16मुसळधार पडणारा पाऊस. मधूनच चमकणाऱ्या विजा आणि सोबत होणारा त्यांचा कडकडाट. आजूबाजूला दाट झाडी पसरलेली. त्यातही श्वापदे.. पायाखाली धड रस्ता नाही. अरण्यातलीच वाट ती. अन् अशा वाटेने चाललेली ती ६०० मंडळी! काय करत होती आणि कुठे निघाली होती अशा आडवेळेला आणि आडरानाला? पुढे त्यातली अर्धी मंडळी पुढे गेली आणि अर्धी एका ठिकाणी थांबली. थांबलेल्यांनी केलं काय? येणाऱ्या शत्रूला तेसुद्धा ताज्या दमाच्या शत्रूला या थकल्या भागल्या जिवांनी पुढे कित्येक तास झुंजवलं एका खिंडीत आणि आपल्यासोबत त्या खिंडीलासुद्धा अजरामर केलं.. पावनखिंड!

बाजीप्रभू, फुलाजी प्रभू अन् त्यांच्या मावळ्यांनी सिद्दी मसूदच्या सैनिकांना जिथे रोखून धरलं ती पावनखिंड. रात्रभर चालून दमलेली ही लोकं कसल्या शक्तीने भारलेली होती की एवढय़ा अविश्रांत श्रमांनंतरसुद्धा पुढे सलग १०-१२ तास ती शत्रूशी झुंजली.. त्यांच्या राजासाठी त्यानं मांडलेल्या स्वराज्याच्या खेळासाठी स्वत:च्या जीवावर उदार होऊन गजापूरच्या खिंडीत ते लढले. ही गजापूर खिंड म्हणजेच पावनखिंड. या खिंडीचीच ही भटकंती.
पावनखिंडीत येण्यासाठी कोल्हापूर-शाहूवाडी-मलकापूर मार्ग पकडावा. मलकापूरमधून डावीकडे अणुस्कुरा घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यानं फक्त १०-१५ किलोमीटरवर ही ऐतिहासीक पावनखिंड आहे. भाततळी गावातून हा रस्ता जातो आणि पुढे गजापूरजवळ विशाळगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला मिळतो.
आता पावनखिंडीजवळ मोठे स्मारक उभं केलंय. मुख्य रस्त्यावरून खाली पन्नास एक पायऱ्या उतरून गेलं की एका छोटय़ाशा ओढय़ावर असलेला पूल ओलांडावा लागतो. पायऱ्या उतरताना खाली नजरेसमोर पसरलेली दाट झाडी. कल्पनासुद्धा मनाला शिवत नाही की खाली काही असेल. पण तो छोटासा पूल ओलांडला की अचानक उजवीकडे ढाल-तलवार अन् भगवा झेंडा असं स्मारक सामोरं येतं. इथून पुढे सुरू होते पावनखिंड.
इथे जवळच कासारी नदीचं उगमस्थान आहे. ओढय़ाच्या रूपानं ती पुढे वाहात जाते. सध्या खिंडीत उतरण्यासाठी लोखंडाच्या दोन शिडय़ा बनवल्या आहेत. २५-३० फूट खाली उतरताना आपली चांगलीच तारांबळ उडते. खिंडीमध्ये जागोजागी मोठमोठे खडक, शिळा पडलेल्या आढळतात. पुढे जाऊ तसं खिंडीची रुंदी आणि खोली वाढत जाते, पण तरीही जास्तीत जास्त रुंदी सुमारे पंधरा फुटापर्यंत असावी. खिंडीत जमीन अशी दिसतच नाही. सगळीकडे शिळांचा खच पडलेला. दीड-दोनशे मीटरनंतर खिंड काटकोनात वळून डावीकडे जाते. शेवटपर्यंत लांबी सुमारे पाचशे मीटरपर्यंत असावी. असं सांगतात की खिंड पूर्वी एवढी रुंद नव्हती. कालौघात पाण्याच्या प्रवाहामुळे शिळा कोसळून ती अधिक रुंदावली आहे. आजही पावनखिंड जंगलांनी अशी आच्छादली आहे की भर दुपारीसुद्धा सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत. मग चारशे वर्षांपूर्वी काय स्थिती असेल याचा विचारसुद्धा करवत नाही.
हे सारे पाहता-पाहताच तो इतिहास अंगावर उभा राहू लागतो. त्या भयाण रात्री, कोसळत्या पावसात ती मंडळी कुठल्या निष्ठेने लढली असतील असे वाटू लागते. नतमस्तक व्हायला होते. असे वाटते, आपणही एकदा असेच साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वीच्या त्या आषाढ पौर्णिमेला पन्हाळ्यावरून रात्री निघावं. शिवरायांच्या पालखीला खांदा देत देत पावनखिंडीपर्यंत यावं.. आणि शत्रूशी लढता लढता धारातीर्थी पडावं अन् खिंडीसोबत पावन व्हावं!

24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
pune immoral relationship marathi news
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा मोटारीखाली चिरडून खून; महिलेसह दोघांना अटक
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
navi mumbai buses marathi news, navi mumbai bus poor condition marathi news
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर