मोबाइल फोन चार्जर हा नेहमी कटकटीचा विषय आहे. चार्जिग संपले की काय करायचे, यावर आता बाजारात अनेक चार्जर उपलब्ध आहेत, पण त्यातील बहुतांश हे एक तर आधी चार्ज केलेले असावे लागतात व ते तुमच्याजवळ असले पाहिजेत. यात तुम्ही दोन्हीपैकी एक गोष्ट विसरलात तरी तुमचा मोबाइल चार्ज करणे शक्य नाही. पण आता टॉमी हिलफिंगर कंपनीने अंगावर बाळगता येईल असा पोर्टेबल चार्जर तयार केला आहे. त्यात ‘पीव्हिलियन’ या सौर पॅनल उत्पादक कंपनीची मदत घेतली आहे. टॉमी हिलफिंगर कंपनीने असा चार्जर असलेली जॅकेटची जोडीच सादर केली आहे. त्यातील एक जॅकेट पुरुषांसाठी व दुसरे महिलांसाठी आहे. त्यात सोलर पॅनेलच्या मदतीने सौरशक्ती संकलित केली जाते त्यातून तुम्ही मोबाइल, आयफोन किंवा आयपॅड चार्ज करू शकता, टार्टन डिझाइनची ही जॅकेट आहेत, त्यात पाण्याने हानी होणार नाही अशी सौर पॅनेल त्यात आहेत. ते आपोआप चालू-बंद होतात. यात एक केबल ही पुढच्या खिशातील बॅटरी पॅकला जोडलेली आहे. त्याला दोन यूएसबी पोर्ट आहेत, त्यामुळे दोन यंत्रे एका वेळी चार्ज करता येतात. यातील बॅटरी पॅक पूर्ण चार्ज असेल तर १५०० मिलिअ‍ॅमिटर/तास क्षमतेची उपकरणे चारदा चार्ज करता येतात. सूर्यापासून सौरऊर्जा संकलित करण्यासाठी किती वेळ लागतो हे अजून स्पष्ट झालेले नाही. जर सौर ऊर्जेने चार्जिग कमी वेगाने होत असेल तर तुम्ही बाह्य़ यूएसबी स्रोत वापरून चार्जिग करू शकता. या जॅकेटची किंमत ५९९ डॉलर असून टॉमी हिलफिंगरच्या संकेतस्थळावर किंवा स्टोअर्समध्ये तुम्ही ते खरेदी करू शकता. यातील उत्पन्नाचा पन्नास टक्के वाटा फ्रेश एअर फंडला जाणार आहे.