20मुख्य रस्त्याची वहिवाट सोडत आजूबाजूच्या खेडय़ांमधून फिरू लागलो, की अनेकदा काही स्थळे अचानक धक्का देत समोर उभी ठाकतात. बारामती रस्त्यानजीकच्या लोणी भापकर गावी जेव्हा प्रथम गेलो, त्या वेळी तिथले शिल्पवैभव पाहून असेच झाले.

लोणी भापकर, पुण्याहून ९५ किलोमीटर, तर बारामती रस्त्यावरील मोरगावपासून सातआठ किलोमीटरवर. इथपर्यंत यायचे झाल्यास थेट बस नसल्याने मोरगावला उतरत थोडेसे पाय मोकळे करायचे नाहीतर स्वत:चे वाहन घेऊन थेट लोणी भापकर गाठायचे. गावाच्या नावातच असलेल्या भापकरांच्या उल्लेखावरून मन सुरुवातीलाच मध्ययुगात डोकावते. हे पेशव्यांचे सरदार सोनजी गुरखोजी भापकर यांचे इनाम गाव. गावातील त्यांचा अध्र्या एकरावरचा वाडा आणि गावातील भैरवनाथाचे मंदिर त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात. यातील भैरवनाथ मंदिराच्या नगारखान्यातील मराठेशाहीतील चित्रकला, पोर्तुगीजांचा पराभव करत लुटून आणलेली ती भली मोठी घंटा आणि सरदार भापकरांनी अर्पण केलेली काळ भैरवनाथ आणि जोगेश्वरीची मूर्ती हे सारे पाहण्यासारखे आहे. हे सर्व पाहत असताना कोणीतरी दत्त मंदिराची आठवण करून देते आणि तिथे पोहचल्यावर बसणारा धक्का हा वर उल्लेख केलेल्या श्रेणीतला असतो.
महाराष्ट्रात राष्ट्रकूट, चालुक्य, यादवांनी कोरीव शैलमंदिरांची मोठी निर्मिती केली आहे. अंबरनाथ, सिन्नर, खिद्रापूर, भलेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर ही या कोरीव माळेतीलच रत्ने! या रत्नांमधीलच एक लोणी भापकरमध्ये विसावले आहे. एका मोठय़ा वृक्षाच्या छायेत साकारलेले हे भव्य मंदिर आणि त्याच्यापुढची तेवढीच सुंदर पुष्करणी पाहिली, की सुरुवातीला गोंधळायला होते. आपल्या चेहऱ्यावरचा हाच गोंधळ पाहत एखादा गावकरी मग सहज म्हणून जातो, ‘पांडवांची कला हाय, ह्य़े काम मानसाचं नाय!’ त्यांच्या या वाक्याबरोबरच मग आपण भानावर येत मुख्य मंदिराकडे वळायचे.इतिहास सांगतो, की हे मंदिर आणि पुष्करणी यादवांच्या काळात निर्माण झाली. पण त्या काळी मंदिर थाटले विष्णूचे. पण पुढे काळाच्या ओघात देवांमध्येही बदल झाला आणि विष्णूचे स्थान मिळाले महेशाला. आपल्या इतिहासातील आणि त्यामुळे स्थापत्यातील हे असे बदल खूपच मजेशीर आहेत. ते समजून घेत कुठलीही कलाकृती पाहिली, की मग अनेक कोडी सहज सुटतात. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि नागर शैलीतील विटांचे शिखर अशी या उत्तराभिमुख मंदिराची रचना. यातील सभामंडप पूर्वीच पडल्याने आपण थेट गाभाऱ्यापुढील विस्तीर्ण अंतराळात प्रवेश करतो. पण तत्पूर्वी प्रवेशद्वारावरील रत्न, रूप आणि स्तंभ शाखा आणि त्यातील निसर्ग रूपकांवर नजर टाकायची आणि तळातील द्वारपालांची परवानगी घेत आत शिरायचे. या अंतराळवजा मंडपात आलो, की एखाद्या लेणीत आल्यासारखे वाटते. रेखीव खांब, आडव्या तुळयांवरील कोरीव पट आणि छताला लगडलेली दगडी झुंबरे मनावरील दडपण वाढवतात. थोडय़ाफार किलकिलत्या प्रकाशातही मग ही शिल्पसृष्टी लक्ष वेधू लागते. ..विविध कृष्णलीला; शंख, चक्र, गदा आणि पद्मधारी वैष्णवांचा मेळा; शिवपार्वतीची आराधना; यक्ष, यक्षिणी, अप्सरा या देवगणांची धावपळ! पुन्हा या जोडीला विविध भौमितिक रचना, निसर्ग रूपकांची मांडणी. त्या गूढ अंधारल्या वातावरणात हे सारे मनात साठवून घ्यायचे आणि आतल्या महादेवावर डोके टेकवत बाहेर पुष्करणीवर यायचे. पुष्करणी हा वास्तुप्रकार मला त्याच्या नावाप्रमाणेच वास्तुकलेतील सर्वाधिक अलंकारिक प्रकार वाटतो. चारही बाजूंनी बांधीव असे मोठे आडवे कुंड, उतरण्यासाठी एका बाजूने जिना, आत फिरण्यासाठी एक धक्का ठेवलेला, सभोवतालच्या भिंतीत जागोजागी विविध देवतांसाठी २८ कोरीव कोनाडे किंवा देवकोष्टके आणि मध्यभागी नितळ पाणी! अशी ही सारी सौंदर्यदृष्टी जपणारी, वाढवणारी रचना. म्हणून तर ती पुष्करणी; देवांची देवांसाठी!
पुष्करणीतील या कोनाडय़ांना पुन्हा मंदिराप्रमाणे कोरीव शिखरांची रचना केली आहे. जणू काही ही छोटी-छोटी मंदिरेच. पण यातील एकाही कोष्टकात सध्या मूर्ती दिसत नाही. एखाद्या झाडावरून पक्षी उडावेत तसे या पुष्करणीतील ही शिल्पं नाहीशी झाली..!
हरिश्चंद्रगड, चावंड, रतनगड, जुन्नरजवळ बेल्हे गावी दिसणाऱ्या या अशा पुष्करणीत लोणी भापकरचा कलाविष्कार थोडा वरचा. वरील सर्व कलावैशिष्टय़ांबरोबर इथे या पुष्करणीत अवतरलाय एक देखणा, कोरीव मंडप, तोही विष्णूच्या तिसऱ्या वराह अवतारासाठी. पुष्करणीच्या पश्चिम दिशेला असलेला हा वराहमंडप एका मोठय़ा चौथऱ्यावर उभा आहे. या मंडपाच्या तळाशी हत्तींची एक माळ कोरलेली आहे. जणू या मंडपाचा सारा भारच त्यांनी पेलून धरलेला आहे. त्याच्या वरच्या थरात दशावतार कोरलेले आहेत. याशिवाय काही ठिकाणी पौराणिक प्रसंग, कामशिल्पे, निसर्गपट साकारलेले आहेत. हा एवढा सालंकृत मंडप सध्या मात्र रिकामा आहे आणि त्याचे उत्तर शोधू गेलो तर ते मिळते या पुष्करणीच्या मागे एका मोकळय़ा जागेत, काटय़ाकुटय़ात!
वराह हा दशावतारातील तिसरा अवतार. या वराह अवताराची मूर्ती नृवराह आणि यज्ञवराह रूपात दाखवली जाते. यातील नृवराहाचे धड मानवाचे तर शिर वराहाचे असते. तर यज्ञवराह मूळ वराहाच्या रूपातच दाखवला जातो. लोणी भापकर येथील या मंदिराच्या पाठीमागे मोकळय़ा जागेत येताच यज्ञवराहाचे हे सुंदर शिल्प आपल्या पुढय़ात प्रगटते.
साधारण तीनएक फूट लांब आणि दोनएक फूट उंचीचे हे शिल्प पाहताक्षणीच उडायला होते. अत्यंत नाजूक हातांनी कोरलेले यज्ञवराहाचे हे सालंकृत रूप. या वराहाच्या पायाशी शेष कोरलेला आहे. तर चार पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले आहेत आणि मुख्य म्हणजे पाठीवर छोटय़ा-छोटय़ा तब्बल १४२ विष्णू मूर्तीची झूल चढवलेली आहे.
एवढी ही सुंदर मूर्ती पण रस्त्याकडेला एखादा दगड पडावा त्याप्रमाणे ती काटय़ाकुटय़ात पडलेली आहे. कुठलीही गोष्ट मूळची कितीही सुंदर असली, तरी ती योग्य जागी आणि संगतीत मांडली, की तिचे सौंदर्य अधिक वाढते. पुष्करणीतील मोकळा वराहमंडप आणि उघडय़ावरील यज्ञवराहाच्या मूर्तीचे दु:ख इथेच कुठेतरी आहे. हे केवळ काही फुटांचे अंतर या महाराष्ट्राचीच या अशा वारशाबद्दलची अनास्था, उपेक्षा दाखवत होते.
लोणी भापकरसारख्या अनेक वास्तुरचना खेडोपाडी आपल्याकडे अशाच निराश अवस्थेत पडून आहेत. आपण त्यांना उगाचच आपल्या गौरवशाली इतिहासाचा वारसा वगैरे म्हणायचे. पण त्यांची आजची अवस्था एखाद्या मरणासन्न वृद्धासारखी झालीय. त्यांना लोकसंपर्कात आणू पाहावे तर या भोगवादी पर्यटनाच्या बाजारात त्यांचे अस्तित्वच नाहीसे होण्याचा धोका आहे आणि तसे नाही करावे तर उपेक्षेच्या या वावटळीत त्यांचा इतिहासही विस्मरणात जाण्याची भीती वाटते. शासन, पुरातत्त्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि मुख्य म्हणजे जबाबदार नागरिक या साऱ्यांनीच मिळून या आमच्या थकलेल्या वारशासाठी काहीतरी करण्याची गरज आहे.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…