प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्सच्या अतिरेकी वापराने जीवाणूंची त्यांना विरोध करण्याची क्षमता वाढली आहे. त्यामुळे आता प्रतिजैविकांचा जीवाणू मारण्यासाठी फारसा उपयोग होत नसल्यामुळे येत्या सन २०५० पर्यंत दरवर्षी १ कोटी लोक मरतील व त्यामुळे जागतिक जीडीपीचे २.० ते ३.५ टक्के इतके नुकसान होईल. ब्रिटिश सरकारने प्रतिजैविकांच्या अतिवापराच्या परिणामांबाबत नेमलेल्या आयोगाने हे निष्कर्ष काढले आहेत.
‘द रिव्ह्य़ू ऑफ अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स’ असे या अहवालाचे नाव असून त्यात म्हटले आहे की, प्रतिजैविकांमुळे शस्त्रक्रिया सोप्या झाल्या हे खरे आहे. अगदी सीझरियन सारख्या शस्त्रक्रियातही त्यांचा वापर केला जातो पण किरकोळ कारणासाठी जेव्हा प्रतिजैविकांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला गेला तेव्हा त्याचा परिणाम कमी होत चालला आहे. गोल्डमन सॅशचे माजी अर्थशास्त्रज्ञ जिम ओनिल व काही ब्रिटिश आरोग्य तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे.
पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी हा अहवाल जाहीर केला. प्रतिजैविकांना जीवाणू दाद देत नसल्याने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण आशियात सर्वात जास्त म्हणजे ४७ लाख व आफ्रिकेत ४१ लाख आहे. युरोपात ३९०००० तर अमेरिकेत ३१७००० राहील, असे या अंदाजात म्हटले आहे.
दुसरा महत्त्वाचे मृत्यूकारण असलेल्या कर्करोगाने २०५० पर्यंत ८२ लाख लोक मरण पावतील असा अंदाज आहे. प्रतिजैविकांचा प्रभाव संपत चालल्याने जगात त्याचे वाईट परिणाम दिसत आहेत. प्रतिजैविकांना न जुमानणाऱ्या जीवाणूंच्या प्रजाती तयार झाल्या आहेत. तशा प्रकारच्या संसर्गाचे प्रमाण युरोप व अमेरिकेत दरवर्षी ५० हजार लोक मरण पावतात.
युरोपचा रँड समूह व केपीएमजी सल्लागार संस्था यांच्या अभ्यासाच्या आधारे ही आकडेवारी तयार करण्यात आली आहे. प्रतिजैविकांना जीवाणूंकडून होत असलेला विरोध ही मामुली गोष्ट नसून त्याकडे लक्ष दिले पाहिजे, कारण त्यामुळे जगातील आरोग्यसेवेवर मोठा बोजा पडणार आहे असे अहवालात म्हटले आहे. या समस्येत आताच आर्थिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. क्लेबसिला न्यूमोनिया,  एशेरिशिया कोली (इ कोली) व स्टॅफिलोकॉकस ऑरस या तीन जीवाणूंमध्ये औषधांना प्रतिरोध निर्माण झाला आहे. त्यामुळे एचआयव्ही, मलेरिया व क्षय यासारख्या आजारांवर उपचार करणे ही सार्वजनिक आरोग्यातील अवघड समस्या होत चालली आहे असे अहवालात म्हटले आहे.

प्रतिजैविकांच्या अतिवापराने दुष्परिणाम
*आशियात ४७ लाख, तर आफ्रिकेत ४१ लाख मृत्यू शक्य
*वर्षांला १ कोटी लोक मरण्याची शक्यता.
*जागतिक जीडीपीला २.० ते ३.५ टक्के फटका
*क्लेबसिला न्यूमोनिया,  एशेरिशिया कोली (इ कोली) व  
स्टॅफिलोकॉकस ऑरस जीवाणू प्रतिजैविकांना सरावले.