हरित कार्यालये म्हणजे वनस्पती असलेली कार्यालये. ही कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवण्यास मदत करतात असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. वनस्पती असलेल्या या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता १५ टक्के वाढते असा दावा करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी वनस्पतींमुळे हवा खेळती राहते व त्यामुळे असे घडून येते. इंग्लंड व नेदरलँड्समधील दोन व्यावसायिक कार्यालय इमारतींचे निरीक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. कार्डिफ विद्यापीठाच्या मनोविकारशास्त्र विभागाचे मरलॉन न्यूवेनह्यू यांनी हे संशोधन केले असून त्यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी मदत होणार आहे. यापूर्वीही प्रयोगशाळेतील संशोधनात वनस्पतींचे फायदे दिसून आले होते. स्वच्छ व हिरवाईने नटलेले कार्यालय हे जास्त उत्पादनक्षम असते. वनस्पतींमुळे कामाचे समाधान वाढते, कर्मचाऱ्यांची कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते व हवेचा दर्जाही सुधारतो. वनस्पतींमुळे कर्मचारी शारीरिक, बोधन व भावनिक पातळीवर कामाशी एकरूप होतात. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची मानसिकता महत्त्वाची असते. त्यामुळे केवळ यंत्रांनी नव्हे तर हिरवाईने नटलेल्या कार्यालयाचा फायदा होतो असे सहलेखक एक्स्टर विद्यापीठाचे डॉ. क्रेग नाईट यांनी सांगितले.