गेल्या शतकभरात देशाटनाच्या संकल्पना बदलल्या आणि प्रगतीमुळे सुकर झालेल्या साधनांनी जगभरात हुएन त्संग, इब्न बतुता, मार्को पोलो यांचे उत्तराधिकारी बनलेले जगभरचे पर्यटोत्सुक छोटय़ा काळात अक्षांश-रेखांशात मावणाऱ्या पृथ्वीच्या मोठय़ा प्रदेशाचे दर्शक बनू लागले. पट्टीचा पर्यटक हा स्थानिक-प्रादेशिक- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सीमांची कैक रूपे अध्र्या जन्मात आस्वादू लागला. जगभरातील पर्यटनासाठी सुकर राष्ट्रांमध्ये भारताचा क्रमांक १४४ देशांत ६५वा आहे. मात्र त्याच वेळी जगभरातील पर्यटनामध्ये खर्च करण्यात भारताचा क्रमांक २०वा आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने तिसऱ्या क्रमांकाचा उद्योग असलेल्या पर्यटन क्षेत्रावर ज्ञानझोत आणि ठळक तथ्ये.
देशी पर्यटन- पर्यटकांची सद्य:स्थिती
ग्लोबलोत्तर जगामध्ये पर्यटनाचे महत्त्व घरादारांत पोहोचविण्यात नॅशनल जिओग्राफिक- डिस्कव्हरी आदी जगाला छोटय़ा पडद्यात मांडणाऱ्या वाहिन्यांनी मोठे काम केले. पैशांची आवक वाढलेल्या मध्यमवर्गाची स्वप्ने कुलू-मनाली, सिमला, केरळ यांच्याऐवजी थायलंड-मलेशिया-सिंगापूर बनू लागली. १९९९ नंतर दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये पर्यटनवाढीचे कठोर ध्येय ठेवून ती पूर्ण करीत जगाच्या पर्यटन नकाशावर ठळक बनलेल्या मलेशिया या राष्ट्राला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्याच्या तोडीची विविधता विपुल प्रमाणावर असूनही भारत मात्र पर्यटनामध्ये निरुत्साहवाद्यांचे म्होरकेपण मिरवित आहे. त्याच वेळी भारतीय पर्यटनहितेच्छू नागरिक मात्र विविध आकर्षक टूर पॅकेजद्वारे परकीय राष्ट्रांची गंगाजळी वाढवत आहेत. मौज-मजा-हुल्लडबाजीसाठी स्वस्तात लाभणाऱ्या मलेशिया-थायलंड-तझाकिस्तानसारख्या राष्ट्रांना कवटाळत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातून विशिष्ट पर्यटकांचे जथेच्या जथे देशाटनाची विविधांगी उद्दिष्टे पार पडत आहेत. या देशातील विविधतेने नटलेल्या गोष्टींचा परिचय शालेय भूगोलाच्या पुस्तकांखेरीज करायचा नसतो, अशी भूमिका घेत आपल्या आर्थिक वकुबानुसार देशाटनाची आनंदक्षेत्रे सध्या पर्यटकांकडून उपभोगली जात आहेत. ग्लॉसी पेपर्सवर छापली जाणारी ट्रॅव्हल आणि टूरिझम मासिके-साप्ताहिके यांना कधी नव्हे इतके चांगले दिवस आले असून, पर्यटन दाखविणाऱ्या वाहिन्यांचा टीआरपी चढा होऊ लागला आहे. देशांतर्गत पर्यटनाचे प्रमाणही गेल्या दशकभरामध्ये त्यामुळे वाढले आहे, पण देशांतर्गत पर्यटनामुळे आवश्यक तितके आर्थिक चलन-वलन होताना दिसत नाही. उलट पर्यटन क्षेत्रे-ऐतिहासिक ठिकाणे, संरक्षित-अबाधित निसर्गक्षेत्रे या स्थानिक पर्यटकांनी अतिक्रमित केल्याचे चित्र वाढू लागले आहे.  पर्यटनाबाबत राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक अनास्था यांच्या परिणामाने भारतीय पर्यटन व्यवसाय विस्तारण्याची अनन्वित क्षमता असूनही वेगळ्याच दृष्टचक्रात अडकून राहिलेला आहे.   
सामुदायिक विकास व पर्यटन
दरवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त  राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या वतीने हा दिवस म्हणून १९८० पासून साजरा होत आहे. यंदा जागतिक पर्यटन दिनाचा प्रमुख कार्यक्रम मेक्सिकोतील ग्वाडलजारा येथे होत आहे. यंदा प्रथमच या संस्थेने पर्यटकांना त्यांचे अनुभव सांगण्याची संधी दिली आहे. त्यासाठी डब्लूटीडी फेसबुक अल्बम या पानावर तुम्ही तुमच्या अलीकडच्या पर्यटनाचे फोटो शेअर करायचे आहेत. त्याचबरोबर हॅश डब्ल्यूटीडी २०१४ या ट्विटर हँडलवर जाऊन तुम्ही तुमचे पर्यटनाचे अनुभव वर्णनही करू शकता. पर्यटन दिनानिमित्त सामुदायिक विकास व पर्यटन ही संकल्पना या वेळी संयुक्त राष्ट्रांनी मांडली आहे.
धोरण ,अडथळे आणि उपाय
भारतात बाहेरील लोक पर्यटनासाठी फार कमी येतात. येणाऱ्यांची ठिकाणेही वैशिष्टय़ापलीकडे नसतात. त्यातच येथील बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, राजकारणाचे काळे रूप यांच्याबाबत सांगोवांगीच्या गोष्टी जगभर प्रसिद्ध आहेत. पर्यटन धोरणांबाबतची राजकीय अनास्था यांमुळे मलेशिया, थायलंड, बालीच काय तर तझाकिस्तान इतक्याही प्रमाणात पर्यटनकेंद्री बनू शकत नाही. महाराष्ट्राबाबत सांगायचे तर सरकारचे पर्यटन धोरण हे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल असेच असले पाहिजे. कोकणातील स्थानिक लोक काही प्रमाणात अशा पर्यटन व्यवसायात सहभागी आहेत. कृषी पर्यटन हा ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग आहे. आरोग्य पर्यटनात केरळ, तामिळनाडूतील चेन्नई आघाडीवर आहेत.
पर्यटन व सामुदायिक विकास
जेव्हा आपण पर्यटनासाठी जातो तेव्हा त्या गावातील वैशिष्टय़ असलेल्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतो. तेथील ज्या प्रसिद्ध वस्तू असतील त्या विकत घेतो. त्यामुळे तेथील लोकांचा आíथक विकास होत असतो. तेथील ठिकाणे पाहण्यासाठी तेथील वाहतूक व्यवस्थेचा वापर करतानाही आपण अनेकांना रोजगार देत असतो फक्त त्यासाठी आपण ठरवून तेथील लोकांना आर्थिक फायदा होईल असेच वागले पाहिजे. त्यात दुसरा मुद्दा असा की, तेथील स्थानिक लोकांनीही पर्यटकाला अवाच्या सव्वा किमती सांगून लूट करू नये. कारण आपली संस्कृती अतिथी देवो भव असेच सांगते. शहरी भागातील लोकांना त्यांच्या कामातून विसावा मिळावा म्हणून ते पर्यटनाला जातात. काही जण हौशी असतात ते दरवर्षी ठरवून सहकुटुंब पर्यटन करतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते.
आकडय़ांची भाषा
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार जगात दरवर्षी २० कोटी लोक पर्यटनाच्या निमित्ताने घराबाहेर असतात. गेल्या दशकभरात ही संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. अर्थव्यवस्थांमधील चढउतारांच्या वातावरणातही लोकांचा पर्यटनाचा उत्साह कमी झालेला नाही. भारतातील परिस्थिती पाहिली तर पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांना परदेशी पर्यटक कसे वाढतील ही एकच चिंता असते, कारण आपल्याकडे परदेशी पर्यटक २ टक्के तर देशी पर्यटक  ९८ टक्के अशी स्थिती आहे, अर्थातच परकीय चलन मिळावे हा त्यामागचा हेतू आहे, पण देशी पर्यटकांकडेही पैसा नाही असे नाही. त्यांच्यामुळे पर्यटनस्थळाच्या ठिकाणी स्थानिक लोकांच्या विकासास चालना मिळू शकते.
परदेशी पर्यटकांची         भारतातील संख्या
२०११- ६३०९२२२         २०१२- ६६४८३१८
मिळालेले परकीय चलन-
२०११ -७७५९१ कोटी रु.
२०१२ – ९४४८७ कोटी रु.
*पर्यटन हा देशात जास्त परकीय चलन मिळवून देणारा तिसरा उद्योग आहे.
*पर्यटन क्षेत्रात भारतातील रोजगार
– ३.९५ कोटी
*जगातील एकूण उत्पन्नाच्या ९ टक्के आर्थिक उत्पन्न पर्यटन उद्योगातून निर्माण होते.
*जगातील११ पैकी १ रोजगार हा पर्यटनातून निर्माण होतो.
पाळा पथ्ये, मग पर्यटन फत्ते!
*पर्यटकांनी कुठेही गेल्यानंतर त्या गावात कचरा व्यवस्थित कचरा पेटीतच टाकावा.
*पर्यटनस्थळाच्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असेच वर्तन असावे.
*ऐतिहासिक पर्यटनस्थळी गेल्यानंतर आपण तेथे आपली नावे कुणी पराक्रमी पुरुष किंवा स्त्री असल्याप्रमाणे कोरण्याचा मोह टाळावा.
*पर्यावरणस्नेही वाहतूक साधनांचा वापर करावा, जसे आग्रा येथे विजेवर चालणाऱ्या रिक्षा आहेत.
*तीर्थक्षेत्रांचे पर्यटन हा फार गांभीर्याने घेण्याचा विषय नाही असे समजले जाते, पण तिथेही लोकांनी अस्वच्छता टाळावी. वाराणसीमध्ये गंगेची दूरवस्था या पर्यटनाने झाली आहे. ’पंढरपूरमध्ये वारीच्या वेळी व इतर वेळीही काय स्थिती असते हे सर्वाना माहीत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी शासनाने स्वच्छतागृहे व इतर सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
*पर्यटकांनी देशात किंवा परदेशात पर्यटनाला जाताना आवश्यक ती ओळखपत्रे व इतर कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे.
*जिथे आपण पर्यटनाला जातो तेथील संस्कृतीची चेष्टा करू नये. मध्यंतरी जारवा जमातीच्या लोकांची नग्न छायाचित्रे घेण्यात आली होती, असे प्रकार करण्याचे टाळावे.
*परदेशी पर्यटकांची  आवडती राज्ये
   महाराष्ट्र,  तामिळनाडू, दिल्ली
*देशी पर्यटकांची आवडती राज्ये
उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू
*परदेशी पर्यटकांची पसंतीची पर्यटनस्थळे
चेन्नई, दिल्ली, मुंबई, आग्रा
विविध राज्यातील पर्यटनस्थळे
*आंध्र प्रदेश –
हैदराबाद- सिटी ऑफ पर्लस म्हणून प्रसिद्ध, ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाण
तिरुपती- व्यंकटेश्वराचे मंदिर
विजयवाडा- कनकदुर्ग मंदिर, भवानी बेटे
विझाग- भीमली बंदर
*अरुणाचल प्रदेश
परशुरामकुंड, तवांग मोनेस्ट्री
गंगा लेक
*आसाम
काझीरंगा नॅशनल पार्क
माजुली बेटे, मानस नॅशनल पार्क, गुवाहाटीजवळ मदन कामदेव (खजुराहोसारखे ठिकाण) गोपेश्वर मंदिर
*बिहार
नालंदा- नालंदा विद्यापीठ क्षेत्र
पाटणा- ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण, वैशाली- भगवान महावीरांचे जन्मस्थान
गया- बोधगया
*छत्तीसगड
चित्रकोट धबधबा, कुटुमसार गुंफा, काकोटाल धबधबा
*दिल्ली
लाल किल्ला, लोटस मंदिर, कुतुबमिनार, अक्षरधाम मंदिर
*गोवा
पोर्तुगीज चर्चेस, दूधसागर धबधबा, मंगेशी मंदिर गोवा कार्निव्हल (उत्सव), शांतादुर्गा मंदिर
*महाराष्ट्र
माथेरान, मुंबई, अंजठा-एलोरा- औरंगाबाद, शिर्डी, कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, सिंधदुर्ग,रायगड, नाशिक, पुणे
*गुजरात
गीर नॅशनल पार्क (जुनागड), द्वारका, सोमनाथ (प्रभास पाटण) सरदार सरोवर (केवडिया कॉलनी- नवगाव) अहमदाबाद, पोरबंदर,
ढोलविरा
*उत्तर प्रदेश
आग्रा (ताजमहाल व आग्रा किल्ला) अलाहाबाद (त्रिवेणी संगम), वाराणसी, मथुरा,
वृंदावन
*हरयाणा
कुरुक्षेत्र (ज्योतिसार), पानिपत, कर्नाल, यमुनानगर
महेंद्रगड, फरिदाबाद
*बिहार
बोधगया (महाबोधी मंदिर)
नालंदा, वैशाली (महावीरांचे जन्मस्थान), सीतामढी (सीतेचे जन्मस्थान)
*केरळ
कोल्लम, कोचिन, कोझिकोड, अलेप्पी, मुन्नार, कोवलम, पेरियार, कुमारकोम
*मध्य प्रदेश
खजुराहो मंदिरे, बांधवगड नॅशनल पार्क, कान्हा नॅशनल पार्क, ग्वाल्हेर (राजवाडे व किल्ल्यांचे शहर), सांची (बौद्ध स्तूप), उज्जन (महाकालेश्वर मंदिर), ओंकारेश्वर (नर्मदा नदीवरील बेट)
*राजस्थान
जयपूर (गुलाबी रंगाचे शहर- राजमहालांसाठी प्रसिद्ध), उदयपूर (व्हेनिस ऑफ ईस्ट- सरोवरांचे शहर), जोधपूर (मारवाडची जुनी राजधानी व सनसिटी), जैसलमेर (गोल्डन सिटी- किल्ले व राजवाडय़ांसाठी प्रसिद्ध), बिकानेर (किल्ले व विविध प्रकारचे अन्न), पुष्कर (पुष्कर तलाव व पुष्कर मेळा), सवाई माधोपूर (रणथंबोर अभयारण्य व किल्ला), चित्तोडगड (महाराणा प्रताप व मीराबाईचे जन्मस्थान) माऊंट अबू
(हिलस्टेशन- जि. सिरोही)
*तामिळनाडू
चेन्नई (मंदिरे व चर्चेस), मामलापूरम बंदर
कांचीपूरम (मंदिरांचे शहर), पॉण्डिचेरी (अरविंदाश्रम), मदुराई (मीनाक्षी मंदिर)
तंजोर (राजवाडा व ७० मंदिरे), उटी (थंड हवेचे ठिकाण), कन्याकुमारी, (विवेकानंद स्मारक)
*पश्चिम बंगाल
कोलकाता (ट्राम कार- सिटी ऑफ जॉय, भारताची सांस्कृतिक राजधानी), दार्जिलिंग (हिल स्टेशन)
सुंदरबन नॅशनल पार्क, शांतिनिकेतन
*पंजाब
अमृतसर- सुवर्णमंदिर, अकाल तख्त, जालियानवाला बाग, वाघा सीमा चंडिगड- सुकना सरोवर, बटरफ्लाय पार्क, बाहुल्यांचे संग्रहालय
जालंधर- वंडरलॅण्ड थीम पार्क, तुलसी मंदिर, नसीर मशीद, लुधियाना- लोधी किल्ला, प्राणिसंग्रहालये, रणजितसिंग वस्तुसंग्रहालय
पतियाळा- सिटी ऑफ न्यूजपेपर्स, दरबार हॉल, शीशमहल, मोतीबाग राजवाडा
*उत्तराखंड
कॉर्बेट नॅशनल पार्क, हरिद्वार, ऋषिकेश
नैनीताल, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क, चारधाम
*काश्मीर
श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग, चरार ए शरीफ, पहलगाम
‘पर्यटन ही आर्थिक उलाढालींना चालना देणारी लोकाधिष्ठित सामाजिक क्रिया आहे. स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेतले तर हा उद्देश साध्य होऊ शकतो. जर पर्यटनाचे सामाजिक-आर्थिक फायदे सामाजिक स्तरावर पोहोचले नाहीत तर त्याचा काही उपयोग नाही. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेच्या नीतितत्त्वांच्या अनुसार स्थानिक लोकांना आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक लाभ मिळाले पाहिजेत.’    
– तालेब रिफाई (महासचिव), संयुक्त राष्ट्रांची जागतिक पर्यटन संघटना

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?