साहसाच्या जगात गिर्यारोहण, गिरिभ्रमण, सायकलिंग, नौकानयन, पॅराजंपिंग या अशा खेळांबरोबरच उमद्या अश्वांच्या सोबतीने सुरू असलेला एक क्रीडाप्रकार म्हणजे अश्वारोहण! जातीचे घोडे आणि हाडाचे प्रशिक्षक या आधारे हा साहसी छंद जोपासता येतो. पण या दोन घटकांच्या पातळीवर अनेक ठिकाणी मर्यादा येत असल्याने या छंदाची पाळेमुळे आपल्याकडे फारशी रुजली-वाढली नाहीत. पण या साऱ्या आव्हानांवर मात करत घोडेस्वारीच्या प्रशिक्षणापासून ते डोंगरदऱ्यातील मोठय़ा मोहिमांपर्यंतची मजल पुण्याच्या ‘दिग्विजय प्रतिष्ठान’ने मारली आहे.
शिवकाळाचा शोध घेणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) वाय. डी. सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली बारा वर्षांपूर्वी या साहसयात्रेला सुरुवात झाली. सुरुवातीला पुण्यात एका शिबिर स्थळावर एखाद-दुसऱ्या घोडय़ाच्या आधारे शास्त्रोक्त प्रशिक्षण, मग त्यांच्यातील विविध स्पर्धा; पुढे या प्रशिक्षित घोडेस्वारांच्या साहाय्याने विविध गडकोटांवरील मोहिमा याद्वारे संस्थेने अश्वारोहणाची ही वाट रूंद आणि वैविध्याने परिपूर्ण केली आहे.
संस्थेतर्फे पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीत अश्वारोहण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचप्रमाणे पुण्याजवळील राणी लक्ष्मीबाई मुलींची सनिकी शाळा, गाईड इंग्लिश मीडियम स्कूल आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना अश्वारोहणाचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर आदी ठिकाणच्या शाळांना अश्वारोहणासाठी संस्थेचे सातत्याने सहकार्यही सुरू असते. या शास्त्रोक्त प्रशिक्षणातून तयार झालेल्या घोडेस्वारांच्या स्पर्धा घेतल्या जातात, मग पुढे यातील निवडक घोडेस्वारांच्या विविध गडकोटांवर मोहिमा काढण्यात येतात.
संस्थेतर्फे २७ व २८ डिसेंबर रोजी पुण्यात आंबेगाव येथील शिवसृष्टीत पाचवी राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धा आयोजित केली आहे. शिवामृत दूध संघ, डी.ई.ए. आणि महर्षी जिमखाना स्पोर्टस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत शो-जंिपग, ड्रसाज, टेंटपेिगग आणि जिमखाना इव्हेंटस आदी घोडेस्वारीचे प्रकार सादर केले जाणार आहेत. या सर्वामध्ये नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, अकलूज, नगर, मुंबई, पुणे इ. ठिकाणचे संघ सहभागी होणार आहेत. नवोदित खेळाडूंना या क्रीडा प्रकारांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. अधिक माहितीसाठी गुणेश पुरंदरे ( ९८२२६२१०१६) यांच्याशी संपर्क साधावा.