ऐन घाटमाथ्यावरील हा एक गिरिदुर्ग. रायगडाच्या परिघात, कावळय़ा घाटाच्या माथ्यावर बसलेला. अचाट साहस करत त्याच्या माथ्यावर गेले, की अवघे सहय़मंडळ भोवतीने नाचू लागते. तोरणा, लिंगाणा आणि रायगडाशी संवाद सुरू होतो.

सहय़ाद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर अनेक गिरिदुर्ग कित्येक वर्षांपासून एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे दबा धरून बसलेले आहेत. या दुर्गाचे काम काय तर.. या घाटमाथ्यावरून कोकण-देशावर वरखाली करणाऱ्या घाटवाटांवर लक्ष ठेवणे, भोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे अथवा वेळप्रसंगी जवळच्या एखाद्या मोठय़ा किल्ल्याला मदत करणे, त्याचे संरक्षण करणे. या अशा माळेतीलच एक दुर्ग रायगडाच्या परिघात, कावळय़ा घाटाच्या माथ्यावर कधीचा बसलेला आहे, नाव- कोकणदिवा!
पुण्याच्या दक्षिणेला आंबी, मोसे, मुठा नद्यांची खोरी आहेत. यातीलच आंबीवर पानशेत धरण साकारले आहे. या पानशेत जलाशयाच्या उजव्या काठाने एक वाट घोळ गावापर्यंत गेली आहे. हे घोळ गाव म्हणजे ऐन घाटमाथ्यावरचे शेवटचे गाव. या गावाच्या पुढे डोंगरझाडीत गारजाईवाडी नावाची एक छोटीशी वस्ती. या वस्तीच्या डोक्यावरच हा कोकणदिवा! गेली कित्येक शतके या साऱ्या रहाळाचा प्रकाश होत तेवत आहे.
पुणे ते घोळ अंतर ९० किलोमीटर. या घोळ गावापर्यंत पुण्याच्या स्वारगेटहून दररोज संध्याकाळी एक मुक्कामी एसटी बस येते. पण आपल्या भ्रमंतीसाठी स्वत:चे वाहन असेल तर सोयीचे जाते. हे घोळ गाव गाठेपर्यंतच डोंगरदऱ्यात हरवून जायला होते. या गावातून लगेचच गारजाईवाडीची वाट पकडायची. वाटेवर एखादा मावळा भेटला तर सारी वाटच बोलकी होऊन जाते. शेती-वाडी, पीक-पाणी, थंडी-पाऊस, झाडे-पक्षी-प्राणी, देव-धर्म-उत्सव अशा विविध विषयांवर बोलत आपली ‘दुचाकी’ डोंगरदरीतून धावू लागते. आमचेही असेच झाले. झाडा-पाना-फुलांशी हा संवाद सुरू असतानाच एका ठिकाणी हा निसर्ग एकदम घट्ट झाला. बरोबरचा गावकरीही त्या झाडीत घेऊन गेला.
आभाळात शिरू पाहणारी दाट झाडी आणि तापलेले पाय शांत करणारी शीतल सावली. एक छोटेसे मंदिर, आतमध्ये छोटेखानी भैरवाची मूर्ती. बरोबरचा गावकरी म्हणाला, ‘ही आमची भैरोबाची राई’, त्यांचे हे वाक्य पूर्ण होण्याआधीच घंटेचा नाद झाला आणि तो ‘देवराई’ या शब्दाबरोबर माझे सारे मन व्यापून राहिला. वड, पिंपळ, आंबा, करंज, जांभूळ, गेळ, पांगारा, पळस, काटेसावर, बेहडा, हिरडा असे नाना वृक्ष. या वृक्षांच्या अंगाखांद्यावर पुन्हा बहरलेल्या लतावेली. जमिनीलगत पुन्हा छोटय़ा-छोटय़ा झुडपांचा फेर. यातील पळस, पांगारा, काटेसावरीने बहर धरलेला. त्यांच्या बहराभोवती पुन्हा पक्ष्यांचा धिंगाणा. इथल्या नीरव शांततेतील हा एकमेव सुखावणारा किलबिलाट. इथले एकेक झाड काही पिढय़ा जुने! उगवलेले झाड कधी तुटलेच नाही. त्यामुळे अगदी अभय मिळाल्याच्या आनंदात ही वनसृष्टी बहरलेली. हसत-खेळत, मुक्तपणे! सारी राईच या निसर्गचैतन्याने व्यापून राहिलेली. सर्वत्र सुखावणारी हिरवाई, विसावलेली सावली आणि भरून राहिलेली शांतता! ..नकळतपणे देवाचा स्पर्श होऊन जातो!!
राईतल्या या देवाला साठवतच बाहेर पडलो. थोडय़ाच वेळात गारजाईवाडी आली. दहा-वीस घरांचीच वस्ती. साऱ्या वस्तीत मिळून माणसेही तेवढीच. गावातीलच मारुतीच्या मंदिरात पथारी लावली आणि गडावर निघालो. वाडी सोडताच भोवतीचे जंगल आणखी घट्ट झाले. डोक्यावर झाडांचे मांडव सावली धरू लागले. ऊन सोसल्याशिवाय सावलीचे महत्त्व समजत नाही आणि सावलीत शिरल्याशिवाय झाडांचे मैत्रही उमगत नाही.
झाडीने भरलेली ही पहिली टेकडी पार केली आणि ‘त्याचे’ दर्शन घडले. त्याचा तो उभा कडा त्या भरल्या रानातून उसळी घेत वर आला होता. असे वाटले, आमच्या येण्याची त्यालाही जाणीव झाली आणि म्हणून कोकणदिव्याने मान वर उचलली की काय? त्याला पाहातच पायाखालचा शिशिराचा पालापाचोळा तुडवत पुढे निघालो. वाटेत एक ओढा आडवा आला. पाण्याने अजून त्याची साथ सोडलेली नव्हती. त्या पाण्याचे कौतुक करत पुढे निघावे तो काही अंतरावरच आणखी एक कुतूहल समोर आले. अगदी अचानक,धक्का देत..एकाश्म मंदिर!
एकाच भल्यामोठय़ा पाषाणातून एक छोटेखानी मंदिर घडवायचे. पायाच्या दगडापासून ते कळसापर्यंत सारे एखाद्या मूर्तीप्रमाणे.. छोटेखानी वेरूळच म्हणा ना! आपल्याकडे अनेक ठिकाणी आढळणारी ही एक दुर्मिळ मंदिरनिर्मिती. यातलाच एक आविष्कार कोकणदिव्याच्या या वाटेवर दर्शन देत होता. या घुमटीतील महादेवाचे दर्शन घेतले आणि पुढे कोकणदिव्याच्या उभ्या कडय़ाला भिडलो. डोगरदरीतील पायपीट, मग जंगलझाडी आणि त्यानंतर आता ही उभ्या कडय़ावरची चढाई. ..१०२० मीटर उंचीच्या कोकणदिव्याची ही चढाई तशी दिव्यत्वाची प्रचिती देणारी आहे. शेवटच्या टप्प्यातील चढाई तर थरारकच म्हणावी लागेल. प्रचंड घसाऱ्याने घाबरवणारी आणि उभ्या कडय़ाला दोन हात करायला लावणारी. थोडे धाडस आणि जिवावरचा हा सारा खेळ असल्याने अशा उपद्व्यापाची सवय असणाऱ्यांनीच या वाटेला भिडावे. यातील घसाऱ्याचा भाग चढून वर आलो, की वाटेतच एक लेण्याप्रमाणे खोदकाम दिसते. भोवतीने पाण्याच्या टाक्यादेखील खोदलेल्या. या इथेच गडाच्या कोसळलेल्या दरवाजाचे अवशेष दिसतात. इथे थोडावेळ विश्रांती घ्यायची आणि मग पुढे कडय़ावर स्वार व्हायचे. कोकणदिव्याचा हा सर्वोच्च माथा. त्या पर्वताच्या एका कोपऱ्यातून उभ्या धारेने वर चढणारा. एका बाजूला आकाशात घुसलेला कडा आणि उर्वरित अंगांना खोल दरी. थोडी धडधड, थरथर आणि खूप साहस घेऊन त्या खोबण्यांमध्ये हात घालायचा आणि कडय़ावरून वर सरकायचे. भीती, साहस, कुतूहल अशा संमिश्र भावना घेत थोडय़ाच वेळात ते अचाट दिव्य पार पाडायचे आणि गडमाथ्यावर दाखल व्हायचे. कोकणदिव्याचा माथा अगदीच छोटा. अगदी पहिल्यानंतर दुसरे पाऊल टाकले तर पलीकडे दरीत पडेल की काय अशी भीती दाखवणारा. एक-दोन घरटय़ांचे अवशेष, जुन्या बांधकामांचे कातळातील खड्डे आणि या अवशेषांमध्ये मधोमध फडफडणारा भगवा. एवढय़ाच काय त्या गडाच्या खाणाखुणा. पण या टिचभर जागेतही उभे राहिल्यावर अगदी सुरुवातीला असे वाटते, ‘उघडले स्वर्गाचे दार’! भोवतीने सारे सहय़मंडळ, त्यातील गिरिशिखरे, दुर्गशिखरे एकेका शिलेदाराप्रमाणे नाचू लागतात. पूर्वेकडचा तो लिंगाण्याचा सुळका कोकणदिव्याशी स्पर्धा करू पाहतो. तोरणा ऊर्फ प्रचंडगडाचा तो पसारा नजर विस्फारतो. त्याचा तो बुधला लक्ष वेधून घेतो. सहय़ाद्रीचे तर खूप विलक्षण दर्शन इथून घडते. ती पर्वतरांग, तिचे ते अभेद्य पर्वत, कडे-सुळके, आक्रमक दऱ्याखोऱ्या; त्याच्या अंगाखांद्यावरून वाहणाऱ्या त्या घाटवाटा, तळाशी निजलेली ती घट्ट वनराई, तिच्यातून वाहणारी ती कावळय़ा घाटाची ऐतिहासिक वाट, समोरचे काळ नदीचे खोलवर पसरलेले खोरे आणि तिच्या पल्याडच्या तीरावर उभा असलेला साक्षात रायगड! ..एकेक गोष्ट पाहता पाहता मन त्यामध्ये अडकू लागते. सहय़ाद्रीच्या अंगाखांद्यावर रेंगाळू लागते. कोकणदिवा आणि रायगडाच्या मध्ये तर केवळ काळ नदीचे हे खोरे. यामुळे हा ‘नंदादीप’ अगदी पुढय़ात तेवत असल्यासारखा वाटतो. त्याच्यावरची एकूणएक वास्तू लख्खपणे दिसते. तो नगारखाना, बाजारपेठ, टकमक टोक, जगदिश्वराचे मंदिर, शिवछत्रपतींची समाधी.. अशी एकेक वास्तू अगदी स्पर्श करत पाहिल्यासारखे वाटते. इथे माथ्यावरून फडफडणाऱ्या भगव्याच्या साक्षीने हे सारे पाहताना समाधी लागून जाते. असे वाटले हा कोकणदिवा म्हणतो आहे, ‘अरे रायगडा, तू जाज्वल्य, स्फूर्ती, तेज आणि पराक्रमाने भरलेले शिवालय, तर मी तुझ्या पुढय़ातील केवळ एक नंदी!’

Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू
statue of Gond raje Bakt Buland Shah the founder of Nagpur city is Neglected by government
नागपूर नगरीच्या राजाची अजूनही उपेक्षाच!