लडाख म्हटले, की केवळ निसर्गाचे सुंदर दृश्य डोळय़ांपुढे उभे राहते. विविध रंगांमध्ये न्हालेल्या पर्वतरांगा, हिमशिखरे, खोरी आणि जलाशय या साऱ्यांनी ही भूमी नटलेली आहे. या भूमीतीलच आडवाटेवरच्या ‘त्सो मोरिरी’ जलाशयाची भ्रमंती.

‘त्सो मोरिरी’ आणि ‘त्सो कार’ ही लडाखमधील दोन निसर्गरम्य सरोवरे. सारे लडाख फिरले, पण प्रत्येक फेरीत या सरोवरांनी हुलकावणी दिली. कधी रस्त्याचा अंदाज न आल्याने, कधी वेळापत्रक कोलमडले म्हणून, कधी हवामानाची लहर फिरली म्हणून! एकदा तर केवळ आमच्या महिलांच्या मोहिमेला ऐनवेळी सीमेवर परवानगी नाकारली म्हणून! एवढे ‘नाही’ झाल्याने या जलाशयांनी थोडे जास्तच खुणावायला सुरुवात केली. मग गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लडाखची पुन्हा नवी मोहीम उघडली आणि या जलाशयांचा सहवास अनुभवून आले.
आमच्या या मोहिमेचे शिलेदार दोनच. मी आणि माझा भाचा गणेश अंबर्डेकर. त्सो मोरिरी, त्सोकार आणि पँगाँग त्सो या तीनही सरोवरांकाठी कॅम्पिंग करायचे. तंबू ठोकून राहायचे, स्वत:चे स्वत:च पकवून खायचे, मनसोक्त निसर्ग अनुभवायचा आणि फोटोग्राफी करायची..ही स्वप्ने रंगवत आम्ही लडाखमध्ये दाखल झालो.
लडाखमध्ये त्सो मोरिरी, त्सो कार आणि पँगाँग त्सो ही तीन सरोवरे पाहण्यासारखी. लडाखच्या चांगथांग भागात ती आहेत. चांगथांग म्हणजे लडाखचा ‘इस्टर्न मोस्ट प्लॅटो’. या चांगथांग शब्दातील ‘थांग’ म्हणजे प्रदेश. लडाखलाही ‘मणिमान थांग’ असे म्हणतात. चांगथांग म्हणजे वैराण प्रदेश. उंची साधारण दहा ते चौदा हजार फूट. हा सारा मेंढपाळांचा प्रदेश.
आमचा पहिला पडाव होता ‘त्सो मोरिरी’. लेहहून आम्ही निघालो. उपशी मार्गे चुमाथांग, माहे, सुमडो करत ‘त्सो मोरिरी’च्या काठावरच्या करझोकला पोचलो. अंतर साधारण २३०-२४० किलोमीटर होते. ‘त्सो मोरिरी’ चांगथांगच्या दक्षिण कोपऱ्यात आहे, तर ‘पँगाँग त्सो’ पूर्व कोपऱ्यात.
आमच्या बरोबर होती मिमा चिप्पा औटे. आमची माऊंटन गाईड. तिची पहिली भेट झाली तेव्हा ती मुलगी आहे हे कळलेच नाही. अलीमोट्टी फेल्ट हॅट, ट्रेकिंग शूज, जॅकेट, उन्हाने रापलेला चेहरा, पटापट जीपच्या टपांवर चढून सॅक्स, गॅस सिलिंडर चढवत होती.
‘त्सो मोरिरी’ला पोहोचून दोन टेंट लावले. मिमाने लगेच सूत्रे हातात घेऊन, ब्लॅक टी, अद्रकवाली चाय, पुदिनावाली चाय यांचा भडिमार सुरू केला. दोनएक तासांत ‘जान में जान आ गई’!
करझोक ही भटक्या मेंढपाळांची वस्ती आहे. काही लोक तिथे आता स्थिरावले आहेत. त्यांची घरं पक्की आहेत. अर्थात ‘पक्की’ या शब्दाला आपल्या फूटपट्टय़ा लावून चालतच नाही. काही मेंढपाळ याकच्या कातडीच्या तंबूमध्ये राहतात- त्यांना रेबो म्हणतात. या तंबूंना, घरांना याकची शेपूट लावून सजावट केली होती. दुष्टशक्तीपासून, निसर्ग कोपापासून त्यामुळे बचाव होतो, अशी या भटक्या लोकांची समजूत. ‘त्सो मोरिरी’ हे ‘रेमनंट’ प्रकारचे सरोवर आहे.
फार पूर्वी ते ‘फ्रेश वॉटर लेक’ होते. पण आता ‘अल्कलाईन ’ होत होत ते ‘सलाईन’ व्हायला लागले आहे. या सरोवराच्या पाण्याला आऊटलेट नाही. ‘त्सो मोरिरी’च्या नावाबद्दलही गमतीदार लोककथा आहे. ‘त्सो’ म्हणजे पाणीसाठा आणि ‘मो’ म्हणजे स्त्री. एकदा एक ‘मो’ याकवर बसून ‘त्सो’मधून पलीकडे निघाली होती. वाटेत याक बुडायला लागला. ती कशीबशी किनाऱ्यावर पोचली आणि जिवाच्या आकांताने याकला बोलवायला लागली- ‘री, री, री’ म्हणजे ‘ये, ये, ये.’
मो ‘री री’ करून ओरडत होती यातूनच हे नाव आले ‘त्सो मोरिरी.’
त्सो मोरिरी, चांग पांच्या दृष्टीने अतिशय पवित्र सरोवर आहे. Sacred gift to a living Planet असा खास दर्जा त्याला आहे.
करझोकच्या चांग पांचे उपजीविकेचे साधन म्हणजे पश्मिना आणि पश्म. पश्मिना जातीच्या मेंढय़ांचे कळप ही त्यांची संपत्ती. त्यांची लोकर ती पश्मिना. पण पश्म म्हणजे याच मेंढय़ांचा उबदार-मुलायम अंडरकोट थोडक्यात बाळ लोकरीसारखा प्रकार! जगातले सर्वोत्तम, तलम, महागडे फॅब्रिक ‘पश्म’पासून बनते. तिथल्या याक, उंट, कुत्रे यांनाही अतिशीत हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी असा अंडरकोट असतो.
त्सो मोरिरीच्या काठालगतचे. आजूबाजूचे वनस्पती विश्व आणि प्राणी विश्व अति वैशिष्टय़पूर्ण आहे. याच कारणाने नोव्हेंबर २००२ मध्ये त्सो मोरिरीचा समावेश ‘रामसर वेटलँड्स साईट लिस्ट’मध्ये झाला. भारतीय उपखंडातले, ‘ट्रान्स हिमालयन रीजन’ मधले हे सर्वाधिक उंचीवरचे सरोवर आहे. ‘एडेमिक फ्लोरा’चे वैविध्य फार आहे आणि अनेक पक्ष्यांचे हे प्रजनन स्थळ (ब्रिडिंग ग्राऊंड) आहे.
चांगथांगला शीत रण अभयारण्यही (कोल्ड डेझर्ट सँक्चुरी) म्हणतात. एकूण ११ सरोवरे, १० मार्शेस आणि साक्षात सिंधू असा हा चांगयांग प्रदेश!  डेमचोकजवळ  ही सिंधू चांगयांगमध्ये प्रवेश करते.
स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या प्रवासातला ‘त्सो मोरिरी’ हा महत्त्वाचा मुक्कामाचा टप्पा! ‘त्सो मोरिरी काँझर्वेशन ट्रस्ट’ तर्फे या सरोवराच्या संरक्षणसंवर्धनाचे अविरत प्रयत्न चालू आहेत. चांग पा लोकांनाही त्याचे महत्त्व समजून चुकले आहे. त्यांनी स्वप्रयत्नाने संपूर्ण सरोवराभोवती कुंपण उभारून पाणपक्ष्यांची, स्थलांतरित पक्ष्यांची ही अतिउंचीवरची प्रजनन भूमी संरक्षित
 केली आहे.
त्सो मोरिरीच्या मार्शेस जवळून भटकताना बार हेडेड गूज, ब्राह्मणी डक, ब्राऊन हेडेड गल दिसतात. बार हेडेड गूज म्हणजे पट्टकदंब-त्यांना लडाखी भाषेत ‘नगांग पा’ म्हणतात. हा अति उंचीवरून उडणारा पक्षी आहे.
‘त्सो मोरिरी’च्या पूर्वेला लडाखमधले उंच शिखर-कुंगशेर कांगरी आहे, तर उत्तरेला चामशेर कांगरी आहे. कांगरी म्हणजे शिखर! मिमाने ही दोन्ही समीट्स केली होती. त्यामुळे ती त्याबाबत जरा जास्तच इमोशनल आणि पझेसिव्ह होती.
त्सो मोरिरीच्या वाटेवर आणि परिसरात भरल, नयन, क्यांग, मेंढय़ाचे कळप, घोडय़ांचे गट दिसतात. हा हिमबिबटय़ांच्या वावराचाही परिसर आहे.
या भागातील दैनंदिन जीवन कल्पनेपलीकडचे आहे. अतिउंचीवरची शेते हे या भागाचे वैशिष्टय़. पण लहरी निसर्गामुळे अनेक वेळा ही पिके बर्फकाळात मेंढय़ा-याकना चारा म्हणूनच वापरायची वेळ येते. चांग पा मेंढय़ांचे कळप घेऊन भटकंती करतात, पण त्यातही अनुभवाधिष्ठित ‘मायग्रेशन पॅटर्न’ असतो.
करझोकची ४०० वर्षे जुनी मोनॅस्टी हे तिथले महत्त्वाचे धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र आहे. शाक्यमुनी बुद्धाची मूर्ती तिथे आहे. जेव्हा बर्फकाळात त्सो मोरिरी थिजून जाते तेव्हा चांग पा ‘पीवांग’ वाद्य वाजवत ‘जाबरो’ नृत्य करत मनोरंजन करून घेतात.
त्सो मोरिरीचा नीळवर्ण वर्णनातीत आहे. लडाखभर निळय़ा रंगाच्या विविध छटा आहेत. पण या ‘त्सो’चा रंग वर्णन करायला रत्नरंगांचीच परिभाषा वापरायला हवी. त्सो मोरिरीचा रंग म्हणजे रॉयल अझ्यूर! मधूनमधून ब्ल्यू क्वार्ट्झची झलकही तो दाखवतो. ऊर्जा संक्रमण किंवा आंतरिक असीम शांती हे या रत्नाचे गुण आहेत. तीच अनुभूतीही चांगथांग परिसरातील या निळाईतून मिळते.

*  भ्रमंतीसाठी रम्य प्रदेश
*  हिमशिखरे, खोरी आणि   जलाशय
*  निसर्गसृष्टीवर सतत विविध    रंगांचे खेळ
*  ‘त्सो मोरिरी’ हा ट्रान्स हिमालयातील सर्वात  उंचीवरचा जलाशय
*  विविध स्थलांतरित पक्षी,   प्राण्यांचा अधिवास
*  निसर्ग-वन्यजीव प्रेमी,    छायाचित्रणाची आवड   असणाऱ्यांसाठी रम्य स्थळ

सीमंतिनी नूलकर –    seema_noolkar@yahoo.co.in