रविवारी (दि. ८) जागतिक महिलादिन साजरा होत आहे. वेगवेगळी क्षेत्रे काबीज करणाऱ्या महिलांना गिर्यारोहणाचा प्रांतही आता नवा नाही. किंबहुना धाडसाच्या, आव्हान पेलण्याच्या या वाटेवर काही महिलांनी पुरुषांच्याही पुढे एक पाऊल टाकल्याची काही उदाहरणे दिसून येत आहेत. महिलांच्या याच साहसवाटांचा आढावा आजच्या ‘ट्रेक इट’मध्ये..

11
गर्लिडे काल्टेनब्रुनर ही ऑस्ट्रियाची गिर्यारोहक! गेली अनेक वर्षे ती उत्तुंग हिमशिखरांचा वेध घेत आहे. एकटीनं आणि प्राणवायूशिवाय! बरोबर चार वर्षांपूर्वी, म्हणजे २३ ऑगस्ट २०११ रोजी या हिमकन्येनं सातव्या प्रयत्नात ‘के-टू’ हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं शिखर सर केलं आणि जगातली ८ हजार मीटर उंचीवरची चौदाही शिखरे कृत्रिम प्राणवायूशिवाय सर करणारी ती पहिली महिला ठरली. खरंतर तिच्याआधी काही महिन्यापूर्वीच हा पराक्रम, स्पेनच्या एडून्रे पासाबान या तरुणीने केला होता, पण तिच्या चढाई वेळी कृत्रिम प्राणवायूची मदत होती. गर्लिडेनं त्यातही वेगळेपण राखून हा जागतिक विक्रम केला आणि गिर्यारोहणच नाहीतर अवघ्या साहसविश्वात ती चर्चेत आली.
भ्रमण, गिरिभ्रमण, गिर्यारोहण, जगप्रवास, सायकलिंग, वाळवंट पार करणे, ध्रुवीय टोक गाठणे, हवाई झेप घेणे या आणि अशा असंख्य साहसवाटांची जेव्हा जेव्हा चर्चा होते त्या वेळी महिला साहसवीरांची नावे अपवादानेच पुढे येतात. पण आढावा घेऊ लागलो तर या साऱ्या खडतर वाटांवर साहसी महिलांच्या पाऊलखुणाच जास्त ठळकपणे दिसतात. यातीलच हे काही महत्त्वाचे थांबे!
खरंतर कुठल्याही साहसी खेळासाठी शिक्षण-प्रशिक्षणापेक्षा या छंदाची आवड, अंगात ऊर्मी, जद्द, प्रबळ महत्त्वाकांक्षा असावी लागते. यातील स्वभावाचे सर्व पैलू हे बहुतांश महिलांकडे उपजतच असतात. या पैलूंना ज्यांना योग्य, मार्गदर्शन, शिक्षण-प्रशिक्षण आणि सरावाची साथ मिळते तिथे यश चालत येते. महिलांच्या साहसवाटांचा शोध घेऊ लागलो, की अशीच उदाहरणे भेटतात. जीन सॉक्रेटीस हे यातलेच असेच एक नाव! स्वभावातील या वेगळेपणामुळेच ब्रिटनमधली ७० वर्षांची, ३ नातवंडांची आजी असलेली ही सॉक्रेटीस या वयातही एकटीच शिडाच्या होडीने जगप्रदक्षिणा करायला निघाली. तिचा हा तिसरा प्रयत्न होता, हेही विशेषच! पण २५९ दिवसांत २५ हजार मलांचा प्रवास करून तिने ही जगप्रदक्षिणा पूर्ण केली आणि असं करणारी ती जगातली सगळय़ात वयस्कर महिला ठरली.
साहस विचारांनी झपाटून जाणाऱ्या अशा अनेक महिला आहेत. गिर्यारोहण, वाळवंटातले प्रवास, शिडाच्या होडीने केलेले प्रवास, सायकल किंवा दुचाकीवरून केलेले जगप्रवास आपल्याला हेच दाखवून देतात, की जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर महिलांसाठी कोणतेही साहस अवघड राहात नाही. आब्रे लि ब्लोंड, अनी पेकसारख्या महिलांनी पुरुष सहकाऱ्यांसह गिर्यारोहण मोहिमांमध्ये सहभागी होऊन हे साहस क्षेत्र महिलांसाठी खुलं करून दिलं. बरं, या महिला इथं केवळ सहभागी झाल्या नाहीतर त्यांनी वाखाणण्याजोगी कामगिरीही करून दाखवली. फ्यानी बुलक वर्कमनदेखील अशीच! तिनं काराकोरम पर्वतरांगेत तब्बल सहा मोहिमा काढल्या. आपल्या या अनुभवांवर तिनं अनेक पुस्तकंही लिहिली. १९०६ मध्ये वयाच्या ४७व्या वर्षी तिने काश्मीर हिमालयातल्या ‘नुनकून’ शिखर समूहातले २३,३०० फूट उंचीचं ‘पिनाकल’ शिखर सर केलं. वयाच्या ५३व्या वर्षी तिनं ४६ मलांच्या सियाचीन ग्लेशिअर किंवा हिमनदीचा नकाशा तयार करण्यासाठी मोहीम आखली. एक महिला, तिचं वय आणि तिनं काढलेल्या मोहिमा यांची सांगड घालायची म्हटलं तर सारे अचंबित करणारं आहे. एमी जॉन्सन, अमेलिया इयरहार्ट यांनी तर एका इंजिनाच्या छोटय़ा विमानातून मोठमोठे प्रवास करून लोकांचं लक्ष वेधून घेतलं. ‘लंडन ते सिडनी’ इतका मोठा पल्ला यातल्या एमीने एकटीने पार केला, तर अमेलियानं संपूर्ण अटलांटिक महासागर पार केला. नंतर विमानाने जगप्रदक्षिणा करण्याचा ध्यास तिनं घेतला आणि या प्रयत्नातच ती पॅसिफिक महासागरावरून उड्डाण करताना बेपत्ता झाली. पुढे तिचं हे स्वप्न जेराल्डीन मॉक या अमेरिकेच्याच आणखी एका साहसी महिलेनं पूर्ण केलं. सायकलवरून जगभर प्रवास करणारी आणि त्याच्या अनुभवांची पुस्तकं लिहिणारी डव्‍‌र्हला मर्फी ही आणखी एक कहाणी! मर्फीला लहान असताना तिच्या दहाव्या वाढदिवसाला एक सायकल आणि एक नकाशासंग्रह भेट म्हणून मिळाला होता. या लहान वयात तिनं या दोन भेटवस्तूंची सांगड घातली आणि एक स्वप्न रंगवलं. वेगवेगळय़ा देशांचे नकाशे पाहताना, तिला लक्षात आलं, की फ्रान्समधील डंकर्कपासून भारतातल्या दिल्लीपर्यंत जमिनीवरून प्रवास करता येईल. मग तिनं एक योजना आखली, तयारी केली आणि तिचं ते स्वप्न सत्यात उरवण्यासाठी ती घराबाहेर पडली. १४ जानेवारी १९६३ला मर्फीनं डंकर्क सोडलं आणि अनेक थरारक अनुभव घेत त्याच वर्षीच्या ८ जुलैला ती दिल्लीत पोहोचली. या तिच्या प्रवासावर लिहिलेलं ‘फुल टील्ट’ हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखं आहे. त्यानंतर तिने असे अनेक थरारक प्रवास केले आणि त्यावर आधारित तब्बल २४ पुस्तकंही तिनं लिहिली.मर्फीचा हा थरार कमी वाटावा अशी एल्स्पेथ बिअडची कहाणी! इंग्लडची ही साहसवेडी तरुणी १९८२ मध्ये एकटीने दुचाकीवर जगप्रवासावर निघाली. प्रथम अमेरिकेत प्रवास करून नंतर ती ऑस्ट्रेलिया, थायलंड, भारत, नेपाळ, पाकिस्तान, इराण, तुर्कस्तान, ग्रीस, युगोस्लाविया आणि नंतर पश्चिम युरोप फिरून ३ वर्षांनंतर मायदेशी परतली. या संपूर्ण प्रवासात तिला ऑस्ट्रेलिया आणि थायलंडमध्ये दोन वेळा गंभीर अपघात झाले. वाटेत अनेकदा तिची फसगत झाली. दुचाकी नादुरुस्त झाली. पण या साऱ्यांवर मात करत तिने ही विश्व परिक्रमा पूर्ण केली आणि असा प्रवास करणारी जगातली ती पहिली महिला ठरली. उत्तुंग गिरिशिखरे, थरारक प्रवासाबरेबरच मोठाली वाळवंट आणि बर्फाळ ध्रुव प्रदेशावरही महिलांनी आपली मुद्रा उमटवली आहे. एलेक्सिन टीने, हेलेन थायर या दोघींनी सहारा वाळवंटात तर रॉबिन डेव्हिडसन हिने थरच्या वाळवंटात एकटीने प्रवास केला आहे. काय म्हणावे आता या वेडाला..!
उत्तर आणि दक्षिण ध्रुव गाठणाऱ्या अ‍ॅन बॅनक्राफ्टची गोष्टही अशीच. तिने ६ मार्च १९८६ ला विल् स्तेगरसह ५६ दिवस प्रवास करून उत्तर ध्रुव गाठला. तर पुढे सातच वर्षांनी १९९३ साली ३ महिला सहकाऱ्यांसह ६७ दिवसांचा १०६० किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा या बॅनक्रॉफ्टने दक्षिण ध्रुवदेखील गाठला. या दोन्ही ध्रुवांवर पाऊल ठेवणारी ती पहिली महिला ठरली आहे. तिच्या नंतरही मग अनेकींनी प्रेरणा घेत या दोन्ही ध्रुवांवर आपली पावले उमटवली. अर्लिन ब्लम या विलक्षण साहसी महिलेने तर अरुणाचल प्रदेश ते थेट काश्मीर अशी २०० किलोमीटरची पर्वतरांग पायी ओलांडली. असे साहस करणारी ती पहिली महिला ठरली. आता तिच्यापाठी अन्य महिला साहसवीरांनीही ही अवघड वाट अधिक रुंद केली आहे. अशी किती नावे घ्यावीत आणि त्यांच्या साहसवाटांची चर्चा करावी. पुरुषांच्या बरोबरीनेच नाहीतर अनेक ठिकाणी त्यांच्याही पुढे जात महिलांनी या अशा अवघड वळणांवर आपल्या अमीट खुणा उमटवल्या आहेत. त्यांचे हे थरारक प्रसंग, प्रवासवर्णने, अनुभव ऐकले, वाचले तरी त्यांच्या या जिद्दीला सलाम करावसा वाटतो.

असामान्य अशा काही पाऊलखुणा
* जुंको ताबेई हिने १९७५ साली जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती जगातील पहिली महिला ठरली आहे.
* जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असलेल्या ‘के-टू’च्या माथ्यावर पोलंडच्या वांडा रुटकिवित्झ् या गिर्यारोहिकेने पहिल्यांदा पाऊल टाकले. १९८६ साली झालेल्या या मोहिमेतून ती या शिखरावर जाणारी पहिली महिला ठरली आहे.
* जगातील तिसऱ्या क्रमांकाचे आणि भारतातील सर्वोच्च असलेले काचंनगंगा शिखर १९९६ मध्ये ब्रिटनची गिर्योरोहिका जिनेट हॅरिसनने पहिल्यांदा सर केले.
* जगातील ८ हजार मीटरपेक्षा उंच असलेली १४ शिखरे सर करण्याचा पहिला मान स्पेनच्या एडून्रे पासाबानच्या नावावर आहे. तर याच शिखरांवर कृत्रिम प्राणवायूविना चढाईचा शिरपेच गर्लिडे काल्टेनब्रुनर हिच्या शिरपेचात खोवला गेला आहे.
* ख्रिस्तिना लिसाकिवित्झ् हिने शिडाच्या होडीने साऱ्या जगाला प्रदक्षिणा घालत नवा विक्रम केला.
* उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर चालत जाऊन पाऊल टाकणारी अ‍ॅन बॅन्क्रॉफ्ट ही पहिला महिला ठरली आहे.
* जेराल्डीन मॉक या अमेरिकच्या साहसी महिलेने १९६४ साली सेस्ना जातीच्या विमानातून एकटीने २९ दिवसांत २२ हजार ८६० मैलांचा प्रवास करत जगाला प्रदक्षिणा घातली.
* एव्हरेस्ट शिखर सर करणारी बचेंद्री पाल ही पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. तर भारताच्या संतोष यादव या गिर्यारोहक महिलेने हे सर्वोच्च शिखर दोनदा सर केले आहे.
* कृष्णा पाटील हिने २००९ साली एव्हरेस्टच्या माथ्याला स्पर्श करत पहिल्यांदा एका मराठी मुलीची मुद्रा या शिखरावर उमटवली.
* सुचेता कडेठाणकर या मराठी मुलीने जिद्दीच्या जोरावर गोबीचे वाळवंट पार केले.