्या अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फायची सुविधा दिली जाते. पण मोफत वाय-फायचे नेटवर्क शंभर टक्के सुरक्षित असतेच असे नाही. यामुळे शक्यतो ते वापरणे टाळा. अगदीच तुम्हाला वापरायचे असेल तर त्या नेटवर्कचा वापर करून बँकिंगचे व्यवहार करणे टाळा. कारण अशा ठिकाणी हॅकर सहजपणे तुमच्या फोनमधील माहिती उचलून घेऊ शकतो. यावर उपाय म्हणजे तुम्ही तुमची माहिती हाइडनिंजा व्हीपीएनसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून वाचवू शकता. या अ‍ॅप्समुळे तुमच्या माहितीचे आऊटगोइंग कनेक्शन हे नेहमी अनक्रिप्टेड असेल. या अ‍ॅप्समुळे कुणालाही सहजासहजी तुमची माहिती मिळवता येणार नाही. याचबरोबर तुम्ही वायफाय प्रोटेक्टरसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून खुल्या वायफाय जोडणीतील सुरक्षित जोडणी मिळवू शकता.

प्रश्न – व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशांचा बॅकअप कसा घ्यायचा – शेखर पितळे
उत्तर – व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशांचा बॅकअप घेणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या ऑप्शनमध्ये जा. तेथे सेटिंग्जमध्ये जा. यानंतर त्यात चॅट हिस्ट्री नावाचा पर्याय असेल त्यावर क्लिक करा. यानंतर बॅकअप चॅट हिस्ट्री हा पर्याय निवडा. यानंतर तुमच्या चॅट हिस्ट्रीचा बॅकअप घेतला जाईल. तसेच तुम्ही चॅट हिस्ट्रीचा बॅकअप दिवसांतून कोणत्याही एका वेळी घेऊ शकता. यासाठी तुम्ही त्यातील पर्याय निवडल्यास रोज त्या ठरावीक वेळी तुमच्या संदेशांचा बॅकअप घेतला जाईल. जर तुम्हाला बॅकअप दुसऱ्या फोनमध्ये रिस्टोअर करावयाचा असेल तर सर्व बॅकअप तुम्ही मेमरी कार्डवर घेऊन ते मेमरी कार्ड दुसऱ्या फोनमध्ये घालून त्या फोनमध्ये तुम्ही ही सर्व माहिती रिस्टोअर करू शकता.