‘गडद’ म्हणजे खडकात खोदलेली गुहा. सह्य़ाद्रीत ‘गडद’ म्हणलं, की हमखास आठवतो तो ‘गडदचा बहिरी’ किंवा पळू सोनावळ्याच्या लेण्यातील ‘गणपती गडद’. पण आत्ताची आमची ‘गडद’ची भटकंती होती, एका अल्पपरिचित गिरीस्थळाची. हे गडद होतं, राजगुरूनगरच्या पश्चिमेला भामा नदीच्या खोऱ्यात.
भीमा नदीची उपनदी असलेल्या या भामा खोऱ्यात दडलेली भन्नाट शिखरं, घाटवाटा आणि डोंगररांगांना परत परत भेटण्याचा उपक्रम गेले काही महिने सुरु होता. एका डोंगरमित्राला गडदबद्दल त्रोटकसं वाचायला मिळालं आणि अल्पपरिचित अशी ‘दुर्गेश्वर लेणी’ धुंडाळण्यासाठी निघालो. गडदचं दुर्गेश्वर म्हणजे साधं स्थानिक देवस्थान असेल, एखाद्या रविवार सकाळी सहज बघून येऊ असं वाटलेलं. अर्थात हा सपशेल गैरसमज ठरणार होता. गडद गावापाशी पोहोचलो, तेंव्हा हवेत सुखद गारवा होता. गावामागच्या डोंगररांगेची तुळतुळीत कातळभिंत, माथ्यावरची गच्च झाडी आणि आळसावलेल्या पवनचक्कय़ा कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघत होत्या. समोर दीडदोनशे मीटर उंचीची तासूबाई डोंगराची अर्धवर्तुळाकार कातळभिंत होती. पायथ्याशी ‘गडद’ गावची टुमदार घरं आणि तजेलदार शेत शिवारं.. मोठं प्रसन्न दृश्य. दूरवरून बघताना कातळात ‘दुर्गेश्वरचं गडद’ नक्की कुठे असावं, याचा अदमास लागेना.
‘दुर्गेश्वर लेण्यां’ची हीच खरी गंमत आहे. गावातून दुर्गेश्वर डोंगराकडे निघाल्यावर भाताच्या घमघमणाऱ्या शिवारांनी स्वागत केलं. कोणत्याही आधुनिक यंत्रात ‘रेकॉर्ड’ न करता येणारा हा गंध. भैरवनाथाच्या राऊळापासून पाच मिनिटात गडदच्या ‘देवराई’मध्ये पोहोचलो. काहीशे वर्षांपूर्वीचे जुने-जाणते वृक्ष आभाळाला भिडलेले. भामा खोऱ्यातलं हे श्रद्धास्थान. चैत्री अमावस्येला येथे दुर्गेश्वराचा भंडारा (यात्रा)भरतो. पुढे झुडुपातून वळसे घेत एक वाट कातळकडय़ाच्या छोटय़ाशा खळग्यात स्थापलेल्या शिवलिंगापर्यंत जाते. दुर्गेश्वर शिवलिंगाचं दर्शन सहजीच झालं. पण दुर्गेश्वर लेण्याची वाट मात्र ‘लय अवघड हायं’ या धृपदावर सोबतचा गावकरी अडून बसला. अर्थातच, अवघड म्हटलं, की ‘बेधडक’ भेट द्यायलाच पाहिजे नाही का! आणि मग सुरू झाली उभ्या कडय़ातल्या एकदम खडय़ा उंचीच्या, पण आखूड पायऱ्यांची साखळीच.  
सरत्या पावसाचं खटय़ाळ पाणी अजूनही कातळकडय़ावर रेंगाळलेलं, शेवाळलेलं, झिरपत राहिलेलं. हाताच्या आधारासाठी चाचपणी केल्यावर कुठतरी दूरवर एक पुसटशी खोबण सापडते खरी, पण आता पाय टेकवण्यासाठी शेवाळलेल्या निसरडय़ा पावटीवर मात्र विश्वास ठेवणं अवघड. शेवाळलेल्या खोबणी- कोरीव पायऱ्या, आधारासाठी कशावर विश्वास ठेवावा. चुकून नजर निसटली, की गरगरत जाते ती दाट झाडीभरल्या दरीच्या तळाशी. ऊर धपापलेलं, घशाला कोरड पडलेली, माथ्यावर घामटं जमा झालेलं. अल्पपरिचित लेण्यांच्या मोहिमेतली अनपेक्षित थरार, धम्माल पुरेपूर अनुभवत होतो. खाली खोलवर देवराईचा झाडोरा. तर, पायाखाली ओल्या कातळावरच्या, दृष्टीभय असलेल्या घसरडय़ा पायऱ्यांमुळे थरार आणि थरकाप देखील! मध्येच एक अर्धवट पायरी ‘फुटकी पायरी’ नावाची. अर्धा क्षण पाय तरंगत हवेतच. एकापाठोपाठ एक अशा कातळकोरीव पायऱ्या काही केल्या संपेनात. शे-दोनशे पार केल्यावर माथ्याकडचा कातळ अंगावरंच आला म्हणायचं! इतक्या पावटय़ा खोदलेल्या, म्हणजे माथ्यावर काहीतरी ‘घबाड’ हाती लागणार, अशी खात्री पटत चाललेली..
माथ्याकडून झेपावणाऱ्या कातळाच्या पदरातल्या सपाटीवर पोहोचलेलो आणि सर्वप्रथम
एक जमिनीलगत कोरलेलं टाकं लागलं. मग थोडं पुढं गेलो आणि ती अर्धवट खोदलेली दालनं एकामागे एक उलगडत गेली. ती अर्धवट, ओबडधोबड लेणी पाहता-पाहताही चढाईचा थकवा निघून गेला. हवेतला गारवा आणि समोर माथ्यावरचा रानवा सुखावू लागला.
संपूर्ण ब्लॉगस्पोटसाठी –  http://www.discoversahyadri.in/2014/10/BhamaGadadDurgeshwarCaves.html