वेअरेबल हा प्रकार भारतीय गॅझेट वापरकर्त्यांसाठी अगदीच नवा आहे. वेअरेबल अक्सेसरी म्हणजे तुम्हाला शरीरावर घालता येतील अशा अक्सेसरीज. याच प्रकारातील सॅमसंग च्या गेअर सिरीजला टक्कर द्यायला सोनी कंपनीने ‘एसडब्ल्यूआर १०’ हा स्मार्टबँड बाजारामध्ये आणलाय. हा स्मार्टबँड म्हणजे एक रबरी ब्रेसलेटच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याच्या मध्यभागी सेन्सर आणि बॅटरी असलेले ‘कोअर’ आहे. हे कोअर म्हणजेच खरंतर या स्मार्ट बँडचा आत्मा आहे. तुम्हाला हे रबरी स्मार्टबँड तुमच्या आवडत्या आणि हव्या त्या रंगात बदलता येतो. म्हणजे अगदी कपड्यानुसार मॅचिंग आणि अगदी मिस मॅच रंगामध्ये देखील बदलता येते.  मात्र, सध्या सोनीने या बँडमध्ये ५-६ रंग उपलब्ध करून दिले आहेत.

हे झाले दिसण्याबद्दल, पण या बँडचा उपयोग तो काय? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. हा बँड खरंतर एक लाईफ रेकॉर्डीगं डिवाईस आहे. हा तुम्ही किती वेळ चाललात, किती धावलात, किती झोपलात, झोप किती गाढ किंवा हलकी होती, दिवसभराच्या हालचालीने तुम्ही किती कॅलरी जाळल्या, किती फोटो काढले अश्या प्रकारची सर्व माहिती रेकॉर्ड करतो. म्हणजेच हा बँड तुमच्या स्मार्टफोन मध्ये तुमच्याबद्दल एक डायरीच लिहित असतो आणि तेही तुमच्या अगदी नकळत. याच्या ‘कोअर’ मध्ये एक छोटेसे बटन व तीन छोट्या लाईट्स आहेत. या लाईट्स तुम्हाला नोटिफिकेशन देण्यासाठी आहेत. त्यात व्हायब्रेटरची देखील सुविधा आहे. समजा तुमचा फोन काही अंतरापलीकडे या बँड पासून लांब गेला कि हा स्मार्टबँड व्हायब्रेट होतो. याचा फायदा असा कि तुम्ही कधीच फोन विसरणार नाही. तुम्हाला एखाद्या क्षणाची आठवण जतन करून ठेवायची असेल, तर फक्त बँडचे बटन दाबा. तुमच्या स्मार्टफोनमध्ये तो क्षण अपोआप जतन करून ठेवला जातो. त्या क्षणाला तुम्ही फोटोची जोड देखील देऊ शकता. पण हा स्मार्टबँड हे सर्व काम कसे करतो? हा बँड घेतल्यावर तुमच्या स्मार्टफोनवरती तुम्हाला ‘लाईफलॉग’ हे अॅप डाऊनलोड करावे लागते. हे अॅप ब्ल्यूटूथच्या मदतीने हा बँड तुमच्या फोनशी कनेक्ट करतो आणि हा तात्काळ आपलं काम चालू करतो.याची बॅटरी भन्नाट आहे. ती एक आठवड्यापर्यंत तुम्हाला चार्जिंगची गरज पडत नाही. हा बँड दिसायला आकर्षक तर आहेच पण याचे वजन देखील फक्त ६ ग्रॅम आहे. याचाच अर्थ हा तुमच्या मनगटावर अगदी नकळत त्याचे काम करत राहील, अगदी तुम्हाला कोणताही त्रास न देता. मात्र, या सर्व छान गोष्टीसोबत अर्थातच काही मर्यादा येतात. हा बँड फिटनेसप्रिय लोकांना किंवा इतर हौशी लोकांना नक्कीच आकर्षित करेल पण सर्वांनाच यात जास्त उपयुक्तता दिसणार नाही. दुसरी गोष्ट अशी कि हा बँड फक्त अॅड्रॉईड ४.४ सिस्टीमच्या पुढील मोबाईलसोबतच काम करतो. याची किंमत देखील खिश्याला थोडे अजून हलके करणारी आहे. पण एकूण पाहता हौसेला मोल नसते आणि आठवणींना देखील. जर तुम्हाला तुमचे दिवस आणि आठवणी जतन करायच्या असतील किंवा तुम्हाला फिटनेस मेंटेन करायचा असेल तर हा बँड तुमच्या नक्कीच उपयोगाचा आहे आणि एक छान पर्याय ठरेल. बाकी या बँडचा तुमच्या गर्लफ्रेंडला नक्कीच उपयोग होईल तुमच्यावर नजर ठेवायला. ‘एसडब्ल्यूआर १०’ या स्मार्टबँडची भारतीय बाजारातील किंमत ७,७०० आहे.