आता श्रावण सुरू झालाय. श्रावण, भाद्रपद, आश्विन, काíतक हे पुढचे महिने सणासुदीचे, व्रतवैकल्यांचे. यानिमित्ताने धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण, उपवास, नामस्मरण, पूजापाठ करण्याचा प्रघात आहे. पूजा सांगण्यासाठी काही जण भटजींना बोलावतात तर काही घरांत कॅसेटच्या साहाय्याने अथवा पुस्तकात पाहूनदेखील या पूजा केल्या जातात. आज बाजारात विविध पंचांग, आरती संग्रह, स्तोत्रे, विविध पूजा सांगणारी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु http://www.transliteral.org या साइटने आपल्याला सर्व गोष्टी एका ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
या साइटवर विविध पूजा करण्याच्या पद्धती सविस्तरपणे दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ गणेश स्थापना, मंगलागौरी, गृहप्रवेश, नवरात्र पूजा, श्रीसत्यनारायण पूजा इत्यादी. पूजा कशी करावी, त्यासाठी लागणारे साहित्य, पूजेची कथा, पूजेच्या वेळी म्हटले जाणारे मंत्र आणि त्या मंत्रोच्चारांच्या वेळी कोणती कृती करावी इत्यादींचा समावेश येथे केलेला आहे.पंचांग विभागात मराठी महिन्यांत येणाऱ्या तिथींचे महत्त्व वर्णन केले आहे. जसे की, श्रावणातील महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा/ रक्षाबंधन याबद्दलची माहिती येथे वाचायला मिळते.मराठी साहित्य विभागात मराठी कथा ज्यामध्ये पौराणिक कथा आणि तात्पर्य कथांचा समावेश आहे. पौराणिक कथांमध्ये राजा हरिश्चंद्र, ध्रुव, रामायणातील धोब्याची कथा इत्यादी तर तात्पर्य कथांमध्ये पंचतंत्र, इसापनीतीतील कथा वाचायला मिळतील. शासकीय साहित्यामध्ये भारताची राज्यघटना, अनुवादित साहित्यात अर्थासहित भगवद्गीता, नाटकांमध्ये गाजलेली संगीत नाटके जसे की, संगीत एकच प्याला. याखेरीज दासबोध, संत तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी इत्यादी उपलब्ध आहे.
गाणी, कविता, अभंग, कीर्तन, आख्यान असे विविध प्रकार तुम्हाला एकाच ठिकाणी वाचायला मिळतील. िहदी आणि संस्कृत भाषेतील साहित्यदेखील येथे उपलब्ध आहे.
डिक्शनरी विभागात उत्तमोत्तम शब्दकोशांचा समावेश केलेला आहे. शब्द शोधण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वर्ड इंडेक्सवर क्लिक करणे आवश्यक आहे. जसे की ‘मॅटर’हा इंग्रजी शब्द शोधताना ‘एम्’ या इंग्रजी आद्याक्षरावर तर ‘आकाश’ ह्या मराठी शब्दासाठी आ’ या अक्षरावर क्लिक करणे गरजेचे आहे. अक्षरावर क्लिक केल्यावर संबंधित शब्दांची मोठी सूची दिसते. तुम्हाला हवा असलेला शब्द त्यातून शोधू शकता किंवा उजवीकडे खालच्या बाजूला वर्ड सर्चची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही इंग्रजी किंवा मराठीमध्ये शब्द टाइप करू शकता.
तुम्ही एखादा इंग्रजी शब्द शोधत असाल तर विविध क्षेत्रांशी संबंधित त्याचा काय अर्थ होतो तसेच एखादा मराठी शब्द शोधत असाल तर त्या शब्दाचा अर्थ, पर्यायी शब्द, उपलब्ध असल्यास वाक्प्रचार आणि म्हणी, इतर संबंधित शब्द, तसेच इंग्रजी शब्द वाचायला मिळेल.त्याचबरोबर येथे प्रश्नोत्तरांचा देखील एक विभाग आहे. आपल्या सर्वाच्याच मनात परंपरा, रूढी, संस्कृती याविषयी असंख्य प्रश्न असतात. पूर्वजांनी चालू केलेल्या प्रथा आपण पुढे चालू ठेवतो. परंतु असे करताना आपल्या मनात ‘असे का करायचे?’ असा प्रश्न नक्कीच येतो. या शंकांचे निरसन करणारी उत्तरे देण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे. याखेरीज तुम्ही येथे प्रश्न विचारू शकता. अनुत्तरित प्रश्नांना उत्तरेही देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला या साइटवर लॉगिन करणे आवश्यक आहे.
या साइटच्या निमित्ताने आध्यात्मिक साहित्याचा खजिना आपल्यासाठी खुला झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com