अहमदनगर जिल्ह्य़ाच्या पश्चिमेला अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या रांगा उग्र होत अवकाशात घुसतात. या डोंगररांगांमधूनच एक आगळी वेगळी नाळ या ऐन घाटमाथ्याला पोखरत कोकणात उतरते, तिचे नाव – सांधण!

भंडारदरा धरणालगत सांम्रद गावापासून या सांदणला जाण्यासाठी रस्ता. मुंबईहून भंडारदरामार्गे हे अंतर भरते १६० किलोमीटर. आम्ही नुकताच या सांधणच्या घळीतून उतरणारा ट्रेक केला आणि एक अविस्मरणीय अनुभव गाठीशी जोडला.
या मोहिमेला सुरुवात करण्यासाठी आम्ही पहाटेच सांम्रद गावी पोहोचलो. थोडासा आराम करत आम्ही घळीकडे निघालो. या गावाला खेटूनच ऐन घाटमाथ्याला पोखरत ही घळ निघते. झाडीत झाकलेली. या झाडीतून वाट काढत प्रत्यक्ष घळीत पाऊल टाकले आणि प्रत्येकाच्या तोंडून केवळ ‘अप्रतिम’ असाच शब्द बाहेर पडला. दोन्ही बाजूंना उंच-उंच कातळकडे आणि त्यामधून त्या उभ्या धारेला पोखरत कोकणाच्या दिशेने खाली उतरत जाणारी ही घळ. एका वेगळय़ाच जगात शिरतोय याचा आम्हाला भास होत होता.
दोन्ही अंगांचे ते कातळ अंगावर येत होते. गिर्यारोहकांना आव्हान देत होते. नाळेच्या मधोमध दगडांची मोठी रास पडलेली होती. त्यामधून मार्ग काढत आम्ही खाली उतरू लागलो. त्या मोठ-मोठय़ा शिळांवरून खाली उतरताना, त्या घळीतून पुढे सरकताना एका गूढ जगात शिरत असल्यासारखे वाटत होते. मध्येच काही ठिकाणी ही घळ काही उंचीचे कातळटप्पे घेऊन खाली उडी मारत होती. मग अशा कसोटीच्या क्षणी गिर्यारोहणाचे सारे कसब पणास लावत खाली उतरावे लागत होते. या घळीतून पावसाळय़ात धो-धो पाणी वाहते. या ओहोळाचे पाणी अद्यापही थोडय़ाफार प्रमाणात इथे घळीत वाहत होते. या पाण्यामुळे नाळेत काही ठिकाणी पाण्याचे डोह तयार झालेले होते. घळ उतरताना हे असे वाटेत येणारे डोह ओलांडणे एक दिव्य होते. या डोहातील अंग गोठवणारे पाणी अंगावर काटा उभा करत होते. अनेक ठिकाणी या डोहांभोवतीचा भाग निसरडा झालेला असल्याने तो ओलांडताना जास्त काळजी घ्यावी लागत होती. एका ठिकाणी तर आम्हाला चक्क आमचे सगळे कपडे काढून, सॅक डोक्यावर घेत त्या डोहातून पुढे सरकावे लागले. हे डोह ओलांडताना सांधणची ही घळ केवळ गूढच नाहीतर आव्हानात्मक वाटू लागली.
दीड-दोन किलोमीटर लांबीच्या या घळीतले हे भ्रमण थक्क करणारे होते. सह्याद्रीचे वेगळे दर्शन घडवणारे होते. नगर जिल्ह्य़ात सुरू होणारी ही घळ घाटमाथा पोखरत ठाणे जिल्ह्य़ातील शहापूरला उतरते. अगदी शेवटी जिथे ही नाळ कडा उतरत बाहेर पडते. तिथे एक ६० ते ७० फूट उंचीचा कडा तयार झालेला आहे. पावसाळय़ात नाळेतून आलेले पाणी या कडय़ावरून धबधब्यातून बाहेर पडते. आम्हाला आता या कोरडय़ा कडय़ावरून खाली उतरायचे होते. आम्ही दोरी बांधून सावधपणे एकेक करत खाली उतरलो. हा कडा उतरून तळाशी पोहोचेपर्यंत दुपारचे ३ वाजले होते. सांधणची ही नाळ उतरायला सुरू करून तब्बल नऊ तास उलटून गेले होते. आमचा मुक्काम इथेच सांधणच्या तळाशी होता. मुक्कामासाठी एक जागा मिळाली, तंबू लावला आणि निवांत होत सहज पाठीमागे पाहिले तर सांधणची ती नाळ आमच्याकडे कौतुकाने पाहात होती.

Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
Yavatmal lashed by stormy rain early morning Water in low lying areas
यवतमाळला भल्यापहाटे वादळी पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

आशुतोष जांभेकर
ashutosh.jambhekar@gmail.com