मध्यंतरीच्या काळात आपल्या घराघरांतील उपकरणांमध्येवाढ झाली आणि मग घरांत वायर्सचे एक जंजाळ दिसू लागले. टीव्ही, रेडिओ, टेपरेकॉर्डर मग त्यानंतर वॉशिंग मशिन आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये कॉम्प्युटर असे वायर्सचे वेगळे जाळे निर्माण झाले. तोपर्यंतही ठीक होते. कारण या साऱ्या वस्तू हा एकदा एका ठिकाणी ठेवल्या की, त्यानंतर त्या फारशा हलवल्या जात नाहीत. पण कॉम्प्युटरचे मात्र असे नव्हते. त्याला अनेक जोडण्या होत्या. कधी त्या यूएसबीच्या असायच्या तर कधी एक्सटर्नल हार्डडिस्क किंवा मग आणखी काही. य वायर्सच्या जाळ्यांतून सुटका हवी असे वाटत असतानाच वायरलेस क्रांती झाली.
त्यामुळे आता सारे काही वायरलेस असावे, असेच वाटू लागले आहे. त्यात या वायर्सपासून मुक्ती देणारी अशी वायरलेस एक्सटर्नल हार्डडिस्क आता सीगेट या प्रसिद्ध कंपनीने बाजारात आणली आहे.
आजही बाजारात अनेक अशा कंपन्या आहेत ज्या वायरलेस पद्धतीने एक्सटर्नल हार्डडिस्क वापरण्याची मुभा देतात पण आता आपल्याकडे असलेल्या उपकरणांची संख्याही वाढते आहे. म्हणजे घरांत तीन जण राहात असले तर प्रत्येकाची साधारणपणे चार तरी इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतात. सर्वाना एकाच वेळेस त्यावर आपली माहिती साठवायची असेल तर मग अशा वेळेस पंचाइत होते. त्यावरही सीगेटने तोडगा काढला आहे. या नव्या सीगेट वायरलेस प्लसच्या माध्यमातून एकाच वेळेस ८ उपकरणे जोडता येतात. ही उपकरणे टॅब्लेटस् किंवा स्मार्टफोन्स असू शकतात. सुमारे ५०० एचडी चित्रपट राहू शकतील, अशी त्याची क्षमता आहे.
वायरलेस वापर करताना बॅटरी क्षमता भरपूर वापरली जाते. हे ध्यानात घेऊनच कंपनीने तब्बल १० तास चालू शकेल, अशी याची बॅटरी क्षमता उपकरणाला दिली आहे. याची मूळ साठवण क्षमता तब्बल एक टेराबाईटची आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १६,०००/-