वसंत ऋतूत पळस, पांगारा, काटेसावरचे वृक्ष बहरू लागले, की नाना जातीचे पक्षिगण या बहराभोवती रुंजी घालू लागतात. पक्ष्यांच्या या शाळेतील हा एक शिलेदार कोतवाल. सडपातळ आणि लांबुडकी देहयष्टी, माशाच्या शेपटीसारखी ‘व्ही’ आकाराची शेपटी, गुंजेसारखे लालबुंद डोळे आणि तजेलदार राखी करडा रंग या साऱ्या वैशिष्टय़ांनी हा देखणा पक्षी रंगलेला असतो. फुलांमधील मकरंदापासून ते त्यावरील कीटकापर्यंत असे सर्व प्रकारचे खाद्य आवडीने मटकावणारा हा पक्षी वसंताचा बहर रंगात आला, की या फुलांच्या अवतीभवती रुंजी घालू लागतो. काटेसावरीच्या या बहरावर असाच रमलेला हा पाहुणा.