गोसाई कुंड हा नेपाळमधील लालटांग परिसरातील एक सुंदर ट्रेक. या वाटेवर हिमालयातील साहस तर जीवाला भिडतेच पण या जोडीनेच त्याच्या कुशीतील अद्भुत निसर्गाचेही दर्शन घडते.

नेपाळमधील लांगटांग व हेलंबू परिसरात सहा ते सात वेगवेगळे ट्रेक आहेत. त्यातील डूनचे. गोसाई कुंड, खारजुंग हा ट्रेक एव्हरेस्ट बेस कॅम्प किंवा अन्नपूर्णा बेस कॅम्पपेक्षा वेगळा आहे. वेधक निसर्ग सौंदर्य आणि १५,००० फुटांवर लागणारी नऊ कुंडे ही या ट्रेकची वैशिष्टय़े आहेत. बिल टिलमन या ब्रिटिश गिर्यारोहकाने १९०९ मध्ये पहिल्यांदा हा ट्रेक केला. पण त्यानंतर विदेशी गिर्यारोहक सोडले तर आपल्याकडील गिर्यारोहक फारसे या ट्रेकच्या वाटेला गेले नाहीत. अशा या ट्रेकला जायचे आम्ही ठरवले आणि मग मी आणि माझे मित्र राहुल सोनवणे, जयवंत पाटील, श्रीकांत शिंदे अशी आमची पावले गोसाई कुंडच्या दिशेने निघाली.
या मोहिमेसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा चांगला काळ. आम्ही १७ नोव्हेंबरला मुंबईहून काठमांडूला गेलो. काठमांडू येण्यापूर्वीच विमानातून हिमालयाचे खूप सुंदर दर्शन घडले. काठमांडूला पोहोचताच आम्ही थमेळ गाव गाठले. थमेळला ट्रेकर्सकरिता लागणाऱ्या शूज, जॅकेट, वॉकिँग स्टिक, स्लिपिंग बॅग, बरसाती, हँड ग्लोव्हज इत्यादी वस्तू मिळतात. इथे आम्ही हवी ती खरेदी केली आणि पशुपतिनाथाचे दर्शन घेत ट्रेकचा श्रीगणेशा केला.
आमची सुरुवात झाली ६,४०० फुटांवरून! आमचा पहिला टप्पा होता काठमांडू ते डूनचे. हा प्रवास बसने होणार होता. हा प्रवास जरी ११७ कि लोमीटरचा असला, तरी तो पूर्ण करण्यास सात ते आठ तास लागले. वाटेत नागार्जुन जंगलाचा परिसर दिसला. त्रिशुळी नदीचे दर्शन घडले. या नदीचा उगम तिबेटमध्ये होतो तर ती वाहते नेपाळमधून.
डूनचे येण्याच्या अगोदर ‘लांगटांग नॅशनल पार्क’ लागते आणि याच ठिकाणी पुढच्या ट्रेकसाठी परवाना दिला जाते. यासाठी सार्क देशातील नागरिकांना २,०५० तर इतर देशातील नागरिकांना ३,६५० नेपाळी रुपये आकारण्यात येतात. या परवान्यासाठी एक ‘पासपोर्ट साइज’ फोटो बरोबर ठेवावा. डूनचेवरून दुसऱ्या दिवशी आमचा प्रत्यक्ष ट्रेक सुरू झाला. १०,९२५ फुटांवरून आम्ही चालण्यास सुरुवात केली. त्रिशुळी नदी आमच्यासोबतच वाहत होती. या नदीचा सहवास आणि भोवतालचा निसर्ग पाहत आम्ही दुपारी दोनच्या आसपास देवरालीला मुक्कामाच्या जागी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सींगोम्पा गावापर्यंत चालणे होते. या वाटेत रोडोडेन्ड्रान, ओक आणि कीरच्या झाडाचे जंगल लागले. या संपूर्ण ट्रेकमध्ये भोवतीचा निसर्ग सतत खुणावत असतो. या वाटेवरच पुढे ‘रेड पांडा’साठी प्रसिद्ध असे एक अभयारण्य देखील लागते. दुपारी दोन वाजता आम्ही मुक्कामी पोहोचलो. आमच्या सॅक ठेवत आम्ही गाव बघण्यास निघालो. इथे एक मॉनेस्ट्री आहे. यातील ९९ शिर व १००० हात असणारी अवलोकीतेश्वराची मूर्ती पाहण्यासारखी आहे. या गावाला चंदनबारी असेसुद्धा म्हणतात. त्या दिवशी या गावात २५ ते ३० ट्रेकर होते. पण हे सगळे विदेशी. या संपूर्ण ट्रेकमध्ये महाराष्ट्र तर सोडाच पण भारतातून सुद्धा कोणीही आलेले आम्हाला भेटले नाही.
पुढच्या दिवशी साधारण तीन तास चालल्यानंतर लांगटांग डोंगर दिसायला लागले. आमच्या ट्रेकच्या माथ्याचा हा भाग. पुढे काही वेळातच गणेश हिमल आणि अन्नपूर्णा शिखरही डोकवायला लागले. हिमालयातील या शुभ्रधवल रांगांचे दर्शन घेतच आम्ही लोरोबीन याक गावात पोहोचलो. दिवसभराच्या चालीनंतर सूर्यही मावळला आणि थंडी कुडकुडू लागली. या वेळी त्या गावाचे तापमान होते, उणे ४ सेल्सियस!
नवा दिवस उगवला. आज आम्ही गोसाई कुंडला पोहोचणार होतो. सूर्योदयाची किरणे आम्हाला आणि भोवतीच्या हिमशिखरांना जागवत आली. पहिला टप्पा १ किलोमीटर उभ्या चढाईचा होता. हा चढ संपला आणि एकदम जोराचा वारा सतावू लागला. तो नेहमीपेक्षा खूपच जोरात वाहत होता. त्याला तोंड देत पुढे आलो. काही वेळाने एक धबधबा दिसला. तो त्रिशुळी नदीच्या पात्रावरच तयार झाला होता. या धबधब्याचे पाणी जिथे पडते तिथे त्याने एक कुंड तयार झाले आहे. यास ‘सरस्वती कुंड’ असे म्हणतात. अजून एक ते दीड तासांच्या चालीनंतर आम्हाला दुरून गोसाई कुंडचे दर्शन झाले. त्याला लागूनच आणखी एक कुंड होते. त्याला भैरव किंवा नामकुंड म्हणतात. ही सारी नऊ कुंडे. इथे एकेक करत भेटू लागली. गोसाई कुंड आणि भैरव कुंडाच्या मध्ये एक टेकडी आहे. त्या टेकडीवरच भटके आपला मुक्काम टाकतात. आम्हीही आमची पथारी लावली. तिथे सामान टाकून आम्ही गोसाई कुंड पाहण्यास निघालो. कुंडाचे पाणी अतिशय नितळ आणि स्वच्छ होते. या कुंडाला प्रदक्षिणासुद्धा घालता येते. यासाठी चांगली पायवाट आहे. या प्रदक्षिणेत हिमालयातील निसर्गाचे खूपच सुंदर दर्शन घडते. दुपारी तीन ते साडेतीनची वेळ असूनसुद्धा अतिशय थंडगार वारा वाहत होता. ज्यामुळे थंडी वाजत होती. या कुंडासमोरच शंकराचे मंदिर आहे. त्याचे दर्शन घेतले आणि आम्ही मुक्कामावर पोहोचलो.
आठवा दिवस! आज आमच्या चढाईचा शेवटचा दिवस होता. गोसाई कुंडाला वळसा घालत आम्ही निघालो. पुढे काही वेळात आम्हाला आणखी एक कुंड लागले. त्याला सूर्य कुंड म्हणतात. साधारण १५,००० फुटांवर असलेले हे कुंड जवळजवळ निम्मे गोठून गेले होते. थोडय़ा वेळात अजून दोन कुंडे लागली. ती तर पूर्णपणे गोठून गेलेली होती. सकाळची पडणारी सूर्यकिरणे त्यावर चमकत होती. पाहता-पाहता या अतिउंचीवरील नऊ कुंडांचे आम्हाला दर्शन घडले. या शेवटच्या कुंडाच्या थोडेसे पुढे गेलो आणि आमच्या ट्रेकचा शेवटचा थांबा आला. या जागेला लोरोबीना पास म्हणतात. ही या ट्रेकमधील सर्वात उंच जागा होती. ज्याची उंची होती, १५,१२५ फूट! या उंचीवर आम्ही चौघे मित्र होतो. प्रसिद्ध अन्नपूर्णा शिखरापासून ते अनेक हिमपर्वत इथून आम्हाला भुरळ पाडत होते. हिमपर्वतांच्या एकामागे एक अशा अनंत रांगा होत्या. साऱ्या बर्फाच्छादित. पुन्हा या साऱ्यांवर ढगांचे लोट पसरलेले होते. थोडय़ाच वेळात पूर्वेची नभा लालगुलाबी होऊ लागली आणि त्याच्या रंगछटा या पर्वतांवरही उमटू लागल्या.