स्तनाचा कर्करोग भारतासारख्या देशातही मोठय़ा प्रमाणात दिसून येतो. इस्रायली वैज्ञानिकांनी स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी नवी चाचणी शोधून काढली आहे. ‘इव्हेन्ट्स डायग्नॉस्टिक्स’ या कंपनीने तयार केलेल्या तंत्रात रक्ताची चाचणी केली जाते. यात कर्करोगाच्या गाठीला प्रतिकारशक्ती प्रणाली कसा प्रतिसाद देते हे बघितले जाते. ‘इव्हेन्ट्स डायग्नॉस्टिक्स’ ही कंपनी जेरुसलेम येथे आहे व ‘ऑक्टाव्हा पिंक’ या नावाने ते ही चाचणी रुग्णांसाठी उपलब्ध करून देणार आहे.जेव्हा रक्ताचा नमुना कर्करोग प्रतिपिंडाच्यासहित विशिष्ट प्रथिनांच्या संपर्कात येतो. त्यानंतर काही तासांतच एक अभिक्रिया होऊन ती सूक्ष्मदर्शकाखाली बघता येते. डॉक्टरांना मॅमोग्राम अल्ट्रासाऊंड व एमआरआय या तंत्रातून जे कळेल त्यापेक्षा जास्त माहिती कर्करोग गाठीविषयी जास्त माहिती मिळते. असे असले तरी ही निदान पद्धती सध्याच्या चाचण्यांना पर्याय नाही, असे कंपनीचे उपाध्यक्ष डॉ. गलित याहालोम यांनी सांगितले. जेव्हा सर्वच चाचण्यांचे निकाल अस्पष्ट येतात तेव्हा ही नवीन निदान पद्धती वापरतात. जेव्हा स्त्रियांच्या स्तनांतील उती खूप दाट असतात तेव्हा गाठ शोधून काढणे अवघड होते. आरोग्य सांख्यिकीनुसार प्रतिमाचित्रणात चुकीचे निदान होऊ शकते. पाश्चात्त्य देशात दर सात महिलांपैकी एकीला स्तनाचा कर्करोग आहे. याहालोम व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची चाचणी एक हजार स्त्रियांमध्ये वापरली. ७० ते ९७ टक्के प्रमाणात ही चाचणी अचूक ठरली आहे.