मेंदूतील एक विशिष्ट भाग उद्दिपित झाल्यामुळे जास्त उष्मांक असलेले स्नॅक्स व जंकफूड खाण्यास आपण प्रवृत्त होतो, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले असून मेंदूतील डोरसोलॅटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (डीएलपीएफसी) या भागाच्या  उद्दिपनामुळे तरूण महिलांमध्ये जास्त उष्मांक असलेले पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढते. डीएलपीएफसीचे कार्य नियंत्रित करून आपण हे जास्त उष्मांक असलेले पदार्थ खाण्याची सवय टाळू शकतो. यात २१ आरोग्यवान तरूण महिलांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना सतत चॉकलेट व वेफर्स खाण्याची सवय होती. यासारख्या पदार्थांमुळेच जाडी वाढते. या महिलांना या अन्नाची छायाचित्रे दाखवली तरी त्यांना भूक लागल्यासारखे वाटत असे. नंतर वैज्ञानिकांनी डीएलपीएफसी या भागाला सतत चुंबकीय धक्के म्हणजे थिटा बर्स्ट स्टिम्युलेशन दिले. त्यानंतर त्यांचे जास्त उष्मांक असलेले पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढले. यापूर्वीच्या अभ्यासानुसार डीएलपीएफसीच्या कार्यशीलतेमुळे भुकेच्या संवेदनेचे नियंत्रण होते. थिटी बर्स्ट स्टिम्युलेशनमुळे या स्त्रियांना आणखी चॉकलेट व वेफर्स खावेसे वाटू लागले, त्या जास्त प्रमाणात ते खाऊ लागल्या. डीएलपीएफसीचे उद्दिपन जर कमी केले तर अशा प्रकारचे जास्त उष्मांक असलेले अन्न खाण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे वजन वाढत नाही व जाडीही वाढत नाही. चवीच्या चाचणीसाठी यात डार्क चॉकलेट व सोडा क्रॅकर्स यांचा वापर करण्यात आला, यात स्ट्रप टेस्ट ही चाचणीही महत्त्वाची ठरते. डीएलपीएफसी क्रियाशीलता कमी केल्याने या चाचणीतील कामगिरी कमी होते.