दसरा, दिवाळी आली की घरात नव्या वस्तू, उपकरणांच्या खरेदीचे वेध लागतात. सणासुदीच्या निमित्ताने शुभमुहूर्तावर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यासाठी वर्षभर जमवाजमव करून ‘बजेट’ ठरवलं जातं. पण जी वस्तू खरेदी करायची असते, त्याबद्दल ग्राहकाने क्वचितच तयारी केलेली असती. दुकानात किंवा डीलरकडे गेल्यानंतरच त्याला एखाद्या उपकरणाच्या वेगवेगळ्या बॅ्रण्डबद्दल माहिती मिळते. आणि त्याआधारेच तो ती वस्तू खरेदी करतो. दुकानात किंवा शोरूममध्ये ती वस्तू पाहताक्षणी वाटणारं आकर्षण हे बऱ्याचदा या खरेदीला जबाबदार असतं. पण ती वस्तू आपल्या दृष्टीने कितपत उपयुक्त आहे किंवा आपल्या सोयीची आहे, याचा विचार अशा वेळी मागे पडतो. त्यामुळे बऱ्याचदा नंतर ग्राहकांना पश्चात्ताप करावा लागतो. या पाश्र्वभूमीवर, टीव्ही, मोबाइल, टॅब्लेट, लॅपटॉप, होम थिएटर अशी उपकरणे खरेदी करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या याबद्दलच्या काही टिप्स: टीव्ही घेताना..
पूर्वी केवळ मनोरंजनाचे माध्यम असलेला टीव्ही आता प्रतिष्ठेचे प्रतीकही ठरू लागला आहे. पूर्वीच्या ‘डबाबंद’ टीव्हीची जागा आता फ्लॅटस्क्रीन एलईडी, एलसीडी टीव्हींनी घेतली आहे. घरातल्या लिव्हिंग रूमच्या एखाद्या भिंतीवर प्रशस्तपणे विसावलेला टीव्ही आपल्याकडेही असावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे अनेक आकार आणि वैशिष्टय़े असलेल्या टीव्ही सेटची चलती आहे. त्यातही मोठमोठे टीव्ही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. शेजारी किंवा आप्तेष्टांशी स्पर्धा हा त्यामागील सुप्त हेतू असतोच. परंतु, हे सर्व करताना आपल्या गरजा, आवडनिवड आणि टीव्हीमुळे वाढणारी हॉलची शोभा या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवंच. शिवाय टीव्हीची निवड करताना त्यातील तांत्रिक वैशिष्टय़े-त्रुटी यावरही आपली बारकाईने नजर असली पाहिजे. यासाठी टीव्ही खरेदी करण्यापूर्वी खालील गोष्टी नक्की विचारात घ्या :
डिस्प्ले: वर सांगितल्याप्रमाणे आता वेगवेगळ्या प्रकारचे टीव्ही बाजारात उपलब्ध आहेत. नेहमीच्या ‘बॉक्स’ आकारातील टीव्हीखेरीज एलईडी, एलसीडी, ओएलईडी, प्लाझ्मा, स्मार्ट, थ्रीडी अशा अनेक प्रकारचे टीव्ही आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत. यातील आपल्याला कोणता टीव्ही आवश्यक आहे, हे सर्वप्रथम ठरवले पाहिजे. जर तुम्हाला आपल्या प्रशस्त लिव्हिंग रूममध्ये उच्च दर्जाचा सिनेमागृहासारखा अनुभव घ्यायचा असेल तर प्लाझ्मा टीव्ही हा चांगला पर्याय आहे. या टीव्हीची कलर आणि कॉन्ट्रॅस्ट क्वालिटी उच्च प्रतीची असते. त्यामुळे त्याचा दृश्यानुभव चांगला असतो. मात्र, या टीव्हीतील ‘ब्राइटनेस’ कमी असल्याने चांगल्या प्रकाशात हा टीव्ही पाहण्याचा अनुभव डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतो. लिक्विड क्लीअर डिस्प्ले अर्थात एलसीडी टीव्ही सध्या बहुतांश घरांत दिसतात. फ्लॅट स्क्रीन टीव्हीमध्ये स्वस्त पर्याय म्हणून एलसीडी टीव्हीकडे पाहिले जाते. यातील चित्राचा दर्जा उत्तम असतो. मात्र, तो काही विशिष्ट कोनातूनच चांगला वाटतो. एलसीडी टीव्हीपेक्षा खालच्या उंचीने किंवा एकदम ९० अंश काटकोनातून हा टीव्ही पाहणे जवळपास अशक्य असते. त्यामुळे तुमच्या घरातील बैठक व्यवस्था एकाच बाजूला असेल तर हा टीव्ही खरेदी करण्यास हरकत नाही. एलईडी टीव्हीचा पर्याय सध्या उत्तम मानला जातो. असंख्य एलईडी बल्बच्या साह्याने या टीव्हीची स्क्रीन प्रकाशमान होत असते. त्यामुळे चित्राचा दर्जा उत्तम असतोच शिवाय हे टीव्ही वीजही कमी खातात. कोणत्याही कोनातून पाहिल्यास हा टीव्ही सारखाच व स्पष्ट दृश्यानुभव देतो. ओएलईडी टीव्ही हा एलईडी टीव्हीतीलच वरच्या दर्जाचा टीव्ही आहे. अगदी तीव्र प्रकाशातही हे टीव्ही चांगले दिसतात. मात्र, त्यांची किंमत जास्त आहे.
आकार : सध्या बाजारात अनेक आकाराचे टीव्ही उपलब्ध आहेत. आकारानुसार टीव्हीची किंमत वाढत जाते. मात्र, केवळ किमतीकडेच न बघता आपल्या घरातील जागेत व्यवस्थित दिसेल, अशा आकारातील टीव्ही घेणे महत्त्वाचे आहे. लिव्हिंग रूममध्ये ठेवल्यानंतर बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणहून अतिशय कमी किंवा जास्त दिसेल, असा टीव्ही योग्य नाही. कारण दोन्ही परिस्थितीत तुमचा टीव्ही तुम्हाला अपेक्षित असा दृश्यानुभव देऊ शकणार नाही. टीव्हीच्या आकारानुसार, पाहणारी व्यक्ती आणि टीव्ही यांच्यातील अंतर किती असावे, याचे आकडे पुढे दिले आहेत.
३५ इंचापर्यंतचा टीव्ही: ३.५ ते ५ फूट अंतर
४० इंचापर्यंतचा टीव्ही: ४-६ फूट
५० इंचापर्यंतचा टीव्ही: ५-७.५ फूट
६० इंचापर्यंतचा टीव्ही: ६-९ फूट
तांत्रिक बाजू : एचडी टीव्हींची मागणी सध्या जोरात आहे. एचडी चॅनेल्सवरून मिळणारी सुस्पष्टता हे त्याचे एक कारण आहे. मात्र, अनेकदा शोरूममध्ये गेल्यानंतर सेल्समन ‘एचडी’ टीव्ही असल्याचे सांगून ग्राहकांना भुलवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात ते एचडी रेडी टीव्ही असतात. या दोन्हींमध्ये सुस्पष्टतेबाबत बराच फरक आहे. त्यामुळे याबाबत खात्री करून घेणे आवश्यक आहे. याशिवाय कॉन्ट्रास्ट रेशिओ पाहणंही महत्त्वाचं आहे. अनेक शोरूममध्ये कॉन्ट्रास्ट हा १०० किंवा पूर्ण क्षमतेने ठेवलेला असतो. त्यामुळे शोरूमच्या झगझगीत प्रकाशात टीव्ही चांगला दिसतो. मात्र, कमी प्रकाशात हाच कॉन्ट्रास्ट त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे टीव्ही तपासताना कॉन्ट्रास्ट निम्मा करून मग दृश्य पाहा. याशिवाय अ‍ॅस्पेक्ट रेशिओ, रिफ्रेश रेट, कलर डेप्थ तपासून पाहणेही आवश्यक आहे.
इन्पुट : सध्याच्या काळात टीव्हीचा वापर केवळ केबल लावून होत नाही. गेमिंग, डीव्हीडीवरून चित्रपट पाहणे, होम थिएटरशी जोडणे यावरूनही टीव्हीची पसंती ठरते. त्यामुळे तुम्ही तुमच्या टीव्हीसोबत या गोष्टीही करू इच्छित असाल तर तुम्ही खरेदी करत असलेल्या टीव्हीमध्ये या सर्वासाठी इन्पुट व्यवस्था आहे का हे पाहणे गरजेचे आहे. तुम्ही एचडी टीव्ही घेत असाल तर त्यात दोन एचडीएमआय इन्पुट असले पाहिजेत. याशिवाय ऑडिओ इन्पुट/आउटपुटसाठी व्यवस्था, यूएसबीचे किमान दोन स्लॉट असले तर कधीही चांगले. बहुतांश टीव्हीमध्ये यूएसबी स्लॉट उजव्या किंवा डाव्या बाजूला असतो. मात्र, यूएसबी टीव्हीच्या मागे असल्यास आणि टीव्ही भिंतीवर लावलेला असल्यास पेनड्राइव्ह जोडणे व काढणे ही किचकट प्रक्रिया होऊ शकते. याचाही विचार व्हायला हवा.
स्मार्ट टीव्ही: स्मार्ट टीव्ही हा सध्या सर्वाधिक आकर्षणाचा विषय आहे. इंटरनेटही हाताळू शकणारा टीव्ही असल्याने या टीव्हीवरून केवळ नेहमीचे चॅनेल्सच नव्हे तर यूटय़ुब किंवा तत्सम वेबसाइटवरील व्हिडीओही थेट टीव्हीवर पाहता येतात. याखेरीज टीव्हीवरील कार्यक्रम रेकॉर्ड करण्याची व्यवस्थाही या टीव्हींमध्ये असते. वायफायच्या आधारे इंटरनेट चालवणारे हे टीव्ही फेसबुक, ट्विटर शेअरिंगसाठीही उपयुक्त असतात. अर्थात अशा टीव्हीची आपल्याला खरोखरच गरज आहे का, हे पाहूनच त्याची खरेदी केली पाहिजे.
थ्रीडी टीव्ही: जी गत स्मार्ट टीव्हीची तीच थ्रीडी टीव्हीची. थ्रीडी तंत्रज्ञानावर चालणारे हे टीव्ही म्हणजे घरबसल्या अद्वितीय दृश्यानुभव हे नक्की. मात्र, भारतात अजूनही थ्रीडी चॅनेल्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या तरी अशा टीव्हींची गरज ग्राहकांना भासणार नाही.

टॅब खरेदी करताना..
आपल्याला एखादा टॅब घ्यायचा असेल तर आपण सर्वप्रथम इंटरनेटवर विविध पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात करतो. पण आपण घेत असलेला टॅब खरा आहे की नाही, त्याचा तांत्रिक तपशील आदी माहिती तपासून घेणे गरजेचे आहे. यासाठी टॅब खरेदी करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची याबाबत आपण जाणून घेऊयात.
*    टॅब्लेट घेताना सर्वप्रथम आपण त्याचा वापर नेमका कशासाठी आणि किती करणार आहोत हे ठरवून घ्या. म्हणजे तुम्हाला निवड करणे सोपे जाईल.
*    यानंतर तुमच्यासमोर असलेल्या टॅबच्या पर्यायांमधून तुम्ही त्यांची ऑपरेटिंग सिस्टीम आणि अ‍ॅप्स याचा तपशील जाणून घ्या. तुम्हाला उपयुक्त असे अ‍ॅप तुम्ही निवडत असलेल्या टॅबमध्ये चालतात का हे पाहा. तुम्हाला जर तुमचे कार्यालयीन काम या टॅबवर करायचे असेल तर तुम्हाला उपयुक्त असे सॉफ्टवेअर्स यामध्ये आहे का हेही तुम्हाला तपासून घ्यावे लागेल.
*    तुम्ही ज्या प्रकारचे काम करणार आहात ते काम स्टोअर करून ठेवण्यासाठी टॅबची मेमरीही सर्वाधिक असणे गरजेचे आहे.
*    अनेक टॅब हे केवळ वाय-फायद्वारे इंटरनेट जोडणी स्वीकारणारे असतात, तर काही टॅब मोबाइल डेटा आणि वाय-
फाय या दोन्हीद्वारे जोडणी स्वीकारणारे असतात. यामुळे अशा प्रकारची दोन्ही प्रकारची जोडणी असणारा टॅब घेणे हे भारतातील वापराच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.
*    टॅबचा एकूण आकार आणि वजन या दोन्हीचा विचार करणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही टॅब वापरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी ही काळजी घेणे फायद्याचे ठरेल. टॅब्लेटचा आकार साधारणत: सात इंचांपासून ते १० इंचांपर्यंत असतो.
*    टॅब घेताना त्याला बाह्य़ कीबोर्ड जोडणी करता येते का हेही तपासून घ्या. म्हणजे तुम्हाला टायपिंग किंवा जास्त वेळाचे काम करावयाचे असेल तर तुम्हाला कीबोर्ड जोडल्यास काम करणे सोपे जाईल.
*    तांत्रिक तपशिलामध्ये तपासून घेताना तुम्ही टॅबची रॅम, प्रोसेसरचा वेग, इंटरनेट जोडणी, ब्लू टय़ूथ कनेक्टिव्हिटी, थ्रीजी, फोरजी जोडणी असणेही आवश्यक आहे.

मोबाइलची खरेदी
मोबाइल खरेदी करतानाही टॅबप्रमाणेच काही बाबींचा विचार आपण करू शकतो.
*    स्मार्टफोनची निवड करत असताना ऑपरेटिंग सिस्टीम ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. सध्या बाजारात अँड्रॉइड, ब्लॅकबेरी, आयओएस आणि विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमचे फोन्स उपलब्ध आहेत.
*    मोबाइलचा वापर हा सतत होत असल्यामुळे त्यातील प्रोसेसर हा चांगल्या दर्जाचा असणे आवश्यक आहे. यामध्ये सध्या क्वाड कोर किंवा डय़ुएल कोर प्रोसेसर बाजारात उपलब्ध आहेत.
*    सध्या बाजारात फुल एचडी डिस्प्ले उपलब्ध आहेत. यामुळे याचीच निवड करणे केव्हाही योग्य ठरेल.
*    मोबाइल एक सिम कार्डचा असेल तर किमान एक जीबी रॅम आणि डय़ुएल कोर असेल तर किमान दोन ते चार जीबी रॅम असणे अपेक्षित आहे.
*    सध्या मोबाइलचा ज्या प्रमाणात वापर होत आहे त्यानुसार मोबाइलमध्ये किमान आठ जीबी स्टोअरेज क्षमता असावी. कारण आठ जीबी मेमरीमध्ये वापरकर्त्यांला केवळ ६.५ जीबीच वापरायला मिळतात.
*    मोबाइल हा आपला सोबती असल्यामुळे आपण जातो तेथे एखादा फोटो आपल्याला टिपायचा असेल तर त्यासाठी फोनमध्ये कॅमेरा किमान पाच मेगापिक्सेलचा असावा.
*    फोनमधील बॅटरी क्षमता ही किमान दोन हजार एमएएचची असावी. जेणेकरून आपल्याला दिवसभर फोनमधील सर्व गोष्टींचा वापर करता येऊ शकतो.
*    तुम्ही ज्या ब्रँडचा फोन घेणार आहात त्या ब्रँडची सेवा देण्याची क्षमता आहे का, याचीही माहिती करून घ्या. म्हणजे फोन घेतल्यानंतर दुरुस्तीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये.

लॅपटॉप खरेदी करताना..
विद्यार्थी आणि व्यावसायिकांना लॅपटॉप ही एक महत्त्वाची गरज आहे. यामुळे लॅपटॉप घेताना आपण काय गोष्टी पाहाव्यात याची माहिती करून घेऊ या.
* चांगला लॅपटॉप घ्यायचा असेल तर तुम्ही किमान २० हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी ठेवा.
* लॅपटॉपमध्ये इंटेल डय़ुएल कोर किंवा एएमडी डय़ुएल कोर हे दोन प्रोसेसर वापरले जातात. यामुळे हे प्रोसेसर असलेले किंवा त्यापेक्षा जास्त क्षमता असलेले लॅपटॉप घेणे केव्हाही योग्य.
* लॅपटॉपच्या स्क्रीनचा किमान आकार हा १४ इंचांचा असावा.
* विंडोज ७ किंवा ८ ही ऑपरेटिंग सिस्टीम असावी.
* यात रॅम किमान दोन जीबीची असावी.
* यूएसबी आणि एचडीएमआय पोर्ट असावे.
* ब्लूटय़ूथ आणि वाय-फाय जोडणी असणे आवश्यक आहे.