सिंहगडावर नुकताच पाचव्या दुर्ग साहित्यसंमेलनाचा सोहळा रंगला. या संमेलनामध्ये दुर्ग साहित्यापासून ते दुर्गसाधनांपर्यंत आणि दुर्ग संवर्धनापासून ते त्याच्या पर्यटन विकासापर्यंत अशी मोठी चर्चा झडली. परिसंवाद, व्याख्याने आणि मुलाखती रंगल्या, प्रदर्शने मांडली गेली, स्पर्धा पार पडल्या, माहितीपट- सांस्कृतिक कार्यक्रम साकार झाले आणि या साऱ्यांतून जणू दुर्ग जागरणाचा मंत्रच मिळाला.
सिंहगड! हा शब्द जरी उच्चारला तरी त्याचे ते ऐतिहासिक वास्तुवैभव, नरवीर तानाजी मालुसरेंचे रणकंदन, नावजी बलकवडेंचा पराक्रम, लोकमान्य टिळकांचे वास्तव्य; डोंगर-दऱ्यांचा मावळ, हिरव्यागर्द झाडीचा आधार, शांत-निवांत सकाळ-संध्याकाळ आणि भन्नाट वारा असे बरेच काही डोळय़ांसमोर येते. इथे मिळणारी झुणका-भाकर, कांदाभजी, मडक्यातील दही या गोष्टीही खुणावू लागतात. दुर्गप्रेमींचे हे हक्काचे मुक्काम स्थळ, निसर्गप्रेमींची हळवी जागा, पर्यटकांची आवडती वाट आणि गिर्यारोहकांसाठी अवघड थाट.. अशा या सिंहगडावर २०, २१, २२ फेब्रुवारी रोजी नुकताच पाचव्या दुर्गसाहित्य संमेलनाचा सोहळा रंगला आणि महाराष्ट्रभरातील साऱ्याच गडकोटांमध्ये चैतन्य संचारले. दुर्ग साहित्यापासून ते दुर्गसाधनांपर्यंत आणि दुर्ग संवर्धनापासून ते त्याच्या पर्यटन विकासापर्यंत अशी मोठी चर्चा इथे झडली. परिसंवाद, व्याख्याने आणि मुलाखती रंगल्या, प्रदर्शने मांडली गेली, स्पर्धा पार पडल्या, माहितीपट-सांस्कृतिक कार्यक्रम साकार झाले आणि या साऱ्यांतून जणू दुर्ग जागरणाचा मंत्रच मिळाला.
महाराष्ट्र हा किल्ल्यांचा प्रदेश! या भूमीएवढे संख्येने आणि विविधतेने नटलेले दुर्ग अन्यत्र कुठेही नाहीत. इतिहास, भूगोल, पर्यटन, स्थापत्य, कला, संस्कृती, साहित्य, विज्ञान, पर्यावरण, संरक्षण, स्थानिक समाज आणि चालीरीती अशा विविध अंगांनी हे किल्ले गेली अनेक शतके आमच्या जीवनाशी जोडले गेलेले आहेत. यामुळे महाराष्ट्र धर्म, संस्कृती आणि त्याची जडणघडण यांचा ज्या ज्या वेळी विचार होतो, त्या त्या वेळी या गडकोटांची वाट चढावी लागते.
महाराष्ट्र संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या गडकोटांचे समाजाशी असलेले हे ऋणानुबंध अधिक घट्ट, निकोप आणि मुख्य म्हणजे अभ्यासू, विधायक करण्याच्या हेतूनेच ‘गोनीदा दुर्गप्रेमी मंडळा’ची स्थापना झाली आहे. यासाठी मंडळाच्या वतीने दरवर्षी एखाद्या किल्ल्याच्या सान्निध्यात दुर्गसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. दोन दिवस कुठल्यातरी दुर्गाच्या परिसरात महाराष्ट्रभरातील दुर्गप्रेमींना एकत्र करत, दुर्गाच्या नानाविध विषयांवर चर्चा करत हे संमेलन रंगते. तज्ज्ञ-अभ्यासकांची व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्र, स्लाईड शो, माहितीपट, साहित्य अभिवाचन, प्रकाशन, प्रश्नमंजूषा, खुली चर्चा आणि प्रत्यक्ष दुर्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांमधून हा सोहळा रंगत जातो.
यातील पहिले साहित्य संमेलन २००९ साली राजमाची किल्ल्यावर, दुसरे २०१२ साली कर्नाळा किल्ल्यावर, तिसरे २०१३ विजयदुर्गवर, चौथे २०१४ साली सज्जनगडावर तर पाचवे नुकतेच सिंहगडावर पार पडले. यासाठी २० फेब्रुवारीच्या पूर्वसंध्येपासूनच महाराष्ट्रभरातील दुर्गप्रेमी संमेलनस्थळी सिंहगड पायथ्याशी ‘गप्पांगण’ येथे येऊ लागले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यंत दुर्गप्रेमींचा हा मेळा शेकडय़ात गेला. संमेलन स्थळ स्वागत कमानी, तोरणे आणि रांगोळय़ांनी सजले होते. इतिहासाच्या त्या तट-बुरुजांवर भगवे ध्वज फडफडू लागले होते. या उत्साहातच पारंपरिक वाद्यांचा निनाद झाला आणि ग्रंथदिंडीने संमेलनास सुरुवात झाली. दुर्गावरील आद्य साहित्याची ही दिंडी दुर्गाचाच जयघोष करत संमेलनस्थळी पोहोचली. उद्घाटन सोहळय़ात निमंत्रक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, उद्घाटक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, स्वागताध्यक्ष जयप्रकाश सुराणा, मावळते अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर आणि नूतन अध्यक्ष ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्र तज्ज्ञ आणि पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक डॉ. अरविंद जामखेडकर यांची दुर्गचिंतन आणि विचारांनी भारलेली भाषणे झाली. उद्घाटनाच्या या सोहळय़ानंतर मग दुर्गविषयक जगातील इतिहास, पुरातत्त्व, स्थापत्य, निसर्ग-पर्यावरण, कला, साहित्य, विज्ञान, साहस आणि संरक्षण अशा अनेक विषयांची दारे एकेक करत उघडू लागली.
निसर्गाचे पहिले बोट पकडत डॉ. हेमंत घाटे, डॉ. सतीश पांडे, श्रीकांत इंगळहळीकर आणि डॉ. आनंद पाध्ये यांनी आमच्या दुर्गाभोवतीचे पशू, पक्षी, वनस्पती आणि अन्य निसर्गवैभव प्रगट केले. शीतल मालुसरे, पांडुरंग बलकवडे आणि मुक्ता टिळक यांनी अनुक्रमे नरवीर तानाजी मालुसरे, नावजी बलकवडे आणि लोकमान्य टिळक या विभूतींचे सिंहगडाशी असलेले ऋणानुबंध आठवणींमधून सांगितले. गणेश कोरे, सुनील पाटील आणि अंकुर काळे या युवा दुर्गप्रेमींनी दुर्ग संवर्धनातील त्यांच्या संस्थांची कार्ये मांडली. ज्येष्ठ दुर्गप्रेमी अविनाश पाटील यांनी पन्नास वर्षांपूर्वी केलेल्या ‘दहा दिवस दहा दुर्ग’ या मोहिमेच्या आठवणी सांगितल्या. वरील तीनही सत्रांमध्ये या दुर्गप्रेमींना अनुक्रमे रवींद्र अभ्यंकर, डॉ. प्रतिमा विश्वास आणि आनंद देशपांडे यांनी बोलते केले.
या बरोबरच मग सदाशिव टेटविलकर (वीरगळ), महेश तेंडुलकर (दुर्गद्वारशिल्प) आणि ब्रिगेडिअर हेमंत महाजन (शिवकालीन दुर्गाची संरक्षण व्यवस्था) यांची स्वतंत्र व्याख्याने नवनव्या विषयांची दालने उघडत गेली. या तीन दिवसांत दुर्गविषयक विविध सांस्कृतिक कार्यक्रमही रंगले. मावळातील तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी साकारलेल्या गोनीदांच्या ‘पवनाकाठचा धोंडी’ या कादंबरीचे अभिवाचन डॉ. विजय देव, डॉ. वीणा देव आणि रुचिर कुलकर्णी यांनी केले. पुण्याच्या इतिहासप्रेमी मंडळाने कथा, कविता, उतारे, लोकगीतांमधून सिंहगड साकार केला. राष्ट्रीय कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी दुर्गविषयक रांगोळय़ा काढल्या. संमेलनाच्या निमित्ताने गिरिप्रेमी संस्थेने गिर्यारोहणविषयक साधनांचे प्रदर्शन थाटले होते. याच्या जोडीनेच सह्याद्री आणि हिमालयातील शिखरे आणि गिर्यारोहणाची माहिती दिली जात होती. दुर्गविषयक चित्रकला आणि छायाचित्रकला स्पर्धेचेही या वेळी आयोजन केले होते. या स्पर्धेतील निवडक चित्रे आणि छायाचित्रांची प्रदर्शनेही संमेलनस्थळी भरवण्यात आली होती. पुण्याच्या दिग्विजय अश्वारोहण प्रशिक्षण संस्थेतर्फे या संमेलनाच्या निमित्ताने पुरंदर ते सिंहगड अशी अश्वारोहण मोहीम काढली होती. दुर्गविषयक प्रश्नमंजूषा, सिंहगड दर्शन, माहितीपटांचे सादरीकरण या साऱ्यांतून हे संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सिंहगडावर ‘सिंहगड’ या विषयावरील घेतलेली मुलाखत या सोहळय़ाचा कळसाध्याय ठरली. अभिजित बेल्हेकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये सिंहगडाच्या इतिहासापासून ते भूगोलापर्यंत आणि साहित्यापासून ते विविध वास्तूंपर्यंतच्या अनेक दुर्मिळ आठवणी दुर्गप्रेमींच्या भेटीला आल्या. तीन दिवस चाललेल्या या संमेलनामध्ये महाराष्ट्रभरातील विविध गडांचे वारकरी सामील झाले होते. या दुर्गप्रेमींमध्ये इतिहास अभ्यासक होते, स्थापत्य विशारद होते, निसर्गप्रेमी होते, पर्यावरणाचे तज्ज्ञ होते, छायाचित्रकार होते, दुर्गभटके होते, गिर्यारोहक तर होतेच होते. लेखक, कवी, कलाकार, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार अगदी पोलीस, वन आणि लष्करातील जवान असे असंख्य शिलेदार यामध्ये सामील झाले होते.
तीन दिवस आणि तब्बल पाचशेंहून अधिक दुर्गप्रेमी सिंहगडाच्या या अंगणात राहिले, बागडले. त्यांनी हा गड पाहिला, अनुभवला, त्याचा इतिहास-भूगोल दोन्हीही जागवला. कुणी त्याची छायाचित्रे काढली, कुणी त्याची चित्रे! कुणी कविता केल्या, कुणी पोवाडे रचले. काहींनी या तीन दिवसांत गडाची साफसफाई केली, तर काहींनी त्याच्या ढासळलेल्या घराचे चार दगड पुन्हा रचले. दरवाजांना तोरणे बांधली गेली, देवालयात दिवे लागले. गेली कित्येक वर्षे उपेक्षेच्या खाईत पडलेले आमचे हे धारातीर्थ जणू पुन्हा जिवंत, नांदते झाले. ..आपल्याच वारसांनी वृद्धापकाळी तरी आपली जाणीव ठेवली हे पाहून हा हजार-दीड हजार वर्षांचा पुराणपुरुषही भारावला!
अभिजित बेल्हेकर
abhijit.belhekar@expressindia.com