भूमिगत पातळीवर वाढणारे एकपेशीय जीवाणू हे घातक अणुकचरा खातात असे दिसून आले आहे. त्यामुळे अणुकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांचा उपयोग करणे शक्य आहे असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या जीवाणूंमध्ये कचरा खाण्याचे गुणधर्म असले तरी ते विशिष्ट मातीतच सापडतात. अतिशय कठीण स्थितीत ते टिकून राहू शकतात. अणुकचरा असलेल्या ठिकाणीही ते जिवंत राहून हा कचरा खातात. ‘एक्सट्रीमोफाइल’ असे या जीवाणूंचे नाव असून ते ब्रिटनच्या अल्कधर्मी मातीत सापडले आहेत.
अणुकचऱ्याची विल्हेवाट लावणे हा एक मोठा प्रश्न आहे व सध्या तो जमिनीत खोलवर गाडला जातो, तरी ते घातक आहे. काँक्रिटमध्ये बंदिस्त करून तो गाडावा लागतो. जेव्हा भूजल हा कचरा ठेवलेल्या पातळीला पोहोचते तेव्हा सिमेंटवर त्याची प्रक्रिया होते व ते अल्कधर्मी बनते. त्यामुळे अनेक रासायनिक क्रिया होऊन कचऱ्यातील सेल्यूलोजचे विघटन होते, त्यात आयसो सॅखरिनिक आम्लाचा समावेश आहे. त्याची रेडिओन्युक्लायडस बरोबर अभिक्रिया होऊन  अस्थिर व विषारी मूलद्रव्ये बाहेर पडतात. ती मूलद्रव्ये ही अणुशक्ती निर्मितीच्यावेळी असलेल्या मूलद्रव्यांसारखी असतात. जर आयसोसॅखरिनिक आम्ल युरेनियमसारख्या रेडिओन्युक्लायडसशी बंधित झाले तर ती पाण्यात विरघळून भूजलात येऊ शक तात व ते पाणी पिण्यास घातक ठरते. किरणोत्सारी पदार्थ अन्नासखळीत येतात. नवीन जीवाणू ही अडचण सोडवण्यास उपयोगी आहेत. ब्रिटनमधील पीक जिल्ह्य़ातील अल्कधर्मी औद्योगिक पट्टय़ात मातीचे नमुने घेतले असता  तेथे एक्सट्रीमोफाइल हे जीवाणू आढळले.  ते अल्कधर्मी स्थितीत जिवंत राहतात. ते आयसो सॅखरिनिक आम्लाचा वापर अन्न म्हणून करतात, त्यामुळे किरणोत्सारी कचऱ्याचा धोका कमी होतो. अणु कचरा भूमिगत पातळीवर हजारो वर्षे राहतो, असे मॅचेस्टर विद्यापीठातील अ‍ॅटमॉस्फेरिक अँड एनव्हायर्नमेंटल स्कूल ऑफ अर्थ सायन्सेसचे प्रा. जोनाथन लॉइड यांनी सांगितले. ‘आयएसएमइ’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.