मायक्रोसॉफ्टची नवी संगणकीय कार्यप्रणाली अर्थात ऑपरेटिंग सिस्टिम ‘विंडोज १०’ गेल्या बुधवारपासून अधिकृतपणे वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाली आहे. विंडोज ७ आणि विंडोज ८.१ ही ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्यांना ‘विंडोज १०’ विनामूल्य अपग्रेड करता येईल, असे मायक्रोसॉफ्टने जाहीर केले आहे. त्यासाठी या संगणकांवर अपडेट पाठवण्यात येतील, असेही मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे. मात्र, मायक्रोसॉफ्ट विंडोज वापरणाऱ्यांची जगभरातील संख्या पाहता हे अपडेट्स मिळेपर्यंत बराच वेळ जाण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर घरबसल्या कोणत्याही विलंबाविना तुमचा डेस्कटॉप ‘विंडोज १०’युक्त करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पर्यायांच्या साह्याने ‘विंडोज १०’वर अपग्रेड होण्यापूर्वी या ऑपरेटिंग सिस्टिमची वैशिष्टय़े आणि त्यासाठी आवश्यक बाबी नक्की तपासून पाहा.
पर्याय एक :
’तुमच्या संगणकाची विद्यमान ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज ७ एसपी१ किंवा विंडोज ८.१ असेल तर तुम्ही ‘विंडोज १०’ विनामूल्य अपग्रेड करू शकता. मायक्रोसॉफ्टने अशा वापरकर्त्यांना एक वर्षांपर्यंत ‘विंडोज १०’ मोफत उपलब्ध करून देण्याचे आधीच जाहीर केले आहे.
तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टिम माहीत नसेल तर ‘winver’च्या साह्याने तुम्ही तुमच्या ऑपरेटिंग सिस्टिमचे ‘व्हर्जन’ माहीत करून घेऊ शकता. त्यासाठी ‘स्टार्ट मेनू’मध्ये जाऊन ‘सर्च’मध्ये ‘winver’ ही अक्षरे टाइप करा. तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टिम कोणती आहे, हे लगेच समजू शकेल.
वर सांगितलेल्या ऑपरेटिंग सिस्टिम तुमच्याकडे नसतील, तरी हरकत नाही. विंडोज ७वरून विंडोज ‘७एसपी१’ आणि विंडोज ८ वरून ‘विंडोज ८.१’वर अपग्रेड होऊन तुम्ही पुढे ‘विंडोज १०’वर अपग्रेड होऊ शकता.
आता ‘विंडोज अपडेट’मध्ये जाऊन kKB3035583l हे अपडेट डाउनलोड करा. हे अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमचा संगणक ‘रिबूट’ करावा लागेल.
’‘रिस्टार्ट’ झाल्यानंतर स्क्रीनच्या खालील भागातील उजवीकडच्या कोपऱ्यात असलेल्या ‘टास्कबार’सोबत तुम्हाला एक ‘स्टार्ट’ बटण दिसेल. हे बटण ‘विंडोज १०’चे आहे. त्यावर ‘क्लिक’ करून स्क्रीनवरील सूचनांनुसार तुमचा ई मेल आयडी टाका. ही प्रक्रिया पूर्ण होताच तुम्ही ‘विंडोज १०’साठी तयार व्हाल.
’तुमच्याकडे विंडोजची ‘अधिकृत’ अर्थात ‘जेन्यूइन’ आवृत्ती असेल तरच, तुम्ही ‘विंडोज १०’वर अपग्रेड होऊ शकता. तसेच ‘विंडोज ७ एन्टरप्रायजेस’, ‘विंडोज ८ एन्टरप्रायजेस’, ‘विंडोज आरटी/आरटी ८.१’ या आवृत्ती असणाऱ्यांनाही ‘विंडोज १०’ सध्या विनामूल्य अपग्रेड करता येणार नाही.
पर्याय दुसरा :
’मायक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावर ‘विंडोज १०’चे ‘डाउनलोड पेज’ही उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पेजवरून तुम्ही थेट ‘विंडोज १०’ डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. मायक्रोसॉफ्टने ही सुविधा पुरवताना ‘इन्स्टॉलेशन फाइल्स’ पेन ड्राइव्ह किंवा ‘डीव्हीडी’मध्ये डाउनलोड करण्याची सूचना केली असली तरी तुम्ही थेट डाउनलोड करूनही ‘विंडोज १०’ इन्स्टॉल करू शकता.
’सर्वप्रथम तुमच्या संगणकाचा पूर्ण बॅकअप घ्या. कारण एखाद्या वेळी इन्स्टॉलेशन नीट झाले नाही अथवा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला काही कारणाने जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवरच परतावे लागणार असल्यास तुम्हाला ‘रिस्टोअर’ करण्याचा पर्याय उपलब्ध राहील. ‘विंडोज १०’मध्ये ‘रोलबॅक’ची सुविधा पुरवण्यात आली असली तरी ती एका महिन्यानंतर ‘ब्लॉक’ होते. अशा वेळी तुम्हाला नाइलाजाने ‘विंडोज १०’च वापरावे लागेल. त्यामुळे बॅकअप घेण्यासोबतच Easeus System GoBack सारखा प्रोग्रॅम डाउनलोड करून ठेवा. या प्रोग्रॅममुळे तुम्ही कोणत्याही क्षणी तुमच्या आधीच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर परतू शकता.
’‘बॅकअप’ पूर्ण झाल्यानंतर विंडोज १०च्या डाउनलोड पेजवर जा. (https://www.microsoft.com/en-us/software-download/windows10) ही त्याची लिंक आहे.
’या पेजच्या तळाला ‘डाउनलोड टूल नाऊ’ नावाखाली दोन पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या संगणकाच्या विद्यमान व्हर्जननुसार (६४ बिट किंवा ३२ बिट) पर्याय निवडा व ‘टूल’वर क्लिक करा.
’या टूलवर ‘क्लिक’ केल्यानंतर तुम्हाला ‘अपग्रेड धिस पीसी’ अशी विचारणा होईल. पुढे ‘स्क्रीन’वर दिल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा. विंडोज १० तुमच्या संगणकावर अवतरलेले दिसेल.
‘विंडोज १०’साठी आवश्यक यंत्रणा
विंडोज ७ एसपी१ किंवा विंडोज ८.१ ऑपरेटिंग सिस्टिम
एक गिगाहार्ट्झ किंवा त्याहून अधिक क्षमतेचा प्रोसेसर
३२ बिटसाठी एक जीबी तर ६४ जीबीसाठी २ जीबी रॅम.
हार्डडिस्कवर १६ जीबी (३२ बिटसाठी) किंवा ३२ जीबी (६४ बिटसाठी) मोकळी जागा.
डायरेक्टेक्स ९ किंवा त्याहून वरच्या दर्जाचे व्हर्जन
८०० बाय ६०० स्क्रीन डिस्प्ले रेझोल्यूशन