नमो, रागा, एके या नावांनी यंदाच्या निवडणुकांमध्ये गल्लीबोळ गाजवून सोडले आहे. जे कुणी मतदानास पात्र आहेत त्यांच्याबरोबरच अशीही काही मुले आहेत, जी मतदानास पात्र नसतानाही या नावाशी जवळीक साधू लागली आहेत. अशाच लहान मुलांना निवडणुकांबद्दल जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने http://www.smartur.com <http://www.smartur.com या संकेतस्थळ कंपनीने  ‘इलेक्शन एबीसी’ या नावाने एक उपक्रम हाती घेतला आहे.
सध्याची लहान मुले ही भविष्यातील मतदार आहेत. या मतदारांना जागृत करण्यासाठी आपल्याकडे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. जेव्हा मतदानाचे वय येते त्या वेळेस जागृती निर्माण करण्याचे काम होताना दिसते. भारत हा तरुणांचा देश आहे. यामुळे भावी मतदारांना त्यांचे पहिले मत देत असताना भारतीय राजकारण आणि निवडणूक पद्धती याची ओळख व्हावी, या उद्देशाने १२ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे संकेतस्थळाचे संस्थापक नीरज जेवळकर यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामध्ये मुलांना धम्माल मस्ती करता करता निवडणूक प्रक्रियेबाबत जागृत करण्यात येणार आहे. यात ‘फन इलेक्शन कॉन्टेस्ट’ ठेवण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना भारतातील प्राथमिक राजकीय शिक्षण घेता येणे शक्य होणार आहे. यातील प्रश्नमंजूषा स्पर्धा असणार आहे. यानंतर ‘फन फॅक्ट्स’ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पध्रेत नरेंद्र मोदी, अरिवद केजरीवाल आणि राहुल गांधी या तिघांच्या राजकीय प्रवासाबद्दल ग्राफिक्स तयार करण्यास सांगितले जाणार आहे. याशिवाय थ्रीडी प्रतिकृतींवर आधारित फन पीएम टेस्टही घेतली जाणार आहे. या उपक्रमाला देण्यात आलेले ‘इलेक्शन एबीसी’ हे नावही सूचक असून यामध्ये ए म्हणजे आम आदमी पक्ष, बी म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि सी म्हणजे काँग्रेस पक्ष, अशी माहितीही जेवळकर यांनी दिली. ऑनलाइन गणित शिक्षण देणाऱ्या या संकेतस्थळावर तुम्ही भेट दिल्यावर तेथे तुम्हाला ‘इलेक्शन एबीसी’ हा पर्याय दिसेल. यावर तुम्ही क्लिक केल्यावर स्पध्रेत कसे सहभागी व्हायचे, याची माहिती तुम्हाला मिळू शकेल.