मोबाइल हा आता मनुष्याचा जिवाभावाचा सवंगडी झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाइल आपल्या सोबतीला असतो. संभाषणापासून चॅटिंगपर्यंत आणि गेमिंगपासून गाणी ऐकण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत आवश्यक बनलेला मोबाइल अचानक कुठे गायब झाला तर..?

स्मार्टफोन हरवणे किंवा चोरीला जाणे ही गोष्ट अतिशय त्रासदायक असते. फोन हरवण्यामुळे नवीन फोन घेण्याचा आर्थिक भरुदड पडतोच. पण त्यासोबतच नवीन सिमकार्ड घेणे, त्यात नव्याने कॉन्टॅक्ट्स जमवणे, अ‍ॅप्स लोड करणे असा खटाटोप पुन्हा करावा लागतो. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनमध्ये असलेली आपली गोपनीय माहिती कुणाच्या हातात पडली असल्याने त्यामुळे होणाऱ्या नुकसानाची टांगती तलवार डोक्यावर असतेच. पण हे सर्व करण्याआधी, जेव्हा मोबाइल आपल्याजवळ नाही, याची जाणीव होते, तेव्हाची अवस्था अतिशय सैरभैर करणारी असते. अशा परिस्थितीत आपल्याला प्रश्न पडतो तो ‘माझा मोबाइल कुठाय?’
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पोलिसांकडे जायच्या आधीही तुम्ही तुमच्या मोबाइलचं सध्याचं लोकेशन शोधू शकता. बहुतेक सर्वच स्मार्टफोनमध्ये तशी यंत्रणा उपलब्ध असते. या यंत्रणेच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाइलचं अतिशय अचूक ठिकाण शोधू शकता.

आयफोन
अ‍ॅपलच्या आयफोनमध्ये ‘माय आयफोन’ नावाची सुविधा कार्यरत असते. ही सुविधा तुमच्या फोनचे सध्याचे ठिकाण दर्शवते. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आयफोनवर ही सुविधा ‘ऑन’ करावी लागेल.
* तुमच्या आयफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘आयक्लाउड’वर क्लिक करा. तेथून ‘फाइंड माय फोन’वर जा. या ‘टॅब’च्या पुढील स्विच ‘ग्रीन’ आहे का, याची खातरजमा करून घ्या.
* ही सुविधा ‘ऑन’ असेल तर तुम्ही अन्य आयफोन किंवा आयपॅड किंवा ब्राउजरवरून तुमचा हरवलेला आयफोन शोधू शकता.
* त्यासाठी तुम्हाला तुमच्या ‘आयओएस’ उपकरणावर ‘माय आयफोन’ हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.
* तुमच्या ‘आयक्लाउड’ अकाउंटसह या अ‍ॅपवर लॉग इन करा. (तुम्ही ज्या आयफोनचे लोकेशन शोधत आहात. त्यावरील ‘आयक्लाउड’ अकाउंटचाच लॉगइन आयडी वापरा.)
* तुम्ही लॉग इन करताच. या लॉगइन आयडीची नोंद असलेले सर्व ‘डिव्हाइस’ तुम्हाला तेथे दिसतील.
* ज्या फोनचे ठिकाण शोधायचे आहे, त्याच्या नावावर ‘क्लिक’ करा.
* तुमचा आयफोन हरवला असेल तर तो सध्या कुठे आहे, याची माहिती तुम्हाला यातून मिळेल. याशिवाय या अ‍ॅपवर आणखीही काही सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
* या अ‍ॅपच्या तळाशी ‘प्ले साउंड’,‘लॉस्ट मोड’ आणि ‘इरेज आयफोन ऑर आयपॅड’ अशी तीन बटणे दिसतील.
* ‘प्ले साउंड’ वर ‘क्लिक’ केल्यास तुमचा हरवलेल्या आयफोनमधून जोरजोरात अलार्म वाजण्यास सुरुवात येईल. या माध्यमातून तुम्ही तुमचा जवळपास हरवलेला फोन शोधू शकता.
* ‘लॉस्ट मोड’वर क्लिक करताच तुम्ही वेगळय़ा ‘पेज’वर पोहोचता. येथे तुम्हाला एक चार आकडी पासकोड टाकावा लागतो. या पासकोडच्या साह्याने तुम्ही तुमचा हरवलेला आयफोन ‘लॉक’ करू शकता. म्हणजे, ज्या व्यक्तीला आयफोन सापडला असेल तो त्याचा वापर करू शकणार नाही. (अर्थात, तुम्ही फोन हरवण्याआधी हा पासकोड सेट केला असेल तरच तुम्हाला हे करता येते.)
* ‘लॉस्ट मोड’मध्ये तुम्ही तुमचा दुसरा फोन नंबर आणि मेसेज टाइप करून हरवलेल्या आयफोनवर पाठवू शकता. या माध्यमातून तुम्ही तुमचा आयफोन ‘ट्रॅक’ही करू शकता.
* ‘इरेज आयफोन ऑर आयपॅड’ या सुविधेच्या साह्याने तुम्ही तुमच्या हरवलेल्या आयफोन व आयपॅडवरील सर्व डेटा हटवू शकता. तुमच्या आयफोनमधील व्यक्तिगत माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी तुम्हाला हे करता येईल. मात्र, तसे केल्यास पुढे तुम्ही तुमच्या आयफोनचे ‘लोकेशन’ही शोधू शकणार नाही.
* या सर्व गोष्टी तुम्ही ‘आयक्लाएड’च्या वेबसाइटवरूनही करू शकता.

अ‍ॅण्ड्रॉइड
अ‍ॅण्ड्राइड फोन शोधण्याची प्रक्रिया ‘माय आयफोन’सारखीच आहे. तुम्ही अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर किंवा वेबसाइट या दोन्ही मार्गानी तुमचा फोन शोधू शकता. (वेबसाइट: https://www.google.com/android/devicemanager)
* गुगलवर ‘फाइंड माय अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइस’ असे सर्चवर टाकताच तुम्हाला स्क्रीनवर तुमचा जी-मेल आयडी विचारला जातो किंवा दुसऱ्या अ‍ॅण्ड्रॉइड फोनवर अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर अ‍ॅप डाउनलोड करा.
* अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइस मॅनेजरमध्ये जाऊन तुमच्या हरवलेल्या फोनशी संबंधित गुगल अकाउंटने ‘लॉग इन’ करा.
* लॉग इन करताच तुम्हाला तुमच्या अ‍ॅण्ड्रॉइड फोनचे लोकेशन पाहता येईल.
* मॅपवर दाखवणारे हे लोकेशन बऱ्यापैकी अचूक असते.
* याशिवाय तुम्हाला ‘िरग’, ‘लॉक’ आणि ‘इरेज’ असे तीन पर्याय येथेही पाहायला मिळतील.
* यापैकी ‘िरग’चे बटण दाबताच तुमचा फोन पाच मिनिटे जोरात ‘िरग’ होतो. या माध्यमातून तुमचा फोन जवळपासच असेल तर तुम्हाला शोधून काढता येईल.
* ‘लॉक’चे बटण दाबताच तुम्हाला नवीन पासवर्ड टाकण्याविषयी विचारणा होते. तो टाकल्यानंतर तुम्ही तुमचा फोन लॉक करू शकता. आता हा पासवर्ड टाकल्याशिवाय कुणीही तुमचा फोन ‘अनलॉक’ करू शकणार नाही.
* ‘इरेज’ बटणाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फोन पूर्णपणे ‘फॅक्टरी रिसेट’ करू शकता.

विंडोज
‘विंडोज’ ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित फोन हरवल्यास तो शोधता येतो. मात्र, त्यासाठी या फोनमधील ‘फाइंड माय फोन’ सेटिंग ‘ऑन’ असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये ही सुविधा ‘ऑन’च ठेवा. तसेच ‘युज पुश नोटिफिकेशन’चे बटण चालू करा.
* तुमचा फोन हरवल्यास तुम्ही कॉम्प्युटर किंवा अन्य फोनच्या साह्याने तुमचा हरवलेला फोन शोधू शकता.
* त्यासाठी ‘विंडोज फोन’च्या वेबसाइटवर जा. तेथे तुमच्या मायक्रोसॉफ्ट अकाउंटने ‘लॉग इन’ करा.
* ‘लॉग इन’ होताच तुम्हाला तेथील यादीत तुमचा ‘विंडोज फोन’ दिसेल.
* त्यावर ‘फाइंड माय फोन’ बटण दाबल्यास त्या फोनचे ‘लोकेशन’ समजू शकेल.
* तुम्ही ‘युज पुश नोटिफिकेशन’ ऑन ठेवले असेल तर तुम्हाला तुमचा फोन सहज ट्रॅक करता येईल.
* या फोनमध्येही अन्य ऑपरेटिंग सिस्टीमप्रमाणे िरग, लॉक आणि इरेज हे तीन पर्याय दिले जातात. ते हाताळण्याची पद्धत आणि त्यांचा उपयोगदेखील सारखाच आहे.