टॅबलेटपेक्षा थोडेफार जास्त उपयोगी आणि लॅपटॉपपेक्षा हाताळायला सोपे अशा नोटबुक आणि नेटबुकला चांगलीच मागणी असल्याचे दिसून येत आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षांत ही मागणी ५५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. पाहू या काय म्हटले आहे या अभ्यासात.
संगणक विक्रीच्या बाजारात २०१३-१४ या आर्थिक वर्षांत नोटबुक आणि नेटबुकच्या विक्रीमध्ये ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर संगणक बाजारातील एकूण विक्रीमध्ये सहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. एमएआयटी या देशातील आयटी हार्डवेअरच्या शिखर संस्थेने सादर केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

या अहवालामधील काही महत्त्वाच्या बाबी
* एप्रिल २०१३ आणि मार्च २०१४ या कालावधीत संगणक क्षेत्रातील डेस्कटॉप, नोटबुक आणि नेटबुक या उपकरणांची विक्री देशभरात ११८.५ लाख इतकी झाली आहे. मागच्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत ही विक्री सहा टक्क्यांनी वाढली आहे.
* डेस्कटॉपच्या ५०.१ लाख उपकरणांची विक्री झाली असून ही विक्री मागच्या वर्षीच्या तुलनेत २६ टक्क्यांनी कमी झाली आहे, तर नोटबुक आणि नेटबुक यांच्या ६८.४ लाख उपकरणांची विक्री झाली असून यामध्ये मागच्या आíथक वर्षांच्या तुलनेत ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
* सध्या सुरू असलेल्या आíथक वर्षांत संगणक क्षेत्रातील एकूण उपकरणांची विक्री ती टक्क्यांनी वाढून ती १२२.१ लाखांपर्यंत जाईल.
* टॅबलेट संगणकांची विक्री ७६ टक्क्यांनी वाढल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नोटबुक आणि नेटबुक का..
लॅपटॉप आणि मोबाइल यांचा मध्य म्हणून ओळख असलेल्या नोटबुक आणि नेटबुकचा उपयोग लहान उद्योगांसाठी मोठय़ा प्रमाणावर केला जाऊ लागला आहे. तसेच बडय़ा कंपन्यांमध्येही याच नोटबुक आणि नेटबुकचा वापर होताना दिसतो. ही दोन्ही उपकरणे घरगुती आणि कार्यालयीन कामासाठी पूरक असल्यामुळे वजनाने आणि आकाराने जड असा लॅपटॉप घेण्यापेक्षा बहुतांश लोकांचा हे नोटबुक आणि नेटबुक घेण्याकडे कल दिसतो. इतकेच नव्हे, तर यांची किंमत ही लॅपटॉपपेक्षा कमीही असते. याशिवाय नोटबुकच्या वापरातही फारसा फरक पडत नाही. यामुळेच नोटबुकला अधिक पसंती मिळत असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविण्यात आले आहे.
सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या काही नोटबुक्सविषयी

एसर अ‍ॅस्पायर व्ही ५ १३१
एसर कंपनीचा हा नोटबुक विंडोज ८ वर आधारित असून त्याची स्क्रीन ११.६ इंचांची आहे. यामध्ये ५०० जीबीची हार्ड डिस्क देण्यात आली आहे. याचा प्रोसेसर सेलेरॉन डय़ुएल कोर १००५ १.९ गिगा हार्टझचा आहे. यात इंटेल एचडी ग्राफिक्स देण्यात आलेला आहे. यामध्ये दोन जीबीची डीडीआर ३ रॅम देण्यात आली आहे. यामुळे याच्या कामाच्या वेगाला तसा फारसा फरक पडणार नाही. यामध्ये आपण सोपे गेम्स खेळू शकतो. मात्र ग्राफिक्स किंवा अ‍ॅनिमेटेड गेम्स खेळण्यासाठी हा नोटबुक पीसी उपयुक्त ठरणार नाही. हा नोटबुक पीसी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवरही उपलब्ध आहे. याचे वजन केवळ १.४८ किलोग्रॅम इतके आहे, तर यामध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सात तास काम करू शकते.
किंमत- २२,४०० रुपये.

एचपी मिनी लॅपटॉप २००-४२०९टीयू
एचपी कंपनीच्या या नोटबुक पीसीची स्क्रीन १०.१ इंचांची आहे. यामध्ये ३२० जीबीची हार्ड डिस्क देण्यात आली आहे. याचा प्रोसेसर इंटेल अटॉम एन २६००चा आहे. यामध्ये दोन जीबीची डीडीआर ३ रॅम देण्यात आली आहे. यामुळे याच्या कामाच्या वेगाला तसा फारसा फरक पडणार नाही. याचे वजन केवळ १.३८ किलोग्रॅम इतके आहे. यामध्ये सहा सेलची बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत- १९,९०० रुपये.

चॅम्पियन डब्ल्यूबुक १०२१२०
चॅम्पियन या कंपनीने स्वस्त आणि मस्त नोटबुक बाजारात आणला आहे. यामध्ये विंडोजएक्सपी असून तो विंडोज ८वरही काम करू शकतो. या नोटबुक पीसीची स्क्रीन १०.२ इंचांची आहे. यामध्ये ८० जीबी किंवा १२० जीबीची हार्ड डिस्क देण्यात आली आहे. याचा प्रोसेसर इंटेल अटॉम एन २७०चा आहे. यामध्ये दोन जीबीची डीडीआर ३ रॅम देण्यात आली आहे. यामुळे याच्या कामाच्या वेगाला तसा फारसा फरक पडणार नाही. यामध्ये सहा सेलची बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत- १०,४०० रुपये.