चायनीय मोबाइल उत्पादक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत चांगलीच मजल मारण्यास सुरुवात केली आहे. बहुराष्ट्रीय तसेच काही देशी प्रस्थापित ब्रॅण्ड्सच्या बरोबरीने चिनी कंपन्यांचा मोबाइल बाजारातील हिस्सा वाढू लागला आहे. चिनी मोबाइल म्हणजे स्वस्त आणि खात्री नसलेला अशी एके काळची भारतीय ग्राहकांची भावना आता हळूहळू बदलू लागली आहे. याचाच फायदा चिनी कंपन्यांनी घेत चिनी ब्रॅण्ड्स भारतीय बाजारात दाखल केले. पूर्वी ८ ते १५ हजारांच्या दरम्यान उपलब्ध असलेले चिनी मोबाइल आता २५ हजारांपर्यंत मिळू लागले आहेत. विवो या चिनी मोबाइल ब्रॅण्डने २०१३ पासून भारतीय बाजारात प्रवेश केला. यापूर्वी विवो एक्स प्ले ३एस, विवो एक्स ५ मॅक्स असे फोन बाजारात आणले आहेत. आता त्यांनी विवो एक्स ५ प्रो हा फोन बाजारात आणला आहे. हा फोन वापरताना आयफोनसारखा अनुभव येतो. कारण यातील अनेक गोष्टी या आयफोनशी साधम्र्य साधणाऱ्या आहेत. पाहू या कसा आहे हा फोन.
फोनची रचना
हा फोन याच कंपनीचा आधीचा एक्स ५ मॅक्स या फोनसारखाच दिसायला आहे. पण प्रत्यक्षात या दोन्ही फोनच्या रचनेत अनेक फरक आहेत. हा फोन मॅक्सपेक्षा कमी जाडीचा असून त्याची जाडी ६.४ मिमी इतकी आहे. या फोनचा ५.२ इंचांचा सुपर एएमओएलईडी डिस्प्लेपण खूप चांगला आहे. डिस्प्ले अधिक शार्प, बारकावे टिपणारा आणि रंगांचा चांगला अनुभव देणारा आहे. बहुतांश स्मार्टफोनमधील संपूर्ण एचडी डिस्प्लेपेक्षाही अधिक सरस ठरतो. या सर्वामुळे हा फोन पटकन अ‍ॅपलच्या आयफोन ६शी जवळीक साधणारा वाटतो. या फोनच्या अर्धवर्तुळाकार बाजूंपासून खालच्या चार्जिग पिनच्या बाजूस स्पीकर देण्यापर्यंत सर्वच गोष्टीत आयफोनसारख्या दिल्याने लांबून हा फोन आयफोन ६ आहे असेही वाटू शकते. सॅमसंग, एचटीसी, सोनी आणि मोटोरोलासारख्या मोबाइल उत्पादकांच्या विशेष स्मार्टफोन प्रणालीतील दर्जाची रचना या फोनची असल्यामुळे याबाबतीत हा फोन सरस ठरतो. फोन बारीक असून त्याला धातू आणि काचेच्या बॉडीमुळे फोनच्या सौंदर्यात आणखी भर पडते.
स्पेसिफिकेशन आणि सॉफ्टवेअर
कोणत्याही स्मार्टफोनमध्ये त्यामध्ये वापरण्यात आलेली चिप ही महत्त्वाची भूमिका बजावते. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ ही चिप म्हणजेच प्रोसेसर वापरण्यात आली आहे. हा प्रोसेसर साधारणत: मध्यम किमतीच्या म्हणजे १५ हजार रुपयांच्या फोनमध्येही वापरण्यात येतो. या फोनच्या किमतीचा विचार करता कंपनीला याहीपेक्षा जास्त चांगला प्रोसेसर वापरता आला असता. एचटीसीच्या वन प्लस २ या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८१० हा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तसेच त्या फोनची किंमत विवोच्या या फोनपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये इतर ज्या काही सुविधा देण्यात आल्या आहेत. त्या सर्व मध्यम किमतीच्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत अशाच आहेत. यात डय़ुएल सिमची सुविधा आहे. यासाठी देण्यात आलेल्या दोन स्लॉटपैकी एक स्लॉट आपण सिमऐवजी मेमरी कार्डसाठीही वापरू शकतो. फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला असून त्यात संपूर्ण एचडी व्हिडीओ रेकॉर्ड करता येतो. फोनचा फ्रंट कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये १६जीबी अंतर्गत मेमरी असून ती आपण १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो. यात दोन जीबी रॅम देण्यात आली असून बॅटरी क्षमता २४५० एमएएच इतकी आहे. फोनमध्ये अ‍ॅण्ड्रॉइड ५.० ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. कंपनीची स्वत:ची फनटच ओएसही यात देण्यात आली आहे. या फनटचमुळे एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधित अ‍ॅप्स एकाच टचवर उपलब्ध होतात. या फोनमध्ये आपल्याला नियमित लागणारे सर्व अ‍ॅप्स अंतर्गत इन्स्टॉल करून देण्यात आलेले आहेत. यात फेसबुक, वीचॅट, व्हॉट्सअ‍ॅप, स्काइप आणि डब्लूपीएस ऑफिस अशा अ‍ॅप्सचा समावेश आहे.
कॅमेरा
या फोनमध्ये देण्यात आलेले कॅमेराचे अ‍ॅपही आयओएसमधील कॅमेरा अ‍ॅपसारखेच आहे. यात बहुतांश मॅन्युअल सेटिंग्जमध्ये आपल्याला फेरफार करता येत नाही. पण यामध्ये एचडीआर, पॅनोरमा, नाइटमोड अशा सुविधांचा समावेश आहे. यात तुम्ही फोटो किंवा व्हिडीओचा आकार निवडू शकता, फ्लॅश सुरू करू शकता, गॅलरीमध्ये जाऊ शकता तसेच व्हिडीओ रेकॉर्डसारखे पर्याय देण्यात आले आहेत. हा कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा असला तरी यामध्ये फोटो काही प्रमाणात त्या तुलनेतील कॅमेरांपेक्षा कमी शार्प येतात. पण जर तुम्ही फोकससाठी थोडी मेहनत घेतली आणि कॅमेराला प्रकाश आणि इतर गोष्टींशी जुळवून घेण्यास मदत केली तर फोटो अधिक चांगले येऊ शकतात.
असा चालतो फोन
या फोनमधील टचचा दर्जा आणि फनटच ऑपरेटिंग प्रणालीमुळे हा फोन वापरण्यास खूप छान वाटते. यामध्ये अ‍ॅप्स लोड होऊन त्याचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो. फोन वापरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी जाणवल्या नाही. वापरकर्त्यांच्या सोयीच्या दृष्टीने बनविला असल्यामुळे फोन वापरण्यास खूप सोपा वाटतो. फोनची बॅटरी क्षमता मध्यम आहे असे म्हणता येईल. हा फोन पूर्ण चार्ज झाल्यावर सतत आणि व्हिडीओ व गाण्यांसह वापरल्या सुमारे आठ तासांपर्यंत काम करू शकतो. इतर स्मार्टफोनच्या तुलनेत हा फोन वाय-फाय जोडणी पकडण्यात कमी पडतो. ज्या ठिकाणी वाय-फाय उपलब्ध असेल इतर फोनमध्ये वाय-फाय सुरू होते. मात्र हा फोन वाय-फायसाठी स्कॅनिंग करीत राहतो. पण काही वेळाने वाय-फाय उपलब्ध होते.
थोडक्यात..
तुम्ही जर अ‍ॅपलचे चाहते असाल आणि तुम्हाला अ‍ॅण्ड्रॉइड फोन हवा असेल तर तुम्ही नक्कीच या फोनचा विचार करू शकता. कारण या फोनच्या दिसण्यापासून ते अ‍ॅपलच्या फीचर्सपर्यंतच्या अनेक गोष्टी आयओएसशी साधम्र्य साधणाऱ्या आहेत.
किंमत – २७९८० रुपये.
(विविध ई-बाजार संकेतस्थळांवर सवलतीमध्ये उपलब्ध आहे.)
– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com