10सोलापूर म्हटले, की पर्यटन, भटकंती असे शब्द तसे दूरचेच वाटतात. पण या सोलापूर शहरातच सिद्धेश्वर मंदिर आणि तिथला भुईकोट ही दोन स्थळे अवश्य पाहण्यासारखी आहेत. यातील सोलापूरचा भुईकोट म्हणजे तर दुर्गबांधणीतले एक बुलंद असे रूप. इतिहास आणि दुर्गस्थापत्याने भरलेले!

सोलापूरला जाऊन सिद्धेश्वर मंदिर आणि तिथला भुईकोट ही दोन स्थळे अवश्य पाहायची. यातला सोलापूरचा भुईकोट म्हणजे तर दुर्गबांधणीतले एक बुलंद असे रूप आहे. विजापूर, बेळगाव, मिरज, बिदर, नळदुर्ग, औसा, परंडा या दुर्गशंृखलेतील हा एक जणू भक्कम बुरूजच आहे.
शहरात शिरल्याबरोबर मधोमध वसलेला हा गड आपले लक्ष वेधून घेतो. दुहेरी तटबंदी, त्याभोवती खंदक आणि खंदकानंतर पुन्हा तट, अशी चिलखती रचना असलेला हा एक भक्कम कोट! अशा या गडात शिरण्यासाठी उत्तरेकडून मूळ मार्ग होता. मात्र आज तो बंद केल्याने पश्चिमेकडील नव्या मार्गानेच गडात दाखल व्हावे लागते. पहिला तट, मग खंदक आणि त्यानंतर ती दुहेरी तटबंदी ओलांडतच आत शिरायचे. आत शिरताना भुईकोटाच्या या अजस्र रूपाचेच मनावर दडपण येत असते. ते मुस्लीम दुर्गस्थापत्यातील भरभक्कम बुरूज, त्याच्यावरचे ते आक्रमक सज्जे, मारगिरीच्या जागा हे सारे इतिहासकाळाचे दडपण वाढवते. आत गेल्या गेल्याच समोरच ब्रिटिशांच्या दोन प्रचंड आकारांच्या तोफा आपले स्वागत करतात. या तोफा पाहातच ही बुलंद वास्तू पाहण्यास सुरुवात करायची.
कोकणातून महाड मार्गे दक्षिणेत विजापूर, बिदरच्या दिशेने येणाऱ्या राजमार्गावर सोलापूर हा इतिहासकाळापासून एक महत्त्वाचा थांबा आहे. त्याच्या या महत्त्वामुळेच साधारणपणे चौदाव्या शतकात बहमनी राजवटीत सोलापुरात ही बुलंद वास्तू आकारास आली. पुढे त्यात आदिलशाही, निजामशाहीपासून ते थेट मराठय़ांपर्यंत अनेक राजवटींनी आपापल्या गरजा-सोयीनुसार बदल केले. आदिलशाही आणि निजामशाहीच्या तर अगदी सरहद्दीवर हा भुईकोट! यामुळेच या शाही फौजांमध्ये या गडावरूनच अनेकदा लढाया झाल्या. शेवटी लढाईचे मैदान ठरणारा हा किल्लाच पुढे या दोन शाही राजवटींच्या मनोमिलनाचे स्थळही ठरला! साठ वर्षांचा संघर्ष थांबवत इसवी सन १५२३मध्ये याच किल्ल्यात निजामशाह आणि आदिलशाहमध्ये मैत्रीचा तह झाला. या तहात आदिलशाहने आपली मुलगी मरिअमचा विवाह बुऱ्हाण निजामशाहशी लावला. पुढे १५५२मध्ये पुन्हा निजामशाहची कन्या चांदबिवी हिचा विवाह अली आदिलशाहबरोबर, तर आदिलशाहची कन्या हादिया सुलताना हिचा विवाह मूर्तझा निजामशाहबरोबर याच किल्ल्यात झाला. या शाही विवाहांनी तेव्हा हा किल्ला गाजला होता. पुढे दक्षिण मोहिमेवर आलेल्या औरंगजेबानेही हा किल्ला घेत काही काळ इथे मुक्काम ठोकला होता. यानंतर यथावकाश मराठय़ांचेही या किल्ल्यावर वर्चस्व प्रस्थापित झाले आणि शेवटी याच किल्ल्याने १४ जून १८१८ रोजी मराठेशाहीचा शेवटही पाहिला! गतकाळातील हा सारा घटना-घडामोडींचा इतिहास लक्षात घेतला, की हे तटबुरूजही आपल्याला सहाशे वर्षे मागे घेऊन जातात आणि मग या चिऱ्यांनाही एक अर्थ प्राप्त होतो.
या गडदर्शनासाठी आतील बाजूने चालत अगदी प्रथम उत्तरेकडील दरवाजात हजर व्हावे. आज हा मार्ग जरी बंद झालेला असला तरी दुर्गदर्शनासाठी इथूनच सुरुवात करावी. या दरवाजाच्या पुढय़ात असलेल्या खंदकावर आता काही वर्षांपर्यंत एक लाकडी काढघालीचा पूल होता. या पुलावरून या पहिल्या दरवाजात पूर्वी यावे लागे. या दरवाजातूनच आत शिरताना एक मोठा साखळदंड आणि दोन मीटर व्यासाची मोठी गोल कडी दिसते. या पहिल्या दरवाजाच्या अंगावर जागोजागी पोलादी खिळे ठोकलेले असल्याने या दरवाजाला ‘खिळा दरवाजा’ असे म्हणतात. काही वर्षांपर्यंत याच दरवाजातून गडात प्रवेश व्हायचा, पण आता हा दरवाजा बंद केलेला आहे. गोमुखी रचना, भोवताली आक्रमक बुरूज आणि आत शिरण्यासाठी मोठय़ा दरवाजाला दिंडी ठेवलेली! असा हा दरवाजा इसवी सन १८१० मध्ये दुरुस्त केल्याचा उल्लेख असलेला एक पितळी लेख या दरवाजावर होता अशी नोंद आहे. पण सध्या तो दिसत नाही. या दरवाजाच्या बाहेरील बाजूस नागबावडी नावाची एक भलीमोठी बारव आहे.
या दरवाजातून आत आलो, की एकापाठी एक दोन दरवाजे लागतात. त्यांची बांधणी- शैली बऱ्यापैकी सारखी आहे. पैकी मधल्याचे नाव ‘शहर’ किंवा ‘मधला दरवाजा’ तर त्यानंतरच्या महाकाली देवालयाजवळचा महाकाली दरवाजा! या दोन्ही दरवाजांवर मनोऱ्यांचे तोरण आहे. तटबंदीवरच्या पाकळय़ांच्या कमानी, बुरुजांवर बाहेर आलेले सज्जे आणि दरवाजावरचे हे मनोरे हे सारे मुस्लीम स्थापत्याचे खास वैशिष्टय़! या दोन्ही दरवाजांवर शरभांची शिल्पे बसवलेली आहेत. वाघ आणि घोडा किंवा बैल यांचे मिश्रण असलेला हा काल्पनिक पशू! या शरभाच्या जोडीच्या मधोमध दोन्ही दरवाजांवर फारसी लिपीतील शिलालेखही आहेत. या शिलालेखांनुसार हे दरवाजे अली आदिलशाह दुसरा याने बांधले आहेत. तिसऱ्या दरवाजातून आत जाताच देवडीवर आणखी एक फारसी शिलालेख दिसतो. गडावर असे एकूण दहा शिलालेख असून त्यापैकी सहा फारसी, तीन देवनागरी, तर एक मोडी लिपीत आहे. तीन दरवाजांच्या या मालिकेदरम्यान चौकीच्या देवडय़ा, दारूगोळय़ांची कोठारे आहेत. शिबंदीची घरे, विहिरी-आडही जागोजागी दिसतात. दुसऱ्या दरवाजाशेजारील बुरुजावरच ढालकाठीची रचना आहे.
तिसऱ्या दरवाजानंतर आपण पुन्हा गडात येतो. आतमध्ये भलेमोठे पटांगण आहे. या जागेवर कधीकाळी तीनशेहून अधिक इमारती असल्याची नोंद आहे. पण सध्या यापैकी मल्लिकार्जुन मंदिर, बत्तीस खांबांची एक प्राचीन इमारत आणि काही धान्य व दारूगोळय़ाची कोठारे एवढय़ाच वास्तू दिसतात. यापैकी आपले लक्ष स्थिरावते ते डाव्या हाताच्या मल्लिकार्जुन मंदिरावर! नक्षत्राकृती भूमीज पद्धतीचे हे मंदिर आज उद्ध्वस्त रूपातच समोर येते. पण त्याच्या उपलब्ध अवशेषांवरून मंदिराची एकेकाळची भव्यता आणि कोरीव श्रीमंती स्पष्ट होते. आज शिल्लक असलेल्या तळाच्या अवशेषांवर व्याल व अन्य प्राण्यांचे थर, विविध भौमितिक रचना आणि काही मैथुन शिल्पे दिसतात. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर बाराव्या शतकात येथील योगी सिद्धरामेश्वरांनी बांधल्याचे सांगितले जाते.
या मंदिराशेजारीच बत्तीस खांबांची एक ऐतिहासिक इमारत आहे. या स्तंभांवरील कोरीव काम, त्यावरील विषय, शैली पाहता हे खांब मूळ मल्लिकार्जुन मंदिराचेच असल्याचे वाटते. या इमारतीचा तत्कालीन उपयोग लक्षात येत नाही. पण पुढे धान्याचे कोठार आणि ब्रिटिशांच्या काळात दारूचे कोठार म्हणून उपयोग झाल्याची नोंद आहे.
गडातील या दोन महत्त्वाच्या वास्तू पाहात पूर्व तटावर आलो, की गडाला या बाजूने वेढा घातलेला सिद्धेश्वर तलाव त्याचे अथांग रूप घेऊन आपल्यापुढे प्रगटतो. एवढा वेळ एखादा बुलंद भुईकोट वाटणारा हा किल्ला या दर्शनानंतर एकदम जलदुर्गच वाटू लागतो. तलावाच्या या पाण्यातच उभी राहिलेली या बाजूची तटबंदी, भोवतीचे पाणी, त्यातली छोटी बेटे, सिद्धरामेश्वराचे मंदिर, नारळाची झाडे हा सारा देखावा मनाला भावतो. सोलापुरात असतानाही कुठेतरी कोकणात असल्यासारखे वाटते. हा देखावा पाहातच तटावरून गडप्रदक्षिणा सुरू होते. वाटेत बाळंतिणीची विहीर लागते. पुढे एक सज्जा असलेली खोली आणि त्याच्या पुढय़ातील तलाव दिसतो. वाटेत दुहेरी तटबंदीतील मोठमोठे बुरूज धडकी भरवत असतात. यापैकी काहींची हनुमान, निशाण, महाकाली, दर्गोपाटील अशी नावेही समजतात. या तटावर जागोजागी हिंदू शिल्पेही दिसतात. ही शिल्पेदेखील मूळची मल्लिकार्जुन मंदिराची वाटतात. दोन-तीन तासांत हा कोट पाहून होतो आणि आपण पुन्हा त्या तोफांच्या सलामीसाठी हजर होतो.
गडाचे हे भलेमोठे आवार आता काही वर्षांपर्यंत एक खिंडार होते. पण येथील महापालिकेने यात लक्ष घातले आणि हा सारा परिसर साफसूफ होऊन तेथे आता एक उत्तम उद्यान फुलवलेले आहे. सुपारीची उंच गेलेली झाडे, अन्य वृक्ष-वेली, फुलझाडे आणि गवताचे पट्टे, नाचणारी कारंजी, फिरण्यासाठी बांधीव पायवाटा, बसण्यासाठी ओटे, दिवाबत्तीची सोय असे हे सारेच दृश्य धक्के देत असते. महाराष्ट्रात अनेक गावा-शहरांच्या सान्निध्यात असे भुईकोट, गढय़ा किंवा अन्य ऐतिहासिक वास्तू आहेत. परंतु इतिहासाबद्दलची अनास्था आणि राजकीय उदासीनतेमुळे गावोगावचे हे वैभव आता दगड-मातीची खिंडारे आणि घाण-कचऱ्याचे उकिरडे बनलेले आहेत. या साऱ्या पाश्र्वभूमीवर सोलापूरच्या या बुलंद भुईकोटाचे हे दृश्य मनात नवा आशावाद निर्माण करणारे वाटले.

kolhapur ambabai temple marathi news, ambabai temple devotees kolhapur marathi news,
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरासमोर खरमाती, मलब्याचे ढीग; भाविकांची कसरत
Demand march regarding road in Kolhapur
चांगले रस्ते वा हाडांचे दवाखाने द्या; कोल्हापुरात अनोख्या मागणीचा मोर्चा
Tusker elephant nuisance increased in Chandgarh taluka
कोल्हापूर : चंदगड तालुक्यात टस्कर हत्तीचा उपद्रव वाढला
Livestock fodder shortage crisis in Akola district
पशुधनावर चारा टंचाईचे संकट, पशुपालक चिंतेत; चाऱ्याची जिल्ह्याबाहेरील वाहतुकीवर बंदी

अभिजित बेल्हेकर
abhijit.belhekar@expressindia.com