भारतातील स्मार्टफोन बाजारातील ‘आर्या’ या नवीन भारतीय ब्रॅण्डने त्यांचा ‘झेड-२’ हा स्मार्टफोन ‘अॅमेझॉन डॉट इन’वर लाँच केला असून, हा स्मार्टफोन केवळ ६९९९ रुपये इतक्या किंमतीला उपलब्ध आहे. ‘झेड-२’ फोनमध्ये वन ग्लास सोल्युशनसह (ओजीएस) ५ इंचाचा एचडी डिस्प्ले असलेले आयपीएस स्क्रिन आहे. यातील सोनी बीएसआय सेन्सरसह ऑटो-फोकस असलेल्या ८ मेगापिक्सल कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्रे ही १३ मेगापिक्सल कॅमेऱ्याच्या तोडीची येत असल्याचा दावा कंपनीद्वारे करण्यात आला आहे. याशिवाय एचडी रेकॉर्डिंग, व्हॉईस अॅक्टिवेटेड कॅमेरा ऑपरेशन आणि हायस्पीड कंटिन्यूअस शुटिंग ही या कॅमेराची अन्य वैशिष्ट्ये आहेत. फोनमध्ये पुढील बाजूस २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ड्युअल सिम ‘आर्या झेड-२’ फोनमध्ये १.३ गेगाहर्टस् क्वाड-कोर मीडियाटेक (६५८२ए) प्रोसेसर असून, १ जीबीचा रॅम आहे. ४ जीबीची अंतर्गत मेमरी असलेल्या या फोनमध्ये रेग्युलर आणि मायक्रो सिमकार्ड वापरण्यासाठीचे स्लॉट पुरविण्यात आले आहेत. दोन्ही स्लॉटमध्ये ३जी डाटा कनेक्टिव्हिटीची सुविधा पुरविणारी सिम कार्ड वापरता येतात. ‘झेड-२’ अॅण्ड्रॉईड किटकॅट ४.४ प्रणालीवर काम करतो. फोनमध्ये ईडीजीई, जीपीआरएस, वाय-फाय, ब्ल्युटूथ आणि युएसबी ओटीजी इत्यादी कनेक्टिव्हीटीचे प्रकार पुरविण्यात आले असून, १८०० एमएएच लिथिअम पोलिमर बॅटरी देण्यात आली आहे.