शहापूर (जि. ठाणे) इथे मामाकडे गेलो होतो. या वेळी माझी किल्ल्यांची आवड पाहून मामाची मुले सागर आणि हरेश म्हणाले, की इथल्या माहुली किल्ल्यावर जाऊयात. मग लगोलग होकार देत आम्ही निघालो.
ऐन वेळेस, अपुऱ्या माहितीवर, अपुऱ्या साधनांनिशी निघालेली आमची ही मोहीम. ना सॅक, ना टोपी, किल्ल्याची ना कुठली माहिती, ना बरोबर कुणी माहितीगार..पण तरुणाईचा जोर अंगात असल्याने आम्ही तसेच केवळ वडापाव आणि पाण्याची बाटली घेत निघालो आणि गडाच्या पायथ्याशी दाखल झालो. इथे पायथ्याशी देखील आम्ही गडाचा रस्ता नीट विचारला नाही आणि थेट डोंगराला भिडलो.
नदीचा काठ, डोंगर-झाडी असा सारा सुखावणारा निसर्ग होता. यामध्ये रमत-गमत आम्ही कधी गड सोडून भलत्याच एका ढोरवाटेला जाऊन मिळालो हे आम्हालाही कळले नाही. मग नकळतपणे हळूहळू वरवर जात राहिलो आणि माहुली आणि आमची दिशा यात अंतर पडत गेले. थोडे अंतर गेल्यावर ही ढोरवाट त्या भोवतीच्या कारवीच्या जंगलात बुजली गेली. पुढे ना वाट ना रस्ता. पण यातूनही शूर शिपाई होत आम्ही आपली वाट शोधणे चालू ठेवले. मग कारवीच्या काडय़ा तोडत, झाडांच्या फांद्या हलवत, खडक-मुरुमावरून घसरत, वाटेतील उभे कातळ वरखाली करत वर जाऊ लागलो.  हे सारे सुरू असतानाच वाटेत एक मोठा साप आडवा गेला. एकतर वाट चुकलेली, त्याचे ‘टेन्शन’ आणि त्यात आता हा साप आडवा गेल्याने आमची सगळ्यांचीच तंतरली. वाट चुकली होती. त्याबद्दल कुणाला बाहेर विचारावे तर ‘मोबाइलला’ही ‘रेंज’मिळेना. सारीच निराशा होऊ लागली. पण याही अवस्थेत आम्ही आमची चढाई सुरू ठेवली. डोंगरमाथ्याला पाहत आम्ही वरवर जाऊ लागलो. वाटतील कारवीतून मार्ग काढत, खडक-मुरुमावरून पडत-धडपडत आम्ही वरवर सरकू लागलो. अंग खरचटले होते. घामाने डबडबले होते. डोक्यावरचे ऊन नको नको करत होते. यातच घशाला पडणारी कोरड तहान तहान करत होती. बरोबरची पाण्याची बाटली रिकामी होऊ लागली. दरम्यान वाटेतील एका अवघड वळणावर माझ्या हातातली बाटली खाली दरीत झाडाझुडपात पडली आणि हरवली. आता बरोबरचे पाणीही हातचे गेल्याने सगळ्यांच्याच डोळय़ांपुढे अंधार झाला. चुकीच्या वाटेवरची ही चढाई सुरू करूनही आता ३ ते ४ तास होऊन गेले होते. माथा तर दूरच पण आम्ही मध्यापर्यंतही पोहोचलो नाही. डोक्यावरचा सूर्य आता मावळतीकडे सरकू लागला. वाट सापडेना, पाणी संपलेले, पोटात भुकेचे काहूर माजलेले या साऱ्यांमुळे आम्ही खूपच निराश झालो होतो. माहुली पाहण्याची खूप इच्छा होती पण बहुधा या वेळी ते शक्य दिसत नव्हते. शेवटी आम्ही साऱ्यांनीच संध्याकाळ होण्यापूर्वी पुन्हा खाली परतण्याचा निर्णय घेतला.
उतरण्यासाठी देखील कुठली अशी वाट नव्हती. पण मग वर चढताना जसा तो डोंगरमाथ्यावर लक्ष ठेवले तसेच उतरताना तळातील नदीवर लक्ष केंद्रित केले. त्या नदीकडे आणि तिच्या त्या चमचमणाऱ्या पाण्याकडे पाहत आम्ही माहुलीचा डोंगर उतरू लागलो. अंग खरचटले होते, कपडे फाटले होते, अशा अवस्थेत आम्ही कसेबसे नदीपर्यंत उतरलो. तिथल्या वाहत्या पाण्यात दिवसभर जिवापाड जपलेले ते वडापाव खाल्ले.
आता खालून पुन्हा तो माहुली किल्ला आणि त्याची ती शिखरे आम्हाला दिसू लागली. त्यांच्या पाहण्यात ‘कसं फसवलं..!’ असाच भाव होता. पण या एका मोहिमेने आम्हालाही पुरते कळले. मित्रांनो, दऱ्या-खोऱ्यात भटकताना त्या भागाची पुरेशी माहिती असावी. बरोबर एखादा चांगला माहितगार असणे आवश्यक आहे. आणि वेळी-अवेळी उपयोगी पडणारे साधन-साहित्य बरोबर असलेच पाहिजेत.  विचार न करता कुठल्याही डोंगरावर स्वार व्हाल, तर अडचणीत यायला वेळ लागणार नाही.
    

mumbai accident, mumbai accident 2 died
मुंबई: हेल्मेटशिवाय दुचाकीवरून तिघांची सफर जीवावर बेतली; दोघांचा मृत्यू, दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक