राजगड! छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी. पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या तीन अभेद्य माच्या आणि मधोमध कातळ पर्वतावर बालेकिल्ला अशी या गडाची रचना. यातील बालेकिल्ल्याच्या दरवाजात उभे राहिले, की गडाची ही पूर्व दिशेची सुवेळा माची पुढय़ात उभी राहते. भल्या सकाळी या दरवाजात उभे राहात पूर्वेकडे नजर टाकली तर दूरवर गेलेली सुवेळाची ती डोंगररांग, बाजूला भाटघर धरणाच्या पाण्याची साथसंगत आणि उगवतीच्या रंगात न्हालेला सारा परिसर मंत्रमुग्ध करून टाकतो. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित छायाचित्र स्पर्धेत निसर्गचित्र गटात राजगडाच्या या ‘सुवेळा’ने प्रथम क्रमांक मिळवला.