सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर मोठे दुर्गवैभव दडलेले आहे. भटक्यांना या किल्ल्यांच्या वाटा सतत खुणावत असतात. पण या भ्रमंतीतच जर खणखणीत तटबंदी, वास्तूंनी सजलेल्या एखाद्या किल्ल्याची अचानकपणे भेट घडली तर उडायला होते.. असाच काहीसा अनुभव वेताळवाडी दुर्ग पाहिला आणि आला.

नुकताच पावसाळा संपलेला. त्यामुळे स्वच्छ वातावरणात औरंगाबादकडील किल्ले बघण्याच्या हेतूने आमची ‘दोन दिवसात पाच किल्ले’ ही मोहीम ठरली. हेमंत पोखरणकर, ओंकार ओक यांनी काटेकोर नियोजन आखलं. मग चाळिसगांवहून आमची ही मोहीम सुरू झाली. पहिल्याच दिवशी अंतुर, लोंझा किल्ले सर केले. दुसऱ्या दिवशी सुतोंडा, वेताळवाडी आणि वैशागडकडे मोहीम वळवली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात सुतोंडा किल्ला बघून सोयगांवहून वेताळवाडी कडे निघालो. वेताळवाडी गाव जवळ आले तसे डोंगरावरचे तट-बुरुज खुणावू लागले. कुतूहल वाढलं. गाव ओलांडत, गडाला वळसा मारत वळणदार हळद्या घाटाने थेट किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याशी येऊन थांबलो. उतरताच त्या तट-बुरुजांच्या प्रेमात पडलो. त्यांचे ते सौंदर्य पाहताच कॅंमेऱ्याचा किलकिलाट सुरु झाला. दक्षिण बाजूची सलग तटबंदी आणि तिला टप्प्याटप्प्यावर लहान-मोठय़ा बुरुजांचे कोंदण. खूपच लक्षवेधी दृश्य होतं. जसजसं किल्याच्या जवळ जाऊ लागलो तसं हे कातळ-सौंदर्य अधिकच खुलू लागलं. महादरवाज्यात पाऊल पडलं आणि मतीच गुंग झाली. कोरी करकरीत तटबंदी अन् अवाढव्य बुरुजांचा भरभक्कम पहारा. शांतपणे आणि आश्चर्यचकित होत हे सारं पाहात निघालो. कितीतरी वेळ केवळ त्या कॅंमेऱ्याच्या ‘शटर’चाच आवाज.
मुख्य द्वारावरील व्याघ्रशिल्प, पहारेकऱ्यांच्या देवडय़ा, शत्रूवर मारा करण्यासाठी तट-बुरुजात जागोजागी ठेवलेल्या जंग्या, खिडक्याही सारं काही खिळवून ठेवणारं! पुढं दारुकोठाराची इमारतही अचंबित करत आली. यातली तटबंदी तर इतकी सुरेख, भक्कम व कलात्मक, की विसापूरचीच आठवण झाली.
पुढं निघालो तो, एक सुंदर नक्षीकाम असलेली घुमटाकार वास्तू दिसली. गुप्त धनाच्या हव्यासापोटी तिचं बांधकाम कुणी  तोडलं होतं. अंबरखान्याची इमारतही अशीच सुरेख. इथंच तेल साठवण्याचा तो रांजणही दिसला. हे सारं पाहात, स्वत:ला हरवत असताना समोर नमाजगीर नावाची इमारत उभी राहते. अतिशय सुंदर नक्षीकामानं सजवलेली ही वास्तू. आजही तिच्यातलं हे सौंदर्य गतकाळातील तिचं वैभव सांगत होतं.
या इमारतीच्या पुढय़ात गोलाकार बांधीव तलाव आहे. त्यात पाणी नव्हतं. पण त्या कोरडय़ा तलावावरूनही तो राजा, तो स्थापत्यविशारद अन् त्या कारागीरांना दाद द्यावीशी वाटली. ..या बांधकामांकडं केवळ बघतंच राहावं. हे सारं नजरेत साठवत उत्तरेकडे निघावं. इथं डोंगरधारेच्या टोकावर आणखी एक सुरेख कमानदार बारादरी वास्तू आपली वाट पाहात असते. तिच्या कमानीतून खालची वेताळवाडी अन् सृष्टीचा अन्य नजारा पाय खिळवून ठेवतो..सारंच विलक्षण!
बराच वेळ इथंच घुटमळलो. कॅमेऱ्याचा हट्ट पुरवताना कितीतरी वेळ खर्ची पडला. अभेद्य तटबंदी, तिच्यातले ते बुलंद बुरुज, रेखीव प्रवेशद्वारं हे सारं-सारं पाहता-साठवता स्वत:ला हरवून बसलो.
गड उतरता-उतरता दिवस ढळला. संध्याकाळची ती सोनेरी किरणे सर्वत्र पसरली आणि तिच्यात वेताळवाडीचं हे दुर्गस्थापत्यं न्हाहू लागलं..!

किल्ले वेताळवाडी
पायथ्याचं गाव – वेताळवाडी, हळदा
उंची – ६२५ मीटर
मार्ग – चाळीसगांवहून सोयगावमार्गे
वेताळवाडी किंवा औरंगाबादकडून
सिल्लोड-हळदाहून वेताळवाडी
वेळ – संपुर्ण किल्ला बघण्यासाठी साधारण ३ तास हवेत.
चांगला काळ – आक्टोंबर ते जानेवारी हा चांगला काळ.