सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आह़े  त्यात प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांनी जशी भाषणे, सभा, वाद-प्रतिवाद, चर्चा, पत्रकबाजी अशी पारंपरिक अस्त्रे वापरली आहेत, तसेच इंटरनेट हे आधुनिक आणि अमोघ अस्त्रही प्रभावीपणे वापरले आह़े  समाजमाध्यमांच्या द्वारे तर प्रचाराचा धुमधडाका उडवून प्रतिपक्षाला चितपट करण्याचे यत्न सर्वच पक्ष करताना दिसत आहेत़  परंतु त्याच वेळी मतदारांना आपल्या उमेदवारांची माहिती करून देण्यासाठी आणि मतदान अधिक डोळसपणे व्हावे, यासाठी प्रयत्न करणारीही अनेक बिगर राजकीय मंडळी आहेत़  त्यांच्या पुढाकाराने अनेक माहितीप्रधान संकेतस्थळे आणि अँड्राइड अ‍ॅप सुरू करण्यात आली आहेत़  यांपैकी काही वैशिष्टय़पूर्ण संकेतस्थळे आणि अ‍ॅपचा हा आढावा़

संकेतस्थळे
फेसबुक
सध्याचे आघाडीचे समाजमाध्यम असणाऱ्या ‘फेसबुक’ने निवडणुकांचे वातावरण कवेत घेण्याचा प्रयत्न केला आह़े  फेसबुक ‘आय एम ए व्होटर’ नावाची विशेष सेवा सुरू करण्यात आली आह़े  त्यानुसार वापरकर्त्यांना एक कळ दाबून मतदान केल्याचे स्टेटस अपडेट करता येणार आह़े  विशेष म्हणजे देशभरात ज्या ठिकाणी ज्या दिवशी मतदान असेल त्या ठिकाणी त्या दिवशीच फेसबुकवर ही कळ दिसणार आह़े  याच सेवेअंतर्गत फेसबुकच्या न्यूज फीडमध्ये मतदानाच्या दिवशी अठरा वर्षांवरील सर्व वापरकर्त्यांना मतदान करण्याची आठवण करून देणारा संदेश पाठविण्यात येणार आह़े  मोबाइलवर फेसबुक वापरणाऱ्यांना तर मोबाइलवर चटकन हा संदेश दिसेल़

इलेक्शन टूर
फेसबुक, गुगलप्रमाणेच काही तरुणांनी खासगीरीत्याही उमेदवारांची माहिती देणाऱ्या संकेतस्थळांची निर्मिती केली आह़े  पुण्यातील स्वप्निल मोरे, अमित कुलकर्णी, सुहास जोशी, विक्रम चिटणीस, गोविंद बांग या तरुणांनी मिळूनी electiontour.com या संकेतस्थळाची निर्मिती केली आह़े  उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, कोणाविरुद्ध उभा आहे, त्याची मालमत्ता किती, त्याचे शिक्षण किती, त्याच्याविरुद्ध किती गुन्हे दाखल आहेत, अशी सर्वच माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आह़े  संकेतस्थळाची मांडणीही आकर्षक आह़े  मुख्यपृष्ठावर देशाचा नकाशा देण्यात आलेला आह़े  देशाच्या ज्या भागातील मतदारसंघाची माहिती हवी आहे, त्या ठिकाणी एक क्लिक करायचे की तिथले मतदारसंघ पुढे येतात आणि त्यातील हव्या त्या मतदारसंघातील उमेदवारांची माहिती मिळविता येत़े  मतदारांना सहज माहिती उपलब्ध करून देण्यासाठीच या संकेतस्थळाची निर्मिती केल्याचे आणि निवडणुकांच्या खूप आधीपासूनच निर्मितीच्या कामाला लागल्याचे स्वप्निल सांगतो़  सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या या तरुणांनी केलेल्या या कामात अधिक माहितीची भर घालण्यात आल्यास लोकसभेपाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही उपयोगी पडणार आह़े
गुगल
मतदारांना त्यांच्या उमेदवारांची माहिती देणारी संकेतस्थळे उपलब्ध आहेत़  दस्तुरखुद्द गुगलनेसुद्धा ‘नो युवर कॅन्डिडेट’ नावाने एक टूल खास लोकसभा निवडणुका २०१४ साठी उपलब्ध करून दिले आह़े  या टूलचा वापर करून मतदारांना आपल्या उमेदवाराची पूर्ण माहिती मिळविता येणार आह़े  आपल्या भागातील सध्याचा खासदार, त्याची कामगिरी आणि येत्या निवडणुकीला उभे असलेले उमेदवार, त्यांचे शिक्षण, आर्थिक पाश्र्वभूमी आदी सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आह़े  त्यामुळे विचारपूर्वक मतदान करणे मतदारांना शक्य होणार आह़े  गुगलच्या इलेक्शन लिंकवर जाऊन मतदाराला केवळ आपला पिनकोड तेथे टाकायचा आहे की लगेच माहिती उपलब्ध होत़े

निवडणूक आयोग
मतदार यादीत नाव शोधणे, तक्रार नोंदविणे, मतदान केंद्राचा पत्ता पाहणे, आदी माहितीसाठी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळही विशेष उपयुक्त ठरणारे आह़े http://eci.nic.in या संकेतस्थळावर ही सर्व माहिती उपलब्ध आह़े
संकेतस्थळांप्रमाणेच स्मार्ट फोनवर सहज-विनामूल्य उपलब्ध होणारी निवडणुकीसंदर्भातील अनेक अ‍ॅप्ससुद्धा आहेत़  

निवडणूक आयोग
गुगल प्लेवर निवडणुकीसंदर्भातील सतराशे साठ अ‍ॅप्स उपलब्ध आहेत़  निवडणूक आयोगानेही अ‍ॅप्स निर्मितीमध्ये पुढाकार घेतला आह़े  ही नक्कीच उत्साहाची गोष्ट आह़े apps.mgov.gov.in   या शासकीय अ‍ॅप्स स्टोअरवर शासनाची अनेक विनामूल्य अ‍ॅप्स उपलब्ध आहेत़  त्यापैकी काही निवडणूक आयोगाचीही आहेत़  ‘व्होटर इन्फॉर्मेशन सर्च’ हे त्यापैकी एक वैशिष्टय़पूर्ण अ‍ॅप आह़े  आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीत आपले नाव, मतदान केंद्र शोधण्यापेक्षा या अ‍ॅपद्वारे शोधणे नक्कीच झटपट आणि सोपे आह़े  गुगल प्ले स्टोअरलासुद्धा ‘इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया’चे असे अ‍ॅप उपलब्ध आह़े  आपले नाव मतदारसंघ टाका की तात्काळ यादी क्रमांक आणि इतर माहिती उपलब्ध होत़े

इतर अ‍ॅप्स
अभियांत्रिकी विद्यार्थी रोहित सिंग आणि श्वेता सुमन यांनी तयार केलेले ‘इंडिया इलेक्शन्स’, डीव्हीड्रोइडचे ‘इंडियन इलेक्शन २०१४’, जयदीप गोहिलचे ‘इंडिया इलेक्शन २०१४’, प्रोजेक्ट एक्सवे ‘आयसिटिझन-इंडिया इलेक्शन्स’ अशी अनेक विनामूल्य अ‍ॅप्स गुगल प्लेला उपलब्ध आहेत़  ही सर्वच अ‍ॅप्स उमेदवारांची सर्वागीण माहिती मतदारांना देण्यासाठी बनविण्यात आली आहेत़  तसेच मतदारसंघांची माहिती निवडणूक कार्यक्रम, निकालाचा दिवस, आदी माहितीसुद्धा यावर उपलब्ध आह़े  निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीच्या आधारेच अ‍ॅप बनविल्याचे श्वेता सुमन सांगत़े

‘इलेक्शन वॉच रिपोर्टर’
हे एक अत्यंत वैशिष्टय़पूर्ण अ‍ॅप आह़े  या अ‍ॅपचा वापर करून मतदारांना मतदान प्रक्रियेवर नजर ठेवता येणार आह़े  प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या चित्रफिती या अ‍ॅपवर अपलोड करण्याची सोय आह़े  या चित्रफिती, छायाचित्र किंवा इतर स्वरूपातील तक्रारी तात्काळ आयोगाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत़

खेळ
संकेतस्थळे आणि अ‍ॅप्सप्रमाणेच निवडणुकांशी संबंधित अनेक खेळही सध्या अ‍ॅप स्टोअरवर धुमाकूळ घालीत आहेत़  यापैकी ‘भाग मोदी भाग’ हा गेमिंग अड्डाचा खेळ तरुणाईच्या विशेष पसंतीस उतरत आह़े  या खेळात मोदींचे कार्टून दिल्लीच्या दिशेने धावत सुटत़े  आणि खेळणाऱ्याला वाटेतील अनेक अडथळे पार करीत त्यांना संसदेपर्यंत पोहोचवायचे असत़े  वाटेतील विविध निवडणूक चिन्हे घेत २७२ चा आकडाही गाठून द्यायचा असतो़ याचसारखा आणखी एक खेळ म्हणजे ‘व्हर्डिक्ट २०१४’. या खेळात आपल्याला देशभरातून आपल्या आवडीचे उमेदवार निवडता येतात आणि त्यांची राज्याराज्यांतून लांबलचक शर्यतच सुरू होत़े  वाटेत येणारे अग्निबाण, फुगे घेत आपल्या उमेदवाराला या शर्यतीत जिंकवायचे असत़े