‘उबर’ या अमेरिकी कंपनीच्या टॅक्सी सेवेचा वापर करणाऱ्या गुडगावच्या एका महिला अधिकाऱ्यावर बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर आपल्या सरकारला जाग आली. त्यांनी तातडीने उबरवर बंदी घातली. ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते करट’, या न्यायाने हा निर्णय घेणे फार सोपे होते; पण भारतात ट्रकसारखी अवजड वाहने किंवा इतर कुठलीही वाहने चालवण्याचे परवाने घरपोच आणून दिले जातात. त्यासाठी तुमची कुठलीही तपासणी होत नाही, हे सत्य आहे. आधीच महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांनी जगात प्रतिमाभंजन होत असलेल्या आपल्या देशात प्रश्न एकटय़ा बलात्कारासारख्या भीषण घटनांचाच नाही, तर बेदरकार गाडय़ा चालवल्याने होणाऱ्या हकनाक मृत्यूंचाही आहे. कुणी एखाद्याला गाडीखाली चिरडले तरी तो जामिनावर सुटतो, हे एका सुमार, बेलगाम अभिनेत्याच्या उदाहरणावरून सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे उबर गाडीवरील बंदी हा खरेच उपाय आहे, की सामान्य लोकांना ‘कारवाईनाटय़ा’चा आभास देण्याचा तात्पुरता प्रकार?.. उबर घटनेच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या अनेक

प्रश्नोत्तरांचा हा कोलाज..
महिलांच्या दृष्टीने १६ डिसेंबरनंतरच्या दिल्लीतील ‘त्या’ घटनेनंतर सगळेच पुरुष खलनायक बनले आहेत. जगभरामध्ये भारताची नाचक्की झाली ती वेगळी. फेसबुकवर वगरे जी चर्चा होते आहे किंवा दूरदर्शनवर या नावाने जे व्यक्तिविशेष दाखवले जात आहेत, त्यातील काही परिस्थिती खरोखर आहे; पण त्याचे मूळ आपल्या मूल्यसंस्कारात व िहदी चित्रपटांनी रुजवलेल्या मूल्यसंस्कृतीत आहे. शिवाय जागतिकीकरणाच्या राक्षसाने विविध माध्यमांतून आपल्या मूल्यसंस्कारांना खंगाळून तयार केलेली संकरित मुर्दाड मूल्ये यांनी समाजात अभूतपूर्व बदल होत आहेत.
उबरच्या प्रकरणात एका महिला वकिलाने जी याचिका दाखल केली त्यात तिने असे म्हटले आहे की, एका विशिष्ट तारखेला आपण त्याच (बलात्कारी) शिवलाल यादव याच्या उबर टॅक्सीत बसलो होतो व तो विखारी डोळ्यांनी आपल्याकडे बघत होता. आपण (प्रवासी महिला) वकील आहे हे समजल्यावर त्याने ‘मी खून केलेला आहे व त्यातून सुटण्यासाठी मार्ग सांगा’ असे विचारलेही होते; पण या वकील महिलेने ही गोष्ट तेव्हा पोलिसात तक्रार देऊन सांगितली नाही. नंतर उबर टॅक्सीच्या बाबतीत पुढचा प्रकार घडला. जर त्या महिलेने ही तक्रार आधीच दिली असती तर पुढचा प्रसंग कदाचित घडलाही नसता; पण यालाही प्रतिवाद आहेत. या बाई तरी वकील होत्या; एका पोलीस अधिकारी बाईंनी आधी न्यायालयात दिलेली अशाच स्वरूपाची एक तक्रार मागे घेण्याची विनंती न्यायाधीशांना केली. या पोलीस अधिकारी बाईंनाही जिवाची भीती वाटत होती म्हणून त्या तसे म्हणत होत्या. त्यावर न्यायाधीशांनी सांगितले की, तुम्ही ही तक्रार मागे घ्यायची नाही. हा खटला चालवणार कोण? तुमच्या वाटेला कोण येते पाहू, असा विश्वास त्यांनी दिला. ही पंधरा दिवसांपूर्वीची घटना आहे. म्हणजे महिलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करताना त्यांना तक्रार दिल्यानंतर संरक्षण देण्याची जबाबदारीही आपली आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. नुसती बंदी वगरे घालणे हे राणाभीमदेवी थाटाचे उपाय आहेत. या घटना काय निव्वळ टॅक्सीतच घडतात?

जीपीएस तंत्रज्ञानाची मदत
आपण यात तंत्रज्ञानालाही बदनाम करतो आहोत हे विसरता कामा नये. एखाद्या टॅक्सीत जीपीएस वापरले नाही तर ती त्या तंत्रज्ञानाची चूक नसते. जीपीएस असेल तर टॅक्सी कुठून निघाली, रस्त्यात कुठे थांबली, शेवटी कुठे गेली हे सगळे कळू शकते. सीसीटीव्ही कॅमेरे टॅक्सीतही लावता येतील. जर सेवा चांगलीच द्यायची तर तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे ही सगळी यंत्रे चालू ठेवली जातात ना, यावर मात्र लक्ष ठेवावे लागेल. ते अवघड नाही.

महिला टॅक्सीसेवात गुंतवणूक हवी
‘शी’ कॅब्स, प्रियदर्शनी टॅक्सी, व्हिरा कॅब्स या सेवा पाच वर्षांपूर्वीच महिलांनी महिलांसाठी सुरू केल्या होत्या. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना या सेवा चालवणे अवघड नव्हते, पण मर्यादित सेवेसाठी आíथक गुंतवणूक जास्त लागते. त्यामुळे त्यांचा हवा तेवढा वापर झाला नाही किंबहुना आता असा सेवांचा प्रचार आणि प्रसार वेगाने होणे गरजेचे आहे. या सर्व कंपन्यांची वाढ फार कमी गतीने झाली. दिल्लीत निर्भया प्रकरण २०१२ मध्ये १६ डिसेंबरला घडले होते, नंतर आता उबरचे प्रकरण पुढे आले आहे. २०१० पासून दिल्लीत ‘सखा कन्सिल्टग िवग्ज’ ही स्वयंसेवी संस्था ना नफा ना तोटा तत्त्वावर महिलांसाठी महिलांनी चालवलेली टॅक्सी सेवा देत आहेत. ही सेवा आझाद फाउंडेशनची आहे, त्यामुळे महिलांना रोजगार व महिला चालकांना सुरक्षा दोन्ही मिळते. पण ही कॉल टॅक्सी नाही. मोठ्या ट्रिप किंवा खासगी ग्राहक यांच्यासाठी आहे. आझाद फाउंडेशन महिला चालकांना १४ सत्रात प्रशिक्षण देते. त्यांच्या गाड्यांमध्ये जीपीएस आहे. प्रशिक्षित महिला चालकांची संख्या वाढली पाहिजे, असे या ‘सखा’ सेवेच्या संचालिका नयनतारा जनार्दन सांगतात. महिलांना त्यासाठी मोकळा वेळ दिला पाहिजे. कुटुंबाच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा जरा कमी झाल्या तर हे शक्य आहे, शिवाय त्यांना रोजगारही चांगला मिळाला पाहिजे.

पहिली महिला कॅब कंपनी
महिलांसाठीची पहिली कॅब कंपनी म्हणजे पोर्शे कॅब कंपनी, ती रेवती रॉय यांनी सुरू केली. पण या उद्योगात पसा नाही. दहा महिने टॅक्सीचालक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी ही कंपनी सुरू केली होती. महिलांना प्रशिक्षण दिले जात होते. गरीब स्त्रियांना रोजगार मिळाला होता. १००० स्त्रियांना प्रशिक्षण मिळाले होते, पण ही कंपनी नंतर बंद पडली. त्यात गुंतवणूक कोण करणार हा प्रश्न होता. रेवती रॉय यांच्या मते मेरू किंवा इझी कॅब या कंपन्यांना एकावेळी ५०० मोटारी ठेवणे परवडते पण महिलांसाठी टॅक्सी सेवा सुरू करायला बीज भांडवलही मिळत नाही.  रेवती रॉय म्हणतात,‘ समाजातील खालचे थर सोडून कुणालाही आपली पत्नी किंवा मुलगी टॅक्सी चालवते असे सांगायला आवडणार नाही. त्यामुळे महिला चालकांचा प्रश्नही आहे.’ सखा (दिल्ली ), प्रियदíशनी( मुंबई) या कंपन्यांच्याबाबतीत गुंतवणूक हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.

केरळची शी-टॅक्सी
नोव्हेंबर २०१३ मध्ये केरळ सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शी – टॅक्सी सेवा २४ तास उपलब्ध करून दिली आहे, त्यांच्या एकूण ३५ टॅक्सी आहेत. त्रिवेंद्रम, कोचिन येथे त्या चालतात व रोज ४० महिलांना सेवा देतात, असे समन्वयक नीथू टी.डी यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारनेही महिलांना परवाने देताना त्याचा दर तीन लाखाच्या निम्मा ठेवला आहे. आता महाराष्ट्र सरकारने पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या मोठ्या शहरात शी- टॅक्सीचे अनुकरण करायला हरकत नाही. शिवाय रीतसर परवाना असलेल्या अप टॅक्सीज सुरू करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे टॅक्सी ठरवण्यात सहजता येते. अप असणे हा उबर प्रकरणातील दोष नाही.

महिला स्पेशल टॅक्सीमुळे प्रवासी व चालक या दोघींनाही स्वातंत्र्य मिळते. मी रोज दहा तास गाडी चालवते, रात्रीच्यावेळी गाडी चालवावी लागते, कारण तेव्हाच जास्त महिलांना सुरक्षिततेची जास्त गरज असते. यातून मला महिन्यास ७ ते १५ हजार रूपये मिळतात. मी मार्शल आर्ट्स शिकलेली आहे, रोज जवळ मिरपूड जवळ ठेवलेली असते त्यामुळे वेळ पडली तर कुणाशी सामना करण्याची तयारी ठेवावी लागते. काही लोक म्हणतात, हे घाणेरडे काम तुम्ही का करता? पण रस्त्यावर महिलांना सुरक्षा देण्यासाठी आपण हे काम करतो. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. समाजात स्थानही मिळते. शिपाई म्हणून काम करण्यापेक्षा महिलांनी टॅक्सी चालवणे केव्हाही चांगले.
सविता तोमर, टॅक्सीचालक, सखा सेवा

न्यूयॉर्कच्या महिला टॅक्सीच्या कथा-व्यथा
१९४० मध्ये न्यूयॉर्कमध्ये महिलांसाठी टॅक्सी सुरू केल्या पण त्याचे चालक ९९ टक्के पुरूष होते, ती शी-टॅक्सी सेवाच होती. चार टक्के महिला तिचे ऑनलाइन बुकिंग करीत असत, पण त्यावर महिला चालकच हवी असा आग्रह धरता येत असे. वेचेस्टर ते लाँग आयलंड दरम्यान शी-राइडस ही सेवा आहे. ब्राझील व मेक्सिकन शहरातही महिलांसाठी खास सार्वजनिक वाहतूक सेवा ‘िपक ट्रान्सपोर्ट’ नावाने उपलब्ध आहेत. जपानमध्ये तर १९१२ पासून हाना देन्शा (फ्लॉवर ट्रेन्स) या केवळ महिलांसाठी आहेत. न्यूयार्कमधील शी-टॅक्सीजच्या विरोधात काहींनी िलगभेदभाव या मुद्दयावर न्यायालयात दावे केले आहेत कारण तेथे पुरूषांना नोकऱ्या मिळत नाहीत. २०१० मध्ये न्यूयॉर्कमध्ये एक पाहणी करण्यात आली; त्यात त्यावर्षी झालेल्या ८० टक्के अपघातात पुरूष चालकांचा दोष होता. यावरून महिलांना टॅक्सी चालवायला दिल्याने अपघातांचे प्रमाणही कमी होते हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

टॅबकॅब व मेरू सेवेच्या उपाययोजना
मेरू सेवेच्या १५०० टॅक्सी मुंबईत आहेत. त्यांनी एसएमएसवर आधारित ट्रॅकर सुविधा दिली आहे. चालकाचे नाव व माहिती त्यात येते. घरच्यांना एसएमएस अलर्ट पाठवले जातात. टॅबकॅबच्या १८०० टॅक्सी असून त्यांनीही अशाच प्रकारच्या सुविधा प्रवाशांना दिल्या आहेत.

लंडनमधील पिंक लेडीज
२००५ मध्ये लंडनमध्ये एका तोतया टॅक्सी चालकाने एका मुलीचा खून केला, त्यानंतर तेथे फक्त महिलांसाठी टॅक्सी सेवा देणारी ‘िपक लेडीज कंपनी’ स्थापन झाली. नंतर २००६ मध्ये त्यांची शाखा मॉस्कोतही सुरू झाली. इराण, संयुक्त अरब अमिरातीतही अशा सेवा सुरू
होत आहेत.

माझा उद्देश महिलांना उद्योग मिळवून देणे, त्यांना सक्षम करणे हा आहे, एक स्त्री म्हणून  मला स्त्रीबरोबर सुरक्षित वाटते.
दोन मुलींची आई म्हणून मुली सुरक्षित रहाव्यात यासाठी आपण शी टॅक्सी (न्यूयॉर्कमध्ये शीराइड) ही सेवा सुरू केली. आयफोन व अँड्रॉइडवर आमची सेवा उपलब्ध आहे. न्यूयॉर्कमध्ये ११५००० चालकांपकी ३ टक्के महिला असून त्या लिमोझीनसारख्या मोठ्या गाड्याही चालवू शकतात.
– सेट्ला मॅटियो, मालक शी-टॅक्सी, अमेरिका

मुंबईत महिलांसाठी नवी टॅक्सी सेवा येणार
मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘ओलाकॅब्स’ ही कंपनी महिलांसाठी महिलांनी चालवलेली टॅक्सी सेवा आणत आहे. उबर कंपनीच्या कॅबमध्ये दिल्लीत महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर ही टॅक्सी सेवा सुरू होत आहे पण त्यांच्यापुढेही पसा हाच प्रश्न आहे.

इझी टॅक्सी
सौदी अरेबियात महिलांना मोटार चालवण्याची परवानगी नाही, तरी त्यांचे म्हणणे सक्षमीकरण करण्यसाठी इझी टॅक्सी ही महिलांसाठीची सेवा आहे. ८० टक्के महिला तिचा वापर करतात. जॉर्डन, कुवेत, कतार, बहारिन या मध्यपूर्वेकडील देशात ही सेवा आहे.

मुंबईची प्रियदशनी
मुंबई येथे सुशीबेन शहा यांनी ‘प्रियदíशनी’ ही टॅक्सी सेवा महिलांसाठी सुरू केली. त्यांच्याकडे २५ मोटारी आहेत. कमी प्रवासी असल्याने १० किलोमीटरला २५० रूपये व नंतरच्या किलोमीटरला २१ रू दर कि.मी. आकारले जातात, तर

ओला मिनी कंपनी कि.मी.ला फक्त १५ रूपये आकारते. त्यामुळे केवळ महिला टॅक्सींसाठी गुंतवणुकीची गरज आहे, तरच हे दर खाली आणता येतील. व्हिरा कॅब्स व मुंबई गोल्ड कॅबशी या महिला टॅक्सी सेवांना स्पर्धा करता आलेली नाही. येथे सुविधा आणि उत्पन्न या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

मुंबईत व्हिरा कॅब महिला चालक आणणार
व्हिरा कॅब ही सामाजिक कार्यकर्त्यां व उद्योजक प्रीती शर्मा मेनन यांची सेवा आहे. सुरक्षित सेवा हे त्यांचे ब्रीद आहे. उबेरच्या घटनेनंतर त्यांनी महिला चालक आणण्याचे ठरवले असून त्या केवळ महिला प्रवाशांनाच घेऊन जातील. महिला चालकांना कराटे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांना चाकू व मिरची पावडरही दिली जाणार आहे.

विमन टॅक्सी डॉट ओआरजी
अमेरिकेतील ‘स्मिथ’ कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी घेतलेल्या नूिमद्री एस यांनी ‘विमन टॅक्सी डॉट ओआरजी’ हे संकेतस्थळ तयार केले आहे. त्या हिफगटन पोस्टच्या ब्लॉगर असून महिलांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. त्यांची ‘डब्ल्यू फॉर डब्ल्यू’ ही टॅक्सी सेवा मंगोलिया या त्यांच्या मायदेशात सुरू होत आहे. Nomindari@womenstaxi.org