तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होते आहे, तसतशी मानवाच्या हातात नवनवीन उपकरणे खेळू लागली आहेत. विशेषत: मोबाइल क्षेत्रात झालेली क्रांती नेत्रदीपक आहे. भारतात सुमारे दोन दशकांपूर्वी श्रीमंताहातचे उपकरण म्हणून ओळखला जाणारा फोन दहा वर्षांपूर्वीपासून हातोहात दिसू लागला. तर पाच वर्षांपूर्वीपासून तो केवळ मोबाइल फोन म्हणून न उरता एकाच वेळी अनेक कामे करू शकणारा स्मार्टफोन बनला. या स्मार्टफोनमध्येही दिवसागणिक बदल होत चालले आहेत. आणि तो अधिकाधिक प्रगत आणि उपयुक्त होत चालला आहे. या बदललेल्या वैशिष्टय़ांची यादी द्यायची झाली तर हा लेखनप्रपंच त्यातच आटोपता घ्यावा लागेल. परंतु, कॅमेऱ्याचा वाढता दर्जा, लाखो अ‍ॅप्लिकेशन्सचे भांडार, अधिक आकर्षक आणि टिकाऊ डिस्प्ले, अतिवेगवान प्रोसेसर अशी काही ठळक वैशिष्टय़े येथे नक्कीच मांडता येतील. आता तर स्मार्टफोन हेदेखील जुन्या जमान्यातील तंत्रज्ञान ठरू लागले आहे. स्मार्टवॉच किंवा परिधान करता येण्यासारख्या (वेअरेबल) उपकरणांनी बाजारात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ‘वेअरेबल’ उपकरणांना आता पसंती मिळू लागली असली, तरी अशी उपकरणे अजूनही स्मार्टफोनच्या आधारेच वापरावी लागत आहेत. हे सर्व चित्र पाहता, भविष्यातील स्मार्टफोन कसे असतील, याची उत्सुकता प्रत्येकालाच वाटत असेल. या उत्सुकतेला काल्पनिक आकार देण्याचे काम ‘९१मोबाइल्स डॉट कॉम’ या संकेतस्थळाने दिले आहे.
सर्वसमावेशक वैशिष्टय़े असलेले आणि सहज हाताळता येणारे स्मार्टफोन अशी कल्पना डोळय़ांसमोर ठेवून ९१मोबाइल्स डॉट कॉमने ‘गुगल नेक्सस ३६०’ नावाच्या स्मार्टफोनची आकृती रेखाटली आहे. हा स्मार्टफोन प्रत्यक्षात निर्माण करण्यात आलेला नाही. मात्र, येत्या पाचेक वर्षांच्या काळात स्मार्टफोनचे तंत्रज्ञान कुठवर पोहोचलेले असू शकेल, याचे ‘व्हच्र्युअल’ प्रतीक निर्माण करण्याचा या संकेतस्थळाचा प्रयत्न होता. यासाठी वापरकर्त्यांच्या अपेक्षा-सूचना, तंत्रज्ञानातील बदल, नव्या गरजा आणि विविध कंपन्यांची उत्पादकता यांचा विचार करून ‘गुगल नेक्सस ३६०’ची संकल्पना आकाराला आली आहे. असा स्मार्टफोन करण्यात अन्य कंपन्याही बाजी मारू शकतील. पण आजघडीला सर्वात प्रगत आणि अत्यंत झपाटय़ाने स्वयंविकास करणारी यंत्रणा बाळगणाऱ्या ‘गुगल’मध्येच असे स्मार्टफोन निर्माण करण्याचे सामथ्र्य अधिक आहे, असे ‘९१मोबाइल्स डॉट कॉम’चे म्हणणे आहे. म्हणूनच त्यांनी या फोनला ‘गुगल नेक्सस’चे नाव जोडले आहे. भविष्यातल्या स्मार्टफोनची संकल्पना रेखाटताना ‘९१मोबाइल्स’च्या टीमने स्वप्नवत चित्र रंगवण्याचा प्रयत्न न करता सध्याच्या नवजात तंत्रज्ञानाचीच मोट बांधून वास्तववादी फोनची कल्पना मांडली आहे.

काय असेल भविष्यातील स्मार्टफोनमध्ये?
हातात धरा किंवा हाताला बांधा : सध्या स्मार्टवॉचसारखी वेअरेबल उपकरणे बाजारात मिळू लागली आहेत. मात्र ती उपकरणे स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत. त्यांना स्मार्टफोनचा आधार घ्यावा लागतो. पण भविष्यात हाताला घडय़ाळासारखा बांधता येणारा स्मार्टफोन बाजारात येऊ शकतो. म्हटलं तर साधारण फोनसारखा हातातही बाळगता येईल आणि म्हटलं तर मनगटाला गुंडाळताही येईल, असा हा स्मार्टफोन असेल. हे अतार्किक नाही. कारण ‘दाइ निपॉन’ या मुद्रण तंत्रज्ञानातील अग्रगण्य जपानी कंपनीने लवचिक पण स्क्रॅचविरोधी स्क्रीन बनवता येण्यास उपयुक्त ठरणाऱ्या घटकांची निर्मिती केली आहे. तर अमेरिकेतील मोलेक्स कंपनीनेही लवचिक सर्किट बनवण्याचे तंत्रज्ञान अवगत केले आहे.
पॉलिमर ओएलईडी डिस्प्ले : एलजीने अलीकडेच बाजारात आणलेल्या जी-फ्लेक्स या स्मार्टफोनमध्ये वक्राकार डिस्प्ले बसवून अशा डिस्प्लेची निर्मिती करता येते, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे ‘गुगल नेक्सस ३६०’सारख्या भविष्यातील स्मार्टफोनमध्ये असे डिस्प्ले सहज बसवता येतील.
फिंगरप्रिंट स्कॅनर, हार्टरेट मॉनिटर : आजकालच्या स्मार्टफोनमध्ये मानवाच्या आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित बदल दर्शवणाऱ्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मात्र भविष्यात यात अधिक सुधारणा होईल व हाताचे ठसे टिपून व्यक्ती ओळखणाऱ्या किंवा हृदयाचे ठोके मोजून दर्शवणाऱ्या सुविधा नक्कीच अंतर्भूत करण्यात येतील.
मोबाइलमधूनच चार्ज होणारा ब्लूटुथ हेडसेट : मायक्रोमॅक्स या भारतातील अव्वल मोबाइल कंपनीने अशा ब्लूटुथ हेडसेटची निर्मिती करून ‘वॅन गॉग’ फीचर फोनमध्ये तो वापरूनही दाखवला आहे. त्यामुळे असा हेडसेट जो स्मार्टफोनला जोडून ‘चार्ज’ करता येईल, बनवणे फार कठीण नाही.
मनगटावर बांधता येणारा टय़ुब कॅमेरा : हा टय़ुब कॅमेरा एकाच वेळी वेगवेगळय़ा बाजूंची छायाचित्रे टिपू शकेल. शिवाय फंट्र कॅमेरा म्हणूनही त्याचा वापर होऊ शकेल.
गुगल नेक्ससची वैशिष्टय़े
* पाच इंच फुल एचडी डिस्प्ले. अधिक विस्तारित अ‍ॅस्पेक्ट रेशियो (२.४०:१)
* २.५ गिगाहार्ट्झचा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०१, क्वाडकोअर प्रोसेसर.
* ३ जीबी रॅम
* ६४/१२८ जीबी इंटर्नल मेमरी. एक्स्टर्नल मेमरी नाही.
* ३६० अंशात वळणारा १६ मेगापिक्सेल टय़ुब कॅमेरा. एलईडी फ्लॅश.
* फोर के व्हिडीओ रेकॉर्डिग.
* डय़ुअल बॅण्ड वायफाय. ब्लुटूथ ४.०
* फिंगरप्रिंट स्कॅनर.
* हार्टरेट मॉनिटर.